Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आमीर खानने भारताला कलंकित केले

आमीर खानने भारताला कलंकित केले

=भाजपा व केंद्र सरकारचा घणाघाती आरोप, अनेक कलावतांचीही खानवर टीका=
bjp protest against amir khanनवी दिल्ली, [२४ नोव्हेंबर] – देशातील असहिष्णुता पाहू जाता, भारत सोडण्याची इच्छा माझ्या पत्नीने बोलून दाखविली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या आमीर खानवर आज मंगळवारी देशभरातून टीकेची झोड उठली आहे. ज्या आमीरला भारतीयांनी मोठे केले, डोक्यावर बसविले, त्याच आमीरने आज भारताला जगात कलंकित केले, असा घणाघाती आरोप भाजपा आणि केंद्र सरकार दोघांनीही केला आहे. तर, चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनी आमीरच्या पत्नीला नेमके कोणत्या देशात जायचे आहे, असा खोचक सवाल केला.
दादरीसह देशातील दोन ते तीन घटनांच्या पार्श्‍वभूमीवर कॉंगे्रसच्या इशार्‍यावर अनेक साहित्यिक आणि लेखकांनी आपापले पुरस्कार व सन्मान परत केल्यानंतर, त्यात आता मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आणि ‘सत्यमेव जयते’ व ‘अतुल्य भारत’ मालिकांच्या माध्यमातून तमाम भारतीयांच्या गळ्यातला ताईत ठरलेल्या आमीरनेही भर घातली आहे. देशातील सध्याचे चित्र पाहून, या देशात राहणे अशक्य आहे, असे माझी पत्नी किरण राव मला म्हणाली आणि मी देखील त्यावर आता गंभीरपणे विचार करीत आहेे, असे आमीरने सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
त्याच्या या वक्तव्यावर आज मंगळवारी देशभरातूनच टीकेची झोड उठली आहे. भाजपा आणि केंद्र सरकारनेही त्याचा खरपूस समाचार घेतला. आमीरच्या या वक्तव्यामुळे भारताची प्रतिमा कलंकित झाली, असा आरोप केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी केला. तर, आमीर खान देशातील कथित स्थितीमुळे घाबरलेला नाही, तर या स्थितीच्या आडून तो देशवासीयांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टीका भाजपाचे वरिष्ठ नेते शाहनवाज हुसेन यांनी केली. हा सर्व वाद निरर्थक आहे. समाजामधील चुकीच्या बाबींवर सर्वांनीच एकत्रित येऊन उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात देश असहिष्णू झाल्याच्या आमीरच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशाची प्रतिमा कलंकित झाली आहे, असे स्पष्ट करताना, देशात रालोआ सरकार सत्तेत आल्यानंतर जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी घट झाल्याची आकडेवारीच रिजिजू यांनी सादर केली.
देशात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि मला त्याबाबत फार काळजी वाटते. मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अतिशय चिंतेत असलेली माझी बायको किरणने तर मला आपण देश सोडून जाऊ या, असेही सांगितले होते. तिला दररोज वृत्तपत्रांतून येणार्‍या या बातम्यांमुळे भीती वाटते आणि मुलांच्या भविष्याचीही काळजी वाटते. किरणचे हे बोलणे माझ्यासाठी फारच धक्कादायक आहे. सामान्य नागरिक म्हणून आजूबाजूला घडणार्‍या घटनांकडे बघतो, तेव्हा मलादेखील खरच भीती वाटते, असे आमीर दिल्लीतील रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात बोलताना म्हणाला होता. विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत आमीरने हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
शाहनवाज हुसेन यांनी आमीरवर सडकून टीका करताना स्पष्ट केले की, जगभरातील मुस्लिमांकरिता अतुल्य भारतापेक्षा दुसरा कोणताच चांगला देश जगाच्या पाठीवर नाही. भारतानेच तुला सुपरस्टार बनविले, तुला डोक्यावर बसविणारे भारतीयच आहेत, हे तू मुळीच विसरू नको.
आमीर खानला भारतापेक्षा चांगला देश या जगात शोधूनही सापडणार नाही. कोणता कलावंत कोणत्या धर्माचा आहे, याचा विचारही न करता त्या कलाकाराला मोठा करणे हे केवळ भारतीयांचे काम आहे. भारतात असहिष्णुता आहे, असे जर तुला वाटत असेल, तर तू हा देश सोड आणि जगाचा फेरफटका मार. मग, तुला लक्षात येईल की, मुस्लिमांसाठी भारतापेक्षा सुरक्षित देश दुसरा कोणताही नाही, असे हुसेन यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
देशातील विद्यमान स्थितीवर मत व्यक्त करणार्‍यांना देशद्रोही ठरविण्यापेक्षा त्यांच्याशी चर्चा करा, असा सल्ला देणारे कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही हुसेन यांनी जोरदार पलटवार केला. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील शिखांसोबत कुठलीही चर्चा न करता त्यांचा अमानुषपणे संहार करणार्‍या कॉंगे्रस पक्षाने भारताला आणि भाजपाला सहिष्णुतेचे धडे देण्याचा प्रयत्न करू नये, असे खडे बोल हुसेन यांनी सुनावले. देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीकारणे कॉंगे्रस आणि पक्षाच्या नेत्यांना शक्य झाले नाही. जनतेने ज्या मोदींच्या हातात सत्ता सोपविली, त्यांचा स्वीकार करण्याची सहिष्णुता कॉंगे्रस दाखवूच शकत नाही, असा जोरदार प्रहारही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25724

Posted by on Nov 24 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1160 of 2480 articles)


मुंबई, [२४ नोव्हेंबर] - देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळं माझ्या बायकोनं मला देश सोडण्याचा सल्ला दिला होता, असे सांगून खळबळ उडवून देणारा ...

×