richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आता वीरेंद्रकुमार यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ

आता वीरेंद्रकुमार यांच्या विधानावरून लोकसभेत गदारोळ

=कारवाई होईपर्यंत कामकाजावर कॉंग्रेसचा बहिष्कार=
loksabhaनवी दिल्ली, [१० डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्डच्या मुद्यावरून आज गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज तीनदा स्थगित करावे लागले. भाजपा सदस्य वीरेंद्रकुमार यांच्या विधानावरूनही लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे उपहारापूर्वी एकदा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. सरकारचा निषेध करत लोकसभेत कॉंग्रेस आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्यागही केला.
लोकसभेत कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. भाजपाचे वीरेंद्रकुमार यांनी बुधवारी सभागृहात केलेल्या वक्तव्यामुळे कॉंग्रेसचे सदस्य संतप्त झाले होते. वीरेंद्रकुमार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी वीरेंद्रकुमार यांनी माफी मागण्याची आणि ते तयार नसल्यास त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.
वीरेंद्रकुमार बुधवारी बोलत असताना सभागृहात उपस्थित असलेल्या व्यंकय्या नायडू यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही, असाही आरोप खडगे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना नायडू म्हणाले, व्यक्तिगत आरोपांचे कधीच समर्थन करता येणार नाही, मात्र हा प्रकार दोन्ही बाजूने पाळला गेला पाहिजे. वेलमध्ये येऊन पंतप्रधानांच्या विरोधात नारेबाजी करणे, त्यांना हिटलर संबोधणे योग्य नाही, याकडे नायडू यांनी लक्ष वेधले. उपसभापतींच्या दिशेने कागदाचे तुकडे भिरकावणे आक्षेपार्ह असल्याचा आरोपही नायडू यांनी केला. कॉंग्रेसला या मुद्यावर दुटप्पी भूमिका घेता येणार नाही, असे ते म्हणाले.
नायडू बोलत असताना कॉंग्रेसच्या सदस्यांची घोषणबाजी सुरुच होती. सभागृहात जे काही सुरू आहे, ते योग्य नाही, असे मी आधीही म्हटले होते, सभागृहात कुणाच्याही विरोधात वैयक्तिक टीका करणे योग्य नाही, असे सांगत सभापती सुमित्रा महाजन यांनी वीरेंद्रकुमार यांचे विधान कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर यानंतर असे विधान करू नका, अशी तंबीही वीरेंद्रकुमार यांना दिली.
तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनीही वीरेंद्रकुमार यांच्या विधानाचा निषेध केला. मात्र सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे सभापतींनी कामकाज २० मिनिटांसाठी स्थगित केले. यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते.
आपल्याला शेतकर्‍यांचा कळवळा आहे, असा आव ज्योतिरादित्य शिंदे आणि राहुल गांधी आणतात, मात्र त्यांना ज्वारी आणि बाजरीतील फरक समजत नाही, असा आरोप दुष्काळावरील चर्चेत बोलताना भाजपाचे वीरेंद्रकुमार यांनी बुधवारी केला होता. एक गरीब माणूस देशाचा पंतप्रधान झाला, याचे कॉंग्रेसला दु:ख आहे. हे पद फक्त गांधी आणि नेहरू घराण्यासाठी असल्याची कॉंग्रेस नेत्यांची धारणा आहे, असा आरोपही वीरेंद्रकुमार यांनी केला होता. राहुल गांधी आणि ज्योतीरादित्य शिंदे यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधानही वीरेंदकुमार यांनी केले.
कामकाज पुन्हा सुरू होताच कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले आणि वीरेंद्रकुमार यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली. विरोधकांना अपमानित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप खडगे यांनी केला. जोपर्यंत वीरेंद्रकुमार माफी मागत नाहीत वा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असे सांगत खडगे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. ही परिस्थिती हाताळण्यात संसदीय कामकाज राज्यमंत्री कमी पडले, सदस्यांनी खेद व्यक्त करण्यात काहीच गैर नाही, असे सांगत कॉंग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा देत तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात तृणमूलच्या सदस्यांनीही सभात्याग केला. भाजपा सदस्याचे वादगृस्त विधान कामकाजातून वगळण्यात आले आहे, याकडे संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी लक्ष वेधले. वादग्रस्त विधान करणार्‍या सदस्याला अध्यक्षांनी माफी मागण्यास सांगावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तारिक अन्वर यांनी केली. गेल्या दोन दिवसांत गोंधळात विधेयके पारित केली जात आहेत, हा प्रकार योग्य नाही. विधेयक पारित करण्यासाठी विरोधकांनीही विश्‍वासात घेण्यात यावे, अशी मागणी माकपचे मोहम्मद सलीम यांनी केली. व्यंकय्या नायडू यांनी सलीम यांच्या सूचनेचे स्वागत केले. चर्चेशिवाय कोणतेही विधेयक पारित केले जाऊ नये, अशी मागणी बिजदचे भतृर्हरी मेहताब यांनी केली. कॉंग्रेस सदस्यांच्या आचरणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. वीरेंद्रसिंह यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नसल्याचे मेहताब यांनी स्पष्ट केले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26109

Posted by on 3:50 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google