Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » भारतीय कुस्तीगिरांची नेत्रदीपक कामगिरी

भारतीय कुस्तीगिरांची नेत्रदीपक कामगिरी

=सुशील, अमित, विनेशला सुवर्ण; राजीवला रौप्य=
ग्लास्गो, [२९ जुलै] – येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवात भारताच्या तीन मल्लांनी सुवर्णपदक पटकावून धमाल उडवून दिली आहे. त्यात विश्‍वविख्यात सुशीलकुमार, अमितकुमार आणि महिला मल्ल विनेश फोगाट यांचा समावेश आहे. अन्य मल्ल राजीव तोमर याला अंतिम फेरी पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. आज भारताने नेमबाजीत पाच पदके पटकाविली. यात संजीव राजपूत व हरप्रीतसिंह यांच्या रौप्य, तसेच गगन नारंग, मानवजित संधू व लज्जा गोस्वामी यांच्या कांस्य पदकांचा समावेश होता.
भारताचा विख्यात मल्ल अमितकुमार याने ५७ किलो वजन गटात अंतिम फेरी गाठली होती, त्यावेळी त्याचा आत्मविश्‍वास बळावला होता. २० वर्षीय अमितकुमार याने नायजेरियाच्या विल्सन याच्यावर ६-२ गुणांची आघाडी घेत भारताला कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पहिल्याच फेरीत अमितने ४-० ची आघाडी घेतली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वात युवा मल्ल म्हणून त्याची गणना झाली होती. उपांत्य फेरीत त्याने पाकिस्तानच्या अझहर हुसैनचा पराभव केला होता.
भारताला कुस्तीतील दुसरे सुवर्ण मिळवून दिले ते महिला मल्ल विनेश फोगाट हिने. तिने ४८ किलो वजन गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या याना रॅटिंगन हिचा चुरशीच्या झुंजीत ११-८ गुणांनी पराभव केला.
भारताचा विश्‍व विख्यात मल्ल सुशील कुमारकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले होते. त्याने वजन गट बदलल्याने तो या स्पर्धेत स्वत:चे डावपेच आजमावत होता. उपांत्य फेरीत त्याने नायजेरियाच्या बिबोवर ८-४ गुणांनी विजय मिळविताच अंतिम फेरीत त्याची गाठ प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या कमर अक्बासशी झाली. त्यात ७४ किलोवजन गटात सुशीलने कमरला चित करून सुवर्ण पटकावले. भारतासाठी हे कुस्तीतील तिसरे सुवर्ण ठरले होते. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये सुशीलने क्रमश: कांस्य व रौप्यपदक प्राप्त केले होते. केवळ दीड तासाच्या काळात सुशील व अमित यांना उपांत्य व अंतिम फेरीत झुंज द्यावी लागली, हे येथे उल्लेखनीय होय.
१२५ किलो वजन गट फ्री स्टाईली अंतिम फेरीत गाठणार्‍या भारताच्या राजीव तोमर याला अंतिम फेरीत कॅनडाच्या कोरी जॉर्विसकडून मात खावी लागली. राजीवने उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या मर्क्युस कार्नी याच्यावर ११-१ गुणाने सहज मात केली होती.
युवा भारोत्तोलक विकास ठाकूर आणि नेमबाज हरप्रीतसिंह यांनी रौप्यपदक पटकावले. भारोत्तोलनात भारताने आतापर्यंत एकूण दहा पदके जिंकली आहेत. नेमबाजीतही भारताने अव्वल कामगिरी करीत आज पाच पदकांची कमाई केली आहे.
भारोत्तोलक विकास ठाकूर सुवर्णाकडे जात होता. पण क्लीन ऍण्ड जर्क प्रकारात त्याच्या पाठीला ताण पडल्याने त्याचे सुवर्ण निसटले. त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
विकास ठाकूर याने स्नॅचमध्ये १५० आणि क्लीन ऍण्ड जर्कमध्ये १८३ असे एकूण ३३३ किलोवजन उचलले. न्यूझीलंडच्या रिचर्ड पीटरसनला सुवर्ण (१५१ किलो स्नॅच आणि १८४ किलो क्लीन ऍण्ड जर्क) मिळाले. कॅनडाच्या पास्कल प्लोमोडोनला कांस्य मिळाले. पास्कल हा विकासपेक्षा वजनाने अधिक असलेला भारोत्तोलक ठरल्याने रौप्यपदक विकासकडे चालून आले.
हरप्रीतला रौप्य
