Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » आपच्या संयोजकपदी केजरीवाल यांची फेरनिवड

आपच्या संयोजकपदी केजरीवाल यांची फेरनिवड

arvind kejriwalनवी दिल्ली, [२३ नोव्हेंबर] – पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात राजद नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्यामुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज सोमवारी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक म्हणून फेरनिवड करण्यात आली.
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत केजरीवाल यांची राष्ट्रीय संयोजक म्हणून एकमताने दुसर्‍यांदा निवड करण्यात आली. राष्ट्रीय संयोजक म्हणून केजरीवाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ उद्या संपत होता.
पक्षाचे आमदार अजेश यादव यांच्या अलिपूर येथील फार्म हाऊसवर आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. निमंत्रणावरून ही बैठक वादळी ठरली. पक्षाच्या अनेक संस्थापक सदस्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात न आल्यामुळे बैठकस्थळी अनेकांनी निदर्शने केली. केजरीवाल विरोधकांनी यावेळी हातात फलक घेत जोरदार घोषणबाजीही केली.
तीन दिवस आधी बैठकीची सूचना काढण्यात आली, अनेक सदस्यांना ही सूचना मिळाली नाही, असा आरोप यावेळी कार्यकर्ते करीत होते. केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे संस्थापक सदस्य शांतीभूषण यांच्यासह अनेकांनी जोरदार हल्ला चढवला. केजरीवाल मनमानीपणे पक्ष चालवत असल्याचा आरोप अनेक असंतुष्ट नेत्यांनी केला. राष्ट्रीय परिषदेतून कोणालाही निलंबित करण्याचा अधिकार फक्त लोकपालचाच आहे, अन्य कोणालाच नाही, असा दावाही यावेळी करण्यात आला.
मागील राष्ट्रीय कार्यकारिणीत २४ सदस्य होते, नंतर ही संख्या १४ वर आणण्यात आली. ३०० सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेतीलही अनेक जागा रिक्त आहेत. राष्ट्रीय परिषदेतील फक्त १४ जणांचाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश आहे. आम आदमी पार्टीचे ७ आमदार राष्ट्रीय परिषदेत असून, त्यांनाच फक्त मतदानाचा अधिकार आहे.
२०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या (पंतप्रधानपदाच्या) रेसमध्ये आपण नसल्याचा खुलासा केजरीवाल यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना केला. सत्तेच्या राजकारणासाठी आम्ही नाही, असे स्पष्ट करीत केजरीवाल म्हणाले की, अनेकजण आम्हाला विचारतात की, तुम्ही २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेत आहात का, त्याचे उत्तर आहे, आम्ही कोणत्याही स्पर्धेत नाही.
निवडणुकीच्या राजकारणामागे लागू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करताना केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत जशी संधी आम्हाला होती, तशीच संधी पंजाबमध्येही आहे. दिल्लीतील विजय हा एक चमत्कार होता, तसाच चमत्कार आपल्याला पंजाबमध्येही घडवायचा आहे, मात्र त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, असे केजरीवाल म्हणाले. भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्यात केजरीवाल यांनी लालूप्रसाद यादव यांची गळाभेट घेतल्याच्या मुद्यावरून भाजपासह अनेकांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला चढविला. भाजपाने तर दोघांच्या गळाभेटीचे होर्डिग्ज लावले. स्वत:ला भ्रष्टाचाराचे विरोधक म्हणविणार्‍या केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या लालूप्रसादांची गळाभेट घेतल्याच्या मुद्यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. त्याचा खुलासा करताकरता केजरीवाल यांची दमछाक होत आहे. मी नाही तर लालूप्रसाद यादव यांनीच जबरदस्तीने आपली गळाभेट घेतल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. मी हस्तांदोलन करत असताना त्यांनी जबरदस्तीने मला आपल्याजवळ ओढले, असा खुलासा केजरीवाल यांनी केला आहे. मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, त्यामुळे लालूप्रसादांच्याही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले. लालूप्रसादांच्या पक्षाशी आपली युती किंवा आघाडी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25674

Posted by on Nov 24 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1171 of 2452 articles)


=डॉ. मोहनजी भागवत यांचे आवाहन= [gallery ids="25672,25671"] नवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] - अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प अशोक ...

×