richwood
richwood
richwood
Home » छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » रामनाथ कोविंद यांची उमेदवारी दाखल

रामनाथ कोविंद यांची उमेदवारी दाखल

नवी दिल्ली, २३ जून – रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, केेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू, लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
रामनाथ कोविंद यांच्यावतीने उमेदवारी अर्जांचे चार संच सादर करण्यात आले. त्यावर सूचक म्हणून नरेंद्र मोदी, अमित शाह, शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. प्रत्येक अर्जावर अनुमोदक आणि समर्थक म्हणून भाजपा आणि रालोआतील ६० नेत्यांनी सह्या केल्या आहेत.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवरदास, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, आसामचे मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी उपस्थित होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यावेळी अनुपस्थित होते.
पदाची शान राखणार : कोविंद
राष्ट्रपतिपद हे राजकारणाच्या पलीकडचे आहे. या पदाची प्रतिष्ठा राखण्याचा आपण प्रयत्न करु, अशी ग्वाही रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना दिली. डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या गौरवशाली कार्यकाळाचा दाखला देत रामनाथ कोविंद म्हणाले की, राष्ट्रपतिपद हे नेहमीच पक्षीय राजकारणाच्या वर राहिले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे, आणि त्यादृष्टीने मी प्रयत्न करेल. ज्यावेळी मी राज्यपाल झालो, तेव्हापासून मी कोणत्याच पक्षाचा नव्हतो, तसेच राष्ट्रपतींचेही आहे, राष्ट्रपती कोणत्याच पक्षाचे नसतात, तर देशाचे असतात.
येत्या काही वर्षात देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे, त्यानिमित्त भारतनिर्माणाचे स्पप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करु. १२५ कोटी लोकसंख्येचा भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, असे स्पष्ट दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत
करत या लोकशाहीत राष्ट्रपतिपदाची आपली वेगळी प्रतिष्ठा आहे, ती कायम राखण्याचा मी प्रयत्न करेन, असे कोविंद म्हणाले.
राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, रालोआच्या सर्व घटक पक्षांनी आपल्याला मतदान करावे, असे आवाहन कोविंद यांनी केले. राष्ट्रपती तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च सेनापती असतात, याकडे लक्ष वेधत देशाच्या सीमांचे रक्षण करणे, ही आपली सर्वोच्च प्राथमिकता राहील, असे ते म्हणाले.
आमचा लढा तात्त्विक : मीरा कुमार
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील आमची लढाई तात्त्विक आहे, असे विरोधी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज सांगितले. १७ राजकीय पक्षांनी मला या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्यांचे मी आभार मानते. ही लढाई तात्त्विक असल्याने देशाच्या हितासाठी मतदारांनी निर्णय घ्यावा, असे आवाहनही मीरा कुमार यांनी केले.
शिवसेनेची अनुपस्थिती
रामनाथ कोविंद यांचा उमेदवारी अर्ज भरतांना रालोआतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेची अनुपस्थिती आज चर्चेचा विषय होता. विशेष म्हणजे शिवसेनेने बुधवारीच त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. एवढेच नाही तर त्यांच्या उमेदवारी अर्जावर खा. आनंदराव अडसूळ आणि खा. संजय राऊत यांनी स्वाक्षर्‍याही केल्या होत्या. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत जाऊन शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेनेच्या अनुपस्थितीची संसदभवन परिसरात जोरात चर्चा होती.(तभा वृत्तसेवा)

Short URL: http://vrittabharati.in/?p=34800

Posted by on 1:00 am. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google