Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » आता सहिष्णुतेने संसद चालवा

आता सहिष्णुतेने संसद चालवा

=व्यंकय्या नायडू यांचे विरोधकांना आवाहन=
Venkaiah-Naidu2बंगळुरू, [१३ नोव्हेंबर] – विरोधकांनी सहिष्णुता दाखविली आणि संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत चालू दिले, तर देशातील कथित असहिष्णुतेसह कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे, असे संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपाचा पराभव हा संसदेची कोेंडी करण्याचा मुद्दा ठरूच शकत नाही. निवडणुकीचे निकाल आपण सर्वांनीच मान्य केल्यानंतर तो मुद्दाही आता इतिहासजमा झाला असल्याने, त्यावरून संसदेत गोंधळ घालू नका. तुमची इच्छा असेल, तर देशातील कथित असहिष्णुतेवर चर्चा करू शकता. सरकारची तयारी आहे. पण, त्यासाठी तुम्हाला (विरोधक) स्वत:तील सहिष्णुतेचे दर्शन घडवावे लागेल आणि संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे लागेल, असे नायडू यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले.
पक्षाच्या व्यासपीठावरच मते मांडा
भाजपाला आणि देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला असला, तरी त्यासाठी पंतप्रधान जबाबदार नाहीत. व्यवस्थापनात काहीतरी उणिवा राहिल्या. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठांना यावर काही बोलायचेच असेल, तर त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावरच बोलायला हवे, असे मतही व्यंकय्या नायडू यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
बिहारमधील पराभवावर पक्षातील ज्येष्ठांनी जे मत व्यक्त केले आणि ज्या सूचना केल्या, त्याची पक्ष नक्कीच दखल घेईल आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल, असे सांगताना नायडू म्हणाले की, आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. पण, हे मुद्दे जाहीरपणे उपस्थित न करता, पक्षाच्या व्यासपीठावर मांडले असते, तर अधिक बरे झाले असते. त्यांच्या या भूमिकेविषयी आम्हाला नाराजी नाही. त्यांनी मांडलेल्या मुद्यांची गंभीरपणे दखल घेतली जाईल.
ज्येष्ठांच्या सूचनांसह सर्वच मुद्यांवर आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. भाजपा संसदीय मंडळानेही या मुद्यांसह पक्षाच्या व्यूहरचनेत राहिलेल्या उणिवांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव का झाला, यामागील प्रत्येक कारण आणि घटकाचा शोध घेऊन त्यावर मंथन होणार आहे, असे सांगताना नायडू म्हणाले की, २००९ नंतर भाजपाने आपल्या कामगिरीत सातत्याने सुधारणा केली आहे. नरेंद्र मोदी हे भाजपा आणि देशाकरिता सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि सक्षम नेतृत्व सिद्ध झाले आहेत. पक्ष आणि देश दोघांनाही त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. देशासह जगभरातच भारताचा मानसन्मान वाढविण्यात, सर्वांना अभिमान वाटावा अशा उंचीवर भारताला नेण्यात नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. देशात गेल्या ३० वर्षांच्या काळात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. पण, मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने गेल्या वर्षी लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यांच्याच नेतृत्वात भाजपा महाराष्ट्र, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि हरयाणातही सत्तेवर आली असून, आसाम, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, बंगळुरू, अंदमान निकोबार आणि लडाखमध्येही भाजपाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे, याकडेही नायडू यांनी लक्ष वेधले.
यावेळी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही पाठराखण केली. पक्षाची व्यूहरचना तयार करण्यात आणि प्रचाराचे योग्य नियोजन करण्यात शाह यांची भूमिका महत्त्वाची होती. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. पण, यासाठी आम्ही कधीच एका व्यक्तीला जबाबदार ठरविले नाही. जय-परायजाची जबाबदारी सामूहिकपणे उचलली आहे. विजय मिळाल्यानंतर पक्षाला श्रेय देण्याची आणि पराभवाचे खापर नेत्यावर फोडण्याची भाजपाची संस्कृती नाही, असेही नायडू यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25422

Posted by on Nov 14 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1249 of 2453 articles)


=नितीशकुमारांचे मुख्यमंत्रिपद नाममात्र= नवी दिल्ली, [१३ नोव्हेंबर] - बिहारमध्ये महाआघाडी दोन तृतियांश बहुमताने सत्तेवर आली आणि नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदी कायम ...

×