Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » बीएसएफचे विमान भिंतीवर आदळले, १० ठार

बीएसएफचे विमान भिंतीवर आदळले, १० ठार

=दिल्ली विमानतळाजवळील भीषण घटना=
BSF plane crashes in Delhiनवी दिल्ली, [२२ डिसेंबर] – सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) लहान दहा आसनी विमानाला आज मंगळवारी सकाळी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. रांचीकडे उड्डाण घेतल्यानंतर विमानतळाला लागून असलेल्या संरक्षक भिंतीवर ते आदळले आणि लगेच आग लागून स्फोट झाला. यात बीएसएफच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांसह विमानातील सर्व दहा जणांचा मृत्यू झाला.
बीएसएफचे तांत्रिक कर्मचारी आणि अधिकार्‍यांसह दोन इंजिन असलेल्या या सुपर किंग्ज विमानाने सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी रांचीकडे उड्डाण घेतले. पण, लगेच विमानात तांत्रिक बिघाड आला. तो लक्षात येताच वैमानिकाने विमान उतरविण्याची परवानगी मागितली आणि ती त्याला देण्यातही आली होती. पण, त्यापूर्वीच द्वारका भागातील रेल्वे रुळाजवळ असलेल्या विमानतळाच्या संरक्षक भिंतीवर ते आदळले. क्षणातच विमानाने पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. यात वैमानिक आणि सहवैमानिक, बीएसएफचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि सहा तांत्रिक कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणातील अधिकार्‍याने दिली. नागरी उड्डयण राज्यमंत्री महेश शर्मा यांनीही या घटनेला दुजोरा दिला. अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आम्ही दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अपघात नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होणार आहे, असे शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
भगवतीप्रसाद भट (मुख्य वैमानिक), राजेश शिवरेन (एसएसबीचे अधिकारी व सहवैमानिक), उपकमांडंट डी. कुमार, निरीक्षक राघवेंद्र कुमार यादव, एस. एन. शर्मा, उपनिरीक्षक रवींद्र कुमार, सुरेंद्र सिंग, सी. एल. शर्मा, सहायक निरीक्षक डी. पी. चौहान आणि शिपाई के. आर. रावत अशी मृतांची नावे आहेत.
झारखंडच्या रांची येथील विमानतळावर नादुरुस्त असलेल्या बीएसएफ हेलिकॉप्टरच्या डागडुजीसाठी अधिकारी व तांत्रिक कर्मचारी या विमानाने निघाले होते, असे शर्मा यांनी सांगितले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही घटनास्थळाला भेट दिली. या दुर्दैवी घटनेवर त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर नमूद केले.
आर्थिक मदत जाहीर
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाने या अपघातात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. ही मदत लवकरच दिली जाणार असल्याचे बीएसएफच्या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26279

Posted by on Dec 23 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (985 of 2477 articles)


=खासदार नाना पटोले यांची माहिती= नवी दिल्ली, [२२ डिसेंबर] - कुठे अपुरा पाऊस, तर कुठे अतिवृष्टी यामुळे दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या ...

×