richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » तामिळनाडूला १ हजार कोटींची मदत: मोदी

तामिळनाडूला १ हजार कोटींची मदत: मोदी

=पंतप्रधानांची घोषणा, बळीसंख्या २८९=

चेन्नई, [३ डिसेंबर] – देशातील जनता पूरग्रस्त तामिळनाडूच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत आणि पुनर्वसनाकरिता राज्याला तातडीने एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
मंगळवार आणि बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी चेन्नई आणि राज्याच्या इतर अनेक भागांमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दुपारी पाण्याखाली असलेल्या चेन्नई शहराची हवाई पाहणी केली. त्यानंतर आयएनएस अड्यार या नौदलाच्या तळावर बोलताना पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. ही मदत आधी घोषित केलेल्या ९४० कोटी रुपयांपेक्षा वेगळी असेल, असेही पंतप्रधानांनी छोटेखानी निवेदन करताना सांगितले. यावेळी राज्यपाल के. रोसय्या आणि मुख्यमंत्री जे. जयललिता हेदेखील त्यांच्यासोबत होते. मी तामिळनाडूतील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन, अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी तामिळ भाषेत बोलताना दिली.
मान्सूनच्या पावसाने जो कहर केला त्यामुळे झालेले नुकसान मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अशा संकटाच्या वेळी देशातील जनता तामिळनाडूच्या जनतेसोबत आहे. पंतप्रधानांनी पूरपरिस्थितीही हवाई पाहणी केली त्यावेळी तामिळनाडूचेच असलेले केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन हेदेखील त्यांच्यासोबत होते.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तामिळनाडूतील पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी चेन्नईपासून ६० किमी अंतरावर असलेल्या अकाक्कोनम येथील आयएनएस राजाली या नौदलाच्या कार्यरत असलेल्या तळावर आगमन झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राजधानी चेन्नई आणि पाण्याने वेढलेली इतर उपनगरे आणि कांचीपूरम् व तिरुव्हल्लूर या पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली. नोव्हेंबर महिन्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी तामिळनाडूला ९४० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली होती.
बळीसंख्या २८९
गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या आता २८९ झाली आहे. दरम्यान, मंगळवार आणि बुधवार, असे दोन दिवस मुसळधार कोसल्यानंतर गुरुवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी चेन्नईवरील धोका अद्याप टळलेला नाही. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. पुद्दुचेरी आणि नागापट्टीणम् येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. चेन्नईतील धोका टळला, असे अजूनही म्हणता येणार नाही. चेन्नईजवळ आणखी एक कबी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे तामिळनाडूतील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असे हवामान खात्याचे महासंचालक एल. एस. राठोड यांनी सांगितले.
विमानतळावर अडकून पडलेल्यांना वाचवले
भारतीय वायुसेनेने चेन्नईत अडकून पडलेल्या २०० लोकांना सुरक्षित बाहेर काढून हैदराबाद येथे आणले. लोकांना वाचविण्यासाठी चेन्नईपासून ७० किमी अंतरावर असलेल्या अराकोन्नम येथून चार मालवाहू विमाने पाठविण्यात आली होती. एअर इंडियाने चाचणी म्हणून बुधवारी रात्री हैधराबाद येथून एअरबस ए-३२० विमान नौदलाच्या तळावर उतरविले होते
तामिळनाडूतील परिस्थितीवर राष्ट्रपतींना दु:ख
तामिळनाडूत चेन्नईसह इतर भागात मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल डॉ. के. रोसय्या यांना पाठवलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी, बचाव आणि मदतकार्य सुरू असून तामिळनाडूची जनता या संकटावर मात करेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.
या आपत्तीमध्ये ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींंना गमावले आहे त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. तसेच या आपत्तीमुळे ज्यांचे जीवन बाधित झाले आहे, त्या सर्वांप्रती आपली सहानुभूती असल्याचे राष्ट्रपतींनी आपल्या या संदेशात पुढे म्हटले आहे.
राज्य सरकार, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नागरी संस्था आणि बचावकर्ते, अविरत करत असलेल्या प्रयत्नांचे आपण कौतुक करतो, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
बाधित कुटुंबांना सर्वतोपरी साहाय्य देण्याचे आवाहन मी राज्य सरकार आणि इतर सर्व संबंधितांना करतो. या संकटकाळात माझ्या सदिच्छा आणि प्रार्थना तामिळनाडूतल्या जनतेसोबत असल्याचेही राष्ट्रपती म्हणालेे.
मुसळधार पावसामुळे प्राणी संग्रहालयातील मगरी आल्या रस्त्यावर
चेन्नईत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असतानाच आणखी एक संकट समोर आले. ते आहे मगरींचे. पाणी साचल्याने येथील प्राणी संग्रहालयातील मगरी बाहेर आल्या आहेत. त्यामुळे आता या मगरी शहरात फिरताना दिसत आहेत.
आधीच पावसाचा कहर आणि आता मगरींच्या संकटाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत धरून फिरत आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25976

Posted by on 5:20 am. Filed under छायादालन, ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google