richwood
richwood
richwood
Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » केंद्राच्या सहमतीशिवाय गुन्हेगारांना क्षमा नाही

केंद्राच्या सहमतीशिवाय गुन्हेगारांना क्षमा नाही

=सुप्रीम कोर्टाचा तामिळनाडू सरकारला झटका=
supreme_courtनवी दिल्ली, [२ डिसेंबर] – सीबीआयसारख्या केंद्रीय तपास संस्थांनी दोषी ठरविलेल्या आरोपींना केंद्राच्या सहमतीशिवाय क्षमायाचना करण्याचा राज्य सरकारांना अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना क्षमा करण्याचा निर्णय घेणार्‍या तामिळनाडू सरकारला मोठा झटका बसला आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची मुक्तता करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयामुळे निर्माण झालेला घटनात्मक मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाली काढला. गुन्हेगारांना क्षमा करण्याचा राज्यांना निश्‍चितच अधिकार आहे. परंतु, त्यांना स्वत:हून या अधिकाराचा वापर करता येणार नाही, असे आज बुधवारीच निवृत्त होत असलेले सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले.
केंद्रीय कायद्यानुसार नोंदविण्यात आलेले गुन्हे आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास संस्थांनी तपास केलेल्या प्रकरणांमध्ये क्षमा करण्याचा अंतिम अधिकार केंद्रालाच आहे, असे घटनापीठाने हा वाद निकाली काढताना म्हटले आहे. लहान न्यायासनाने आपल्या निर्णयात ३:२ अशा फरकाने उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांचे घटनापीठाने एकमताने दिलेल्या निर्णयात निराकरण केले आहे. या घटनापीठात सरन्यायाधीशांसह न्या. एफ. एम. आय. कलिफुल्ला, न्या. पिनाकी चंद्र घोष, न्या. अभय मनोहर सप्रे आणि न्या. यु. यु. ललित यांचाही समावेश होता.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील मुरुगन, संथन आणि अरिव्हू या तीन दोषींची सुटका करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने २० फेब्रुवारीला स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयानेच या तिघांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर केले होते. याशिवाय नलिनी, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन या दोषींची मुक्तता करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारकडून काही प्रक्रियात्मक त्रुटी राहिल्या होत्या, असे सांगून न्यायालयाने त्यांच्याही सुटकेला स्थगिती दिली होती.
२१ मे १९९१ रोजी श्रीपेरंबुदूर येथे राजीव गांधी यांची हत्या केल्याच्या प्रकरणातील तीन दोषी संथन, मुरुगन आणि अरिव्हू हे सध्या वेल्लोर येथील केंद्रीय कारागृहात असून, इतर चार दोषीही सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25929

Posted by on 2:54 pm. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google