richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » जिवंत हृदयाचा सूरत ते मुंबई प्रवास

जिवंत हृदयाचा सूरत ते मुंबई प्रवास

=५८ वर्षीय रुग्णाला मिळाले जीवदान=
heartमुंबई, [२० डिसेंबर] – गेल्या काही वर्षांपासून अवयवदानाबाबत देशात जागृती निर्माण झाली असून, सूरत येथील रुग्णालयात ब्रेन डेड असलेल्या रुग्णाच्या हृदयाने मुंबईंपर्यंतचा प्रवास करून एका ५८ वर्षीय रुग्णाला जीवदान दिल्याची घटना शनिवारी घडली.
देशाच्या पश्‍चिम भागात अशाप्रकारे हृदय प्रत्यारोपण करण्याची ही पहिलीच घटना आहे. खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय व्यावसायिक आणि नवी दिल्ली येथून आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले, असे एका अधिकार्‍याने सांगितले.
घटनेची पार्श्‍वभूमी अशी की, मुलुंडस्थित फोर्टिस हॉस्पिटल एका रुग्णासाठी हृदयाच्या शोधात होते. अशातच अवयव दान करण्याबाबत जनