Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » गोंधळ घालणार्‍या कॉंग्रेस सदस्यांची नोंद करा

गोंधळ घालणार्‍या कॉंग्रेस सदस्यांची नोंद करा

=लोकसभा सभापतींचे अधिकार्‍यांना निर्देश=
SUMITRA_MAHAJANनवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – गदारोळामुळे लोकसभेच्या कामकाजात सातत्याने व्यत्यय येत असल्याने सभापती सुमित्रा महाजन चांगल्याच नाराज झाल्या असून, सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन सरकारविरोधी घोषणा देणार्‍या कॉंग्रेस सदस्यांची नोंद करा, असे निर्देशच सभापतींनी आज शुक्रवारी अधिकार्‍यांना दिले.
लोकसभेत शुक्रवारी कामकाजाला प्रारंभ होताच अरुणाचल प्रदेशच्या राज्यपालांच्या काही निर्णयांवर कॉंग्रेस सदस्यांनी दिलेली स्थगनप्रस्तावाची नोटीस सभापती सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावली. मात्र, गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परिस्थितीने वेगळे वळण घेतले आहे, असे कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतींना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, सभागृहात हायकोर्टाचा संदर्भ देता येणार नाही, असे सभापतींनी स्पष्ट केले. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही हायकोर्टाचा संदर्भ कामकाजातून वगळण्यात यावा, अशी विनंती सभापतींना केली.
या गदारोळानंतर सभागृहात प्रश्‍नोत्तराच्या तासाला प्रारंभ होताच कॉंग्रेस सदस्य सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत आले. कॉंग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करतानाच प्रश्‍न विचारणारे सदस्य व उत्तर देणार्‍या मंत्र्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. कोणताही मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी नियमाप्रमाणे नोटीस द्या. तुम्ही रोजच गोंधळ घालता. अशा स्थितीत सरकार निर्णय घेऊ शकत नाही आणि सभागृहदेखील चालू शकत नाही, असे संतप्त उद्‌गार सभापतींनी काढले.
कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता सभापती म्हणाल्या की, इतकी वर्षे सत्तेत आणि पर्यायाने सभागृहात असल्याने कामकाज नियम व पद्धतीप्रमाणेच चालते, हे तुम्हाला माहिती असायला हवे. त्यानंतर संतप्त सुमित्रा महाजन यांनी आसनासमोर येऊन घोषणाबाजी करणार्‍या सुमारे ३० सदस्यांची नोंद करण्याचे निर्देश लोकसभा सचिवालयाला दिले. कोणतीही नोटीस न देता सदस्य घोषणाबाजी करत असल्याने आपल्याला खूप वेदना होतात, अशी भावनाही सभापतींनी व्यक्त केली.
सभागृहात शांतता प्रस्थापित करा, अशी विनंती भाजपा सदस्य सभापतींना करत होते. परंतु, त्यांनी नियमच वाचले नसतील तर आम्ही काय करू शकतो, या शब्दात सभापतींनी आपला संताप व्यक्त केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सभापती सुमित्रा महाजन यांनी गदारोळ करणार्‍या २५ कॉंग्रेस सदस्यांना सभागृहाच्या पाच बैठकांसाठी निलंबित केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26195

Posted by on Dec 19 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1015 of 2453 articles)


=युनोच्या सुरक्षा परिषदेत एकमताने ठराव पारित= संयुक्त राष्ट्रसंघ, [१८ डिसेंबर] - इराक व सीरिया आणि अफगाणिस्तानसह जगाच्या अनेक भागांमध्ये हिंसक ...

×