भारताच्या हरप्रीतसिंह याने नेमबाजीतील २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्याने २१ गुण मिळविले. २३ गुण घेत ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड चॅपमन याने सुवर्ण आणि इंग्लंडचा क्रिस्टीआन कॅलघन याने १७ गुणांसह कांस्य मिळविले. लज्जा गोस्वामीला महिलांच्या ५० मी. रायफल थ्री पोझीशनमध्ये कांस्य पदकाचा मान मिळाला.
बॉक्सर विजेन्दरसिंह, देवेन्द्र अंतिम आठमध्ये
पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये भारताचा विख्यात बॉक्सर विजेन्दर याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा अन्य बॉक्सर देवेन्द्र याने अंतिम आठ स्पर्धकांत धडक दिली आहे. ऑलिम्पिक आणि विश्‍व कांस्यपदक प्राप्त विजेन्दरसिंह याने नामीबियाच्या मुजादजे कासुतो याला ३-० ने पराभूत करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. उपांत्यपूर्व फेरीत त्याला त्रिनिदाद ऍण्ड टोबॅगोच्या ऍरोन प्रिन्स याचेशी लढत द्यावी लागणार आहे. गत राष्ट्रकुल स्पर्धा दिल्लीत झाली होती. त्यात विजेन्दरसिंहने कांस्यपदक मिळविले होते. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर राहण्याचा मान मिळविलेल्या विजेन्दरसिंहने तीन फेर्‍यात जजकडून पूर्ण दहा गुणांची सतत कमाई करून घेतली. यावरूनच त्याचे ठोसे जबरदस्त पडल्याचे दिसून येते.
विजेन्दरसिंहच्या अगोदर भारताच्या देवेन्द्रसिंह याने अंतिम आठ स्पर्धकांत प्रवेश केला होता. त्याने श्रीलंकेच्या मदुशन गामागे याचा ४९ किलो वजन गटात २-१ ने पराभव केला. पण आशियाई विजेता भारताचा थापा याला ५६ किलो वजन गटात पराभव बघावा लागला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता आयर्लंडच्या मायकल कोनलान याच्याकडून तो ३०-२८ गुणांच्या फरकाने पराभूत झाला. अन्यथा आज भारताच्या बॉक्सरांचाही दिवस ठरला असता.
काल भारताच्या सुमित सांगवान याने उपांत्य फेरी गाठली होती. त्याने ८१ किलो लाईट हेवी वजन गटात मोहम्मद हकुमू फुमू याचा पराभव केला होता. उपांत्य फेरीत सांगवानची लढत न्यूझीलंडच्या डेव्हिसशी होणार आहे. भारताचा मनोजकुमारही अंतिम आठ स्पर्धकात दाखल झाला आहे. त्याने ६४ किलो वजन गटात कॅनडाच्या ऑर्थरचा २-० ने पराभव केला.
नारंग-राजपूत पदके
भारताचे नेमबाज गगन नारंग व संजीव राजपूत यांनी पुरुष गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक पटकाविले. पात्रता फेरीत नारंग दुसर्‍या व राजपूत चौथ्या स्थानी येऊन त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
ओमप्रकाश सहाव्या स्थानी
ऍथ्लेटिक्समधील गोळाफेक प्रकारात भारताचा ओमप्रकाश सहाव्या स्थानावर आला. त्याने केवळ १८.७३ मीटर अंतरापर्यंत गोळा फेकला. ओमची सर्वश्रेष्ठ फेकी १९.७४ मीटरपर्यंत होती, हे येथे विशेष. एक मीटर कमी अंतर गोळा फेकण्याचे कारण अखेरपर्यंत कळू शकले नाही. या स्पर्धेत जमैकाच्या रिचडर्‌‌स डेन याने २१.६१ मीटर गोळा फेकून सुवर्ण जिंकले. कॅनडाचा टिम नीडो दुसर्‍या स्थानी आला.
धावकांची निराशा
ऍथ्लेटिक्समधील महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत भारताची एमआर पूवम्मा पोचू शकली नाही. उपांत्य फेरीत ती ५२.३८ सेकंदाची वेळ देत पाचव्या स्थानी आली. महिलांच्या १०० मीटर दौडीतही श्रद्धा नारायण अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली.
पुरुषांच्या हॉकीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ४-२ गोलने पराभव केला. भारताची खाती आता दहा सुवर्ण, १५ रौप्य व १० कांस्य अशी एकूण ३५ पदके जमा झाली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14573

Posted by on Jul 30 2014. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2412 of 2479 articles)


  [gallery link="file" orderby="rand"] नेमबाजीत भारताच्या श्रेयसी सिंगने रविवारी महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक मिळवले. ...

×