richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » महाकवी मंगेश पाडगावकर कालवश

महाकवी मंगेश पाडगावकर कालवश

  • ‘शुक्र तारा’ निखळला
  • साहित्य क्षेत्रावर शोककळा

padgaonkar-mangeshमुंबई, [३० डिसेंबर] – ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राला प्रेमाची शिकवण देणारे आणि ‘मरण येणार म्हणून कुणी जगायचं थांबतं काय’ अशा शब्दांत आयुष्याची मजा घेत जगण्याचा संदेश देणारे महाकवी मंगेश पाडगावकर यांचे आज बुधवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. संपूर्ण महाराष्ट्र मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आनंदाने सज्ज असताना, महाराष्ट्र भूषण आणि पद्मभूषण मंगेश पाडगावकर यांच्या अकस्मात निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी सायन येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आला. ‘शुक्र तारा निखळला’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मंगेश पाडगावकर गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आज सकाळी नऊच्या सुमारास सायन येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी यशोदा पाडगावकर, मुलगा अजित, अभय व कन्या अंजली कुलकर्णी यांच्यासह सून, नातवंडे असा विशाल परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता वार्‍यासारखी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरली आणि त्यांच्यावर शतदा प्रेम करणार्‍यांचे मन अक्षरश: हेलावले. अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत निवासस्थानी ठेवण्यात आले होते. तिरंग्यात गुंडाळलेले त्यांचे पार्थिव सायन येथील स्मशानभूमीत आणण्यात आल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यावेळी त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेते आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मनाचा ठाव घेणारे शब्द, प्रेमभावना ओतप्रोत भरलेले काव्य अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार्‍या महाकवीच्या ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’, ‘सांगा कसं जगायचं’, ‘जेव्हा तुझ्या बटांना’ यासारख्या कविता रसिक वाचकांना लाभल्या आहेत. धारानृत्य, जिप्सी, सांग सांग भोलानाथ यासारख्या अनेक कवितासंग्रहांमुळे पाडगावकर आबालवृद्धांचे लाडके झाले होते.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या विषयांत एम. ए. केले. काही काळ ते मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. १९४३ मध्ये त्यांनी पहिल्या कवितेचे लिखाण केले. १९५० मध्ये त्यांच्या ‘धारानृत्य’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे, छोरी शर्मिष्ठा, उत्सव अशा अनेक काव्यसंग्रहांना रसिकांचे भरभरून प्रेम मिळाले. १९७० ते १९९० या काळात त्यांनी मुंबईतील अमेरिकन माहिती सेवेत संपादक म्हणून काम केले होते. १९६० ते १९७० या काळात विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्याप्रमाणेच पाडगावकर यांनीही कविता वाचनांचे विविध कार्यक्रम सादर केले. अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांनी गीत दिले आहेत. गायक अरुण दाते यांनी गायलेले ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली…’ आणि ‘शुक्रतारा मंद वारा…’ ही त्यांची गाणी अजूनही रसिकांच्या ओठांवर आहेत.
जगण्यावर शतदा प्रेम करणारा कवी हरपला – मुख्यमंत्री
ज्येष्ठ कवी आणि महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर यांच्या निधनाने मराठी कविता सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणारा आणि तरुणाईच्या भावनांना शब्दरूप देणारा कवी हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मराठी कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात मंगेश पाडगावकर यांचे मोठे योगदान आहे. मराठी कवितेच्या सादरीकरणाला व्यापक परिमाण देतानाच ती खर्‍या अर्थाने लोकप्रिय केली. त्यांची कविता जशी उत्कट प्रेमभावना समर्थपणे व्यक्त करण्यात यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे ती प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच्या धगधगत्या विद्रोहाचे प्रतीकही होती. सत्तरीच्या दशकातील त्यांची ‘सलाम’ ही कविता याच भावनेचा प्रभावी अविष्कार आहे. त्यांनी इतर भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचाही प्रभावी अनुवाद करून मराठी साहित्यविश्‍व समृद्ध केले. रसिकांच्या मनाचा ठाव घेणार्‍या ‘या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे’ अशा अवीट गीतांसह बालकुमारांना रिझविणार्‍या ‘सांग सांग भोलानाथ’ यासारख्या नितांतसुंदर रचनाही त्यांनी रचल्या. कवितेतील रसिकता त्यांनी जगण्यातही जोपासली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26341

Posted by on 11:09 pm. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google