richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » इस्रोची गगनभरारी : एकाचवेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण

इस्रोची गगनभरारी : एकाचवेळी २० उपग्रहांचे प्रक्षेपण

isro-satalite-launchingश्रीहरीकोटा, [२२ जून] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ अभियानात बुधवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने देशाच्या अर्थ ऑब्झर्व्हेशन ‘कार्टोसॅट-२’ उपग्रहासह एकूण २० उपग्रह एकाचवेळी यशस्वीपणे अंतराळात पाठविले. काही मिनिटांतच हे सर्व उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले.
आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातील लॉन्च पॅडवरून ‘पीएसएलव्ही-सी ३४’ अंतराळ यानाच्या माध्यमातून हे सर्व उपग्रह आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अंतराळात पाठविण्यात आले. त्यानंतर ३० व्या मिनिटाला निरभ्र आकाशातील त्यांच्या कक्षेत पोहोचविले.
‘कार्टोसॅट-२’ या ७२७.५० किलो वजनाच्या उपग्रहासोबतच पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम’ हा उपग्रह देखील अंतराळात सोडण्यात आला. सागरी सुरक्षा आणि संवाद हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वयम उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय, कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी आणि अमेरिकेच्या उपग्रहांनाही पीएसएलव्हीने अंतराळात नेले. अवकाशात सोडण्यात येणार्‍या २० उपग्रहांचे एकूण वजन १२२८ किलो होते. इस्रोचे प्रमुख किरण कुमार यांनी ही आजवरची सर्वांत मोठी कामगिरी असल्याचे सांगितले. याआधी २००८ मध्ये पीएसएलव्ही-सी ९ अंतराळ यानाच्या माध्यमातून इस्रोने एकाचवेळी १० उपग्रह अंतराळात सोडले होते.
कार्टोसॅटचा मुख्य उद्देश
कार्टोसॅट-२ या उपग्रहाचा मुख्य उद्देश पृथ्वीचे निरीक्षण करण्यासोबतच शहर व ग्रामीण भाग, समुद्र भूमीचा वापर आणि नियामन, रस्त्यांच्या नेटवर्कचे निरीक्षण करणे आणि पाण्याचे योग्य वाटप करणे हा आहे.
रशिया व अमेरिकेनंतर भारतच
यापूर्वी २०१४ मध्ये रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी ३३ उपग्रह अंतराळात सोडले होते. तर, त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे २०१३ मध्ये अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने २९ उपग्रह अंतराळात सोडले होते. आता भारताने एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात सोडले आहेत.
अभिनंदनाचा वर्षाव
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इस्रोचे वैज्ञानिक आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या अन्य सदस्यांवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी इस्रोचे अभिनंदन केले आहे. एकाचवेळी २० उपग्रह अंतराळात पाठविण्यासारखे महान कार्य करून इस्रोने जगात देशाचे नाव उंचावले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपतींनी व्यक्त केली, तर पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, इस्रो प्रत्येक वेळी एक नवी उंची गाठत आहे. ही प्रगती जगात भारताचा मान उंचावणारी आहे.
प्रथमच उमटला मराठी ठसा
मेक इन इंडिया अभियान आणि इस्रोच्या अंतराळातील कामगिरीत यावेळी प्रथमच मराठी ठसा उमटला आहे. २००८-०९ पासून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकलेले वेगवेगळ्या शाखांमधील सुमारे १७० विद्यार्थी ‘स्वयम’ उपग्रहाच्या प्रकल्पात सहभागी झाले होते. अंतराळातील इतर उपग्रहांनी पाठविलेले संदेश संग्रहित करणे व डिकोडिंग करून ते पृथ्वीवर पाठविणे हे स्वयमचे मुख्य काम आहे. भारतातील १० आणि जगाच्या विविध भागातील जमिनीवरील केंद्रांशी स्वयम जोडला जाणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28741

Posted by on 3:37 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google