इस्रोने रचला इतिहास

  • स्वदेशी स्पेस शटलचे यशस्वी प्रक्षेपण
  • उपग्रह सोडून पृथ्वीवर परतण्याची क्षमता

isro-speceshuttle-launchedश्रीहरिकोटा, [२३ मे] – अंतराळ क्षेत्रात एकामागोमाग अनेक विक्रम करीत असलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज सोमवारी आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. पृथ्वीच्या कक्षेत उपग्रह सोडल्यानंतर पुन्हा जमिनीवर परत येण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी ‘रियुझेबल लॉन्च व्हेईकल’ म्हणजेच स्पेस शटलची इस्रोने सोमवारी यशस्वी चाचणी घेतली.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून इस्रोने देशातच हे अत्याधुनिक स्पेस शटल विकसित केले आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी सात वाजता स्पेस शटलचे प्रक्षेपण केल्यानंतर ‘आमची पहिलीच मोहीम पूर्णपणे यशस्वी राहिली,’ अशी घोषणा इस्रोच्या वरिष्ठ वैज्ञानिकाने केली. विमानासारखे पंख असलेले ‘आरएलव्ही-टीडी एचईएक्स-०१’ या नावाचे स्पेस शटल इस्रोकडून प्रथमच अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले आहे.
स्पेस शटल अंतराळात झेपावल्यानंतर काही वेळातच ते बंगालच्या उपसागरात तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या रन-वेवर परत बोलावण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण करण्यात आली. या स्पेस शटलची लांबी ६.५ मीटर इतकी असून, त्याचे वजन १.७५ टन आहे. स्पेस शटलचे हे प्रारूप विकसित करण्यासाठी ९५ कोटी रुपये खर्च आला.
अंतराळात एखादा उपग्रह सोडण्यात आल्यानंतर त्याला पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावून पुन्हा जमिनीवर परत आणणार्‍या रॉकेटची निर्मिती करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे पहिले पाऊल असून, आगामी १० ते १५ वर्षांत भारत या क्षेत्रात परिपूर्ण झालेला असेल, असा विश्‍वास इस्रोने वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला आहे. पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहांना प्रस्थापित करून पुन्हा पृथ्वीवर परत येणे, हाच स्पेस शटलचा मुख्य उद्देश आहे. हे उड्डाण घन इंधनाचा वापर केलेल्या रॉकेटच्या सहायाने करण्यात आले असून, या रॉकेटची लांबी ६.५ मीटर आणि वजन १.७५ टन इतके आहे.
विमानासारखे पंख असलेले हे स्पेस शटल विकसित करण्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला नसल्याने भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आज अंतराळात सोडण्यात आलेले स्पेस शटल हे खर्‍या स्पेस शटलची प्रतिकृती असून, ज्या वास्तविक स्पेस शटलची निर्मिती इस्रोकडून करण्यात येणार आहे, त्यापेक्षा हे प्रारूप सहा पटीने लहान आहे.
हायपरसॉनिक फ्लाईट
हायपरसॉनिक फ्लाईट असे नाव असलेला हा प्रयोग पूर्ण होण्यास सुमारे १० मिनिटांचा कालावधी लागला. प्रक्षेपणानंतर अवकाश यानाने ७० किलोमीटरची उंची गाठली आणि रॉकेटपासून वेगळे होऊन पुन्हा बंगालच्या उपसागरातील आभासी धावपट्टी अर्थात रन-वेवर उतरविण्यात आले.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
सध्या इराणच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. वैज्ञानिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच अंतराळातील हा ऐतिहासिक टप्पा आपण गाठू शकलो. या मिशनवर असलेला प्रत्येक वैज्ञानिक आणि कर्मचारी अभिनंदनासाठी पात्र आहेत, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28469

Posted by on May 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (278 of 2477 articles)


भारत-इराणमध्ये १२ करार दहशतवादाचा संयुक्त मुकाबला करण्याचा निर्धार तेहरान, [२३ मे] - भारत आणि इराण यांच्यात आज सोमवारी चाबहार ...

×