Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अशोक सिंघल यांचे देहावसान

अशोक सिंघल यांचे देहावसान

=श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील तेजस्वी तारा निखळला, आज अंत्यसंस्कार=
singhal_ASHOKनवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] – विश्‍व हिंदू परिषदेचे संरक्षक, आक्रमक पण संयमी हिंदुत्ववादी आणि श्रीरामजन्मभूमी आंदोलनामुळे देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात आपली ओळख निर्माण करणारे कारसेवकांचे पथदर्शी नेते अशोकजी सिंघल यांचे मंगळवारी दुपारी गुडगावच्या मेदांता मेडिसिटी रुग्णालयात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. सिंघल यांच्या निधनाचे वृत्त पसरताच संपूर्ण देशात शोककळा पसरली. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील तेजस्वी तारा निखळला, तसेच श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारणे हीच या सच्च्या रामभक्ताला खरी श्रद्धांजली राहील, अशा प्रतिक्रिया सर्वस्तरातून व्यक्त होत आहेत.
अशोक सिंघल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि गुडगावच्या मेदांतामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी दुपारी २.२४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अशोक सिंघल यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
अशोक सिंघल यांचे पार्थिव विश्‍व हिंदू परिषदेच्या रामकृष्णपुरम् येथील मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, उद्या बुधवारी दुपारी ३ वाजता निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अशोक सिंघल अलाहाबाद येथे गेले असता त्यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागला, त्यामुळे स्थानिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने २० ऑक्टोबरच्या रात्री गुडगावच्या मेदांता मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्‍वसनाचा त्रास तर दोन दिवसांत बरा झाला, पण पोटात जंतूसंसर्ग झाल्यामुळे सिंघल यांना बरेच दिवस रुग्णालयात राहावे लागले. १२ नोव्हेंबरला रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर ते द्वारका येथे आपल्या पुतण्याच्या निवासस्थानी गेले होते. मात्र, १४ नोव्हेंबरला रात्री उशिरा पुन्हा श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना मेदांतात दाखल करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांची चमू त्यांच्यावर उपचार करत होती. सोमवारी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणाही झाली, त्यांनी दोन वेळा डोळे उघडले, त्यांचा रक्तदाबही सामान्य झाला होता, पण मंगळवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी माजी उपपंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मेदांता रुग्णालयात अशोक सिंघल यांची भेट घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जाणार होते. पण, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंघल रुग्णालयात असताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, केंद्रीय मंत्री उमा भारती, हरयाणाचे राज्यपाल प्रो. कप्तानसिंह, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, रामजन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया, संघटन महामंत्री दिनेशचंद्र, संयुक्त महासचिव विनायकराव देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सिंघल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
अशोक सिंघल यांनी ९० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त राजधानी दिल्लीत १ ऑक्टोबरला झालेल्या एका भव्य समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांच्यावरील गौरवग्रंथांचे विमोचनही करण्यात आले होते. यावेळी भारतमाता मंदिरचे स्वामी सत्यमित्रानंद, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, विहिंपचे केंद्रीय अध्यक्ष राघव रेड्डी उपस्थित होते. याच कार्यक्रमात विहिंपचे माजी अध्यक्ष विष्णू हरी डालमिया यांनी केंद्र सरकारने अशोक सिंघल यांना राममंदिराची भेट द्यावी, अशी मागणी केली होती.
या सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना सिंघल यांनी केलेले भाषण अखेरचेच ठरले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25525

Posted by on Nov 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1219 of 2453 articles)


=मणिशंकर अय्यरांची मुक्ताफळे= नवी दिल्ली, [१७ नोव्हेंबर] - केंद्रासह अनेक राज्यांतील सत्ता गमावल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या कॉंगे्रसी नेत्यांमध्ये आता मणिशंकर ...

×