Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » कर्जमाफी नाही तर कामकाज नाही: कॉंग्रेसचा हेका

कर्जमाफी नाही तर कामकाज नाही: कॉंग्रेसचा हेका

=सरकार चर्चेला तयार, तर कॉंग्रेसला मोर्चात जाण्याची घाई=
vidhanbhavan ngpनागपूर, [८ डिसेंबर] – हिवाळी अधिवेशनाचा विधानसभेतील दुसरा दिवस आगळावेगळा ठरला. साधारणत: विरोधी पक्ष ज्या चर्चेची मागणी करतात, त्या चर्चेचा प्रस्ताव खुद्द सत्ताधारी पक्षानेच ठेवला होता; पण विरोधकांना चर्चा नको होती. मोर्चाला जाता आले पाहिजे म्हणून सभागृहाची तहकुबी हवी होती आणि शेवटी आपली तहकुबीची मागणी पदरात पाडूनच कॉंग्रेसचे आमदार मोर्चाकडे रवाना झाले.
सभागृहात ठीक ११ वाजता अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे आगमन होताच, विरोधी बाकांवरून सरकारच्या निषेधाचे आवाज येऊ लागले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करणारे फलक आणि सोबतीला घोषणा… अशा गदारोळात अध्यक्षांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला आणि प्रश्‍न क्रमांकाची घोषणा केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हस्तक्षेप करून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाविषयी, राज्यातील दुष्काळाबाबत सरकारची भूमिका काय, असा प्रश्‍न उपस्थित करून प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करून चर्चेची मागणी केली. अध्यक्ष प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर चर्चा घेऊ, असे सांगत असताना शिवसेनेचे जळगावचे आमदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या आक्रमक शैलीत सांगितले की, नियम २९३ अन्वये सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे. त्यावेळी जे काही बोलायचे ते बोला. विरोधी पक्षांना दुष्काळाची एवढी काळजी आहे, तर त्यांनी या चर्चेत भाग घ्यावा. खरे तर, यांना शेतकर्‍यांचे आणि दुष्काळाचे काहीही करायचे नाही. त्यांना मोर्चात जायचे आहे. म्हणून हा गोंधळ घालणे सुरू आहे.
गुलाबरावांच्या या तडाख्याने सभागृहात पुन्हा गोंधळ सुरू झाला.
त्यातच राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील बोलायला उभे झाले. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाने स्वत:च्या कौतुकासाठी ही चर्चा घेतली आहे. शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी नाही. तशी त्यांची भावनाच नाही.
जयंत पाटलांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ खडसे उठले आणि म्हणाले, चर्चा करा. आम्ही तयार आहोत. आत्ता हवी असेल तरी आम्ही तयार आहोत. अध्यक्षांना विनंती आहे की, त्यांनी ताबडतोब ही चर्चा सुरू करावी.
पण, कॉंग्रेस सदस्यांना चर्चा नकोच होती. त्यांना सभागृह तहकूब हवे होते. त्यामुळे ते चर्चा टाळू लागले. अध्यक्षांना कामकाज करणे शक्य होऊ नये, म्हणून कॉंग्रेस सदस्य हौदात उतरले आणि घोषणांचा आवाज वाढविला. सोबतीला फलक होतेच. अध्यक्षांनी फलक बाहेर न्या म्हटले तरी ते कुणी ऐकले नाही.
अध्यक्षांनी प्रश्‍न क्रमांक पुकारला. तीन प्रश्‍न पुकारण्यात आले. पण, गोंधळात कुणाला काही ऐकू गेले नाही. शेवटी ११ वाजून १० मिनिटांनी सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. दुसर्‍यांदा सभागृह सुरू होताच, पुन्हा तेच दृश्य होते. गोंधळ सुरू असतानाच विखे पाटील भाषण करू लागले. तेच ते मुद्दे पुन्हा पुन्हा सांगून सभागृहाचा वेळ वाया घालवू लागले.
अध्यक्ष बागडे मात्र वारंवार प्रश्‍नोत्तराचा तास पूर्ण होऊ द्या म्हणून आवाहन करीत राहिले. शेवटी कुणीच ऐकत नसल्याचे बघून सभागृह १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. म्हणजे प्रश्‍नोत्तराचा तास गोंधळ आणि स्थगिती यांच्यात वाया गेला.
१२ नंतर तरी कॉंग्रेस सदस्य कामकाज होऊ देतील अशी अपेक्षा होती. पण तीही फोल ठरली. सर्वांना वाटले की, आता कॉंग्रेस सदस्य मोर्चात जातील. पण तसे न घडता, १२ नंतर सभागृह सुरू होताच कॉंग्रेस सदस्य सभागृहात उपस्थित झाले. पुन्हा गोंधळ सुरू झाला. आता त्यांची मागणी होती कर्जमाफी झालीच पाहिजे! कर्जमाफी नाही तर कामकाज नाही!
विजय वडेट्टीवारांनी चर्चेला नकार देत आता केवळ कर्जमाफीची घोषणा हवी, असे सांगून अध्यक्षांना कामकाज पुढे नेण्यात कुठलेही सहकार्य करण्यास नकार दिला.
शेवटी आवश्यक सरकारी कामकाज घोषणांच्या गदारोळात पूर्ण करण्यात आले आणि नंतर अध्यक्षांनी कामकाज बुधवार सकाळी ११ पर्यंत तहकूब केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26053

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1059 of 2451 articles)


=विधान परिषदेत गाजली स्थगिती, सभापतींच्या इशार्‍यानंतरही सदस्यांचा गदारोळ सुरूच= नागपूर, [८ डिसेंबर] - अवघ्या एका तासात दोनदा स्थगिती, हे नागपुरात ...

×