Home » आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » सर्वानंद सोनोवाल : विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री

सर्वानंद सोनोवाल : विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री

sarbanand sonowalगुवाहाटी, [१९ मे] – विद्यार्थी चळवळीत काम करण्यापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारणारे भाजपाचे आसाम विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल यांचा राजकीय प्रवास थक्क करून टाकणारा आहे.
स्वच्छ प्रतिमेचे ५४ वर्षीय सोनोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्‍वासातील असून त्यामुळेच आसाम विधानसभा निवडणुकीत त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले. २०११ मध्ये भाजपात प्रवेश करणार्‍या सोनोवाल यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर केंद्रीय मंत्रिपद भूषविण्याची संधी मिळाली. विधानसभा निवडणुकीत सोनोवाल यांनी कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या हेमंत बिस्व सर्मा यांच्यासह सर्वांनाच विश्‍वासात घेऊन ईशान्य भारतात प्रथमच भाजपाला स्वबळावर सत्ता मिळवून देत नवा इतिहास लिहिला.
सर्वानंद सोनोवाल यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. १९९२ ते १९९९ या कालावधीत ऑल आसाम स्टुडंट्‌स युनियन (आसू) या विद्यार्थी चळवळीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. राज्यातील विद्यार्थी राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा असलेले सोनोवाल कायद्याचे पदवीधर असून, १९९६ ते २००० या काळात त्यांनी नॉर्थ ईस्ट स्टुडंट्‌स ऑर्गनायझेशनचे (एनईएसओ) अध्यक्षपदही भूषविले.
अपेक्षेप्रमाणे आसूमधून त्यांनी २००१ मध्ये आसाम गण परिषदेत प्रवेश केला आणि त्याच वर्षी अप्पर आसामच्या मोरान विधानसभा मतदारसंघातून आगपचे उमेदवार म्हणून ते निवडून आले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेस उमेदवार व केंद्रीय मंत्री पवनसिंह घाटोवार यांचा पराभव करून ही जागा खेचून आणली. परंतु, २००९ साली याच मतदारसंघात घाटोवार यांनी सोनोवाल यांचा पराभव करून वचपा काढला. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे जानेवारी २०११ मध्ये सोनोवाल यांनी आगपला रामराम ठोकला आणि फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. २०१२ मध्ये सोनोवाल यांची प्रदेश भाजपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची संख्या आधीच्या चार वरून सातवर नेण्याचे श्रेय सोनोवाल यांनाच देण्यात आले. शिवाय डिबु्रगड आणि जोरहट या लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून चहासाठी प्रसिद्ध असलेल्या अप्पर आसाममध्येही त्यांनी पक्षाला पोहोचविले.
लोकसभा निवडणुकीत लखीमपूर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर सोनोवाल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली. ३१ ऑक्टोबर १९६२ रोजी सोनोवाल-काचारी आदिवासी समुदायात जन्माला आलेले सोनोवाल अविवाहित असून, उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. सोनोवाल यांना फुटबॉल, क्रिकेट आणि बॅडमिंटनची आवड आहे. बांगलादेशींच्या घुसखोरी विरोधातही ते सातत्याने लढा देत आले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28330

Posted by on May 19 2016. Filed under आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसाम, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (321 of 2477 articles)


अहमदाबाद, [१८ मे] - गुजरातच्या गोध्रा जिल्ह्यात २००२ मध्ये ट्रेनला आग लावून ५९ कारसेवकांचे बळी घेणारा या जळीत कांडातील मुख्य ...

×