Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » चाबहार बंदराचा विकास करणार

चाबहार बंदराचा विकास करणार

  • भारत-इराणमध्ये १२ करार
  • दहशतवादाचा संयुक्त मुकाबला करण्याचा निर्धार

pm_modi_in_iran_with_president_rouhaniतेहरान, [२३ मे] – भारत आणि इराण यांच्यात आज सोमवारी चाबहार बंदराचा विकास करण्यासह एकूण १२ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. याचवेळी दहशतवाद, कट्टरतावाद, मादक द्रव्यांची तस्करी आणि सायबर गुन्हेगारांचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचा निर्धारही दोन्ही देशांनी व्यक्त केला.
हिंद महासागरात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन या दोन मित्रराष्ट्रांनी ग्वादार बंदर विकसित करून भारतापुढे आव्हान निर्माण केले होते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाणक्य नीतीचा वापर करून गेल्या १३ वर्षांपासून रखडलेल्या चाबहार बंदराच्या विकासाचा मार्ग आज मोकळा केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात २००३ मध्ये चाबहार बंदर विकसित करण्याबाबत भारत आणि इराणमध्ये प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर सत्तेवर आलेल्या कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले.
इराण दौर्‍यासाठी रविवारी तेहरानमध्ये दाखल झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय व आंतरराष्ट्रीय हिताच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीनंतर मोदी आणि रोहानी यांच्यात चाबहार प्रकल्प मार्गी लावण्याच्या आणि अन्य १२ करारांवर स्वाक्षरी केली. यात तेल, गॅस, रेल्वे, ऊर्जा, व्यापार, सांस्कृतिक, विज्ञान व तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. चाबहार बंदर हे भारत व इराणमधील वाढत्या सहकार्याचे प्रतीक ठरेल, असा विश्‍वास रोहानी यांनी, तर हा करार पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्‍वास नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रपरिषदेत व्यक्त केला.
भारताचे योगदान
चाबहार बंदराच्या विकास, तसेच या क्षेत्रात अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी भारत ५०० दशलक्ष डॉलर्सचे योगदान देणार आहे. आज जे करार झाले, त्यांची जलदगतीने अंमलबजावणी करण्यावर आम्ही भर देणार आहोत. या प्रांताचा विकास हाच आमच्यासाठी सर्वतोपरी आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
इराणच्या दक्षिण समुद्र किनारपट्टीच्या भागातील सिस्तन-बलुचिस्तान प्रांतात चाबहार बंदर असून, भारताच्या संरक्षण व्यूहरचनेसाठी तो महत्त्वाचा सिद्ध होणार आहे. पाकिस्तानला बगल देत भारत पश्‍चिम किनारपट्टीवरून थेट आखाती देशांमध्ये पोहोचू शकणार आहे.
भारत-इराण मैत्री जुनीच
भारत आणि इराणमधील मैत्री अतिशय जुनी आणि ऐतिहासिक आहे. कला आणि वास्तूशिल्प, तसेच कल्पना आणि परंपरेच्या माध्यमातून दोन्ही देश नेहमीच एकमेकांच्या संपर्कात राहिले आहेत. दोन्ही देशांच्या संस्कृतीत बरेच साम्य आहे. उभयतांमध्ये व्यापारही फार आधीपासूनच होत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. गुजरातला २००१ मध्ये महाविनाशकारी भूकंपाचा हादरा बसला होता, त्यावेळी सर्वप्रथम इराणनेच मदतीचा हात पुढे केला होता, अशी आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. विशेष म्हणजे, गेल्या १५ वर्षांच्या काळात इराणला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28466

Posted by on May 24 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (280 of 2480 articles)


=मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन= मुंबई, [२३ मे] - भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने सर्वोत्तम काम केले असून सरकारला दोन वर्षे ...

×