richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » असहिष्णुतेवरील चर्चेतून लोकसभेत गदारोळ

असहिष्णुतेवरील चर्चेतून लोकसभेत गदारोळ

=मोहम्मद सलीम यांच्या विधानावर राजनाथसिंह यांचा तीव्र आक्षेप=
loksabhaनवी दिल्ली, [३० नोव्हेंबर] – असहिष्णुतेवर सुरू असलेल्या चर्चेत माकपचे मोहम्मद सलीम यांच्या एका विधानावरून लोकसभेत आज सोमवारी चांगलाच गदारोळ झाला. या मुद्यावरून सभागृहाचे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे सलीम यांच्यावर भडकले. सलीम यांनी आपले विधान मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी बाजूचे सदस्य करीत होते. मात्र सलीम यांनी माफी मागण्यास नकार दिला.
नियम १९३ अन्वये लोकसभेत असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना डाव्या पक्षाचे मोहम्मद सलीम यांनी एका मासिकातील लेखाचा उल्लेख करीत राजनाथसिंह यांच्यावर आरोप केला. सलीम यांच्या या विधानावर सभागृहात उपस्थित असलेले राजनाथसिंह यांनी आक्षेप घेतला. आपण असे विधान कधीच केले नाही, असे ते म्हणाले. सलीम यांच्या खोडसाळ विधानावर भाजपा सदस्यही आक्रमक झाले. सलीम यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपा सदस्य करीत होते, तर माफी मागण्यास सलीम तयार नव्हते. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, सलीम यांनी ज्या विधानाचा उल्लेख केला, ते विधान राजनाथसिंह यांनी केलेले नाही, तर नुकतेच दिवंगत झालेले विहिंपचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांनी केले होते.
माझ्या सांसदीय जीवनात आज मी जेवढा व्यथित झालो, तेवढा याआधी कधीच झालो नाही, याकडे लक्ष वेधत राजनाथसिंह म्हणाले की, हा खोडसाळ आरोप आहे. एकतर सलीम यांनी पुरावे द्यावे, वा माफी मागावी, अशी मागणी राजनाथसिंह यांनी केली. सलीम यांनी उल्लेख केलेले विधान कोणताही गृहमंत्री करीत असेल, तर त्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. या मुद्यावर राजनाथसिंह एकीकडे अतिशय संतप्त झाले होते, तर दुसरीकडे भावूकही. मात्र सलीम यांनी माफी मागण्यास नकार देत या मासिकातील संबंधित परिच्छेद वाचून दाखविला. राजनाथसिंह यांच्या विधानाचा त्या मासिकाने विपर्यास केला असेल, तर त्यांनी त्या मासिकावर कायदेशीर कारवाई करावी, असे आव्हान सलीम यांनी दिले. सभागृहातील गोंधळ वाढल्यामुळे सभापती सुमित्रा महाजन यांनी सभागृहातील कामकाज स्थगित केले. नंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सलीम यांनी माफी मागावी, यावर भाजपा सदस्य ठाम होते, तर माफी मागण्यास सलीम तयार नव्हते. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण तयार होत होते. त्यामुळे पुन्हा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.
भारत सांस्कृतिकृष्ट्या सहिष्णू देश आहे. भारत सहिष्णू देश असल्यामुळे भारताने धर्मनिरपेक्ष राहावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे मोहम्मद सलीम यांनी चर्चेला सुरुवात करताना म्हटले होते. देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून असहिष्णुता वाढली असल्याचा आरोपही सलीम यांनी केला. आपल्या भाषणातून सलीम यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याचे राजकारण करू नका, तुम्हाला संघर्ष करायचा असेल तर बेरोजगारीविरुद्ध, गरिबीविरुद्ध करा, असे ते म्हणाले. भाजपा सदस्य भाषणावर आक्षेप घेत असल्यामुळे सलीम अतिशय संतप्त झाले, तुम्ही मला, मारालच ना, तर मारा, पाहिजे तर फासावर लटकवा, असे आव्हान सलीम यांनी दिले.
आपल्या भाषणात सलीम यांनी ‘गदर’ शब्दाचा उल्लेख करताच सुमित्रा महाजन यांनी त्यांना थांबवले. सांसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनीही सलीम यांच्या विधानावर तीव्र हरकत घेतली. सलीम आपले विधान मागे घेत नसतील, तर आम्हाला सभागृहात बसणे कठीण होईल, असे रुडी म्हणाले. या विधानाची सत्यता जोपर्यंत पडताळून पाहिली जात नाही, तोपर्यत तरी सलीम यांनी हे विधान मागे घ्यावे, अशी मागणी रुडी यांनी केली. अखेर सुमित्रा महाजन यांनी सलीम यांनी केलेले आणि वादाला कारणीभूत ठरलेले विधान कामकाजातून वगळले.
तत्पूर्वी, सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी असहिष्णुतेच्या मुद्यावर चर्चेला सुरुवात केली. असहिष्णुतेच्या मुद्यावर सरकार चर्चेला तयार आहे, याकडे लक्ष वेधत नायडू म्हणाले की, या मुद्यावर व्यापक धोरण तयार करण्याची निकड उत्पन्न झाली आहे. देशातील वातावरण खराब करणार्‍या लोकांवर आणि असे वातावरण निर्माण करणार्‍यांना प्रोत्साहन देणार्‍या मासिकांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असे नायडू म्हणाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25896

Posted by on 2:36 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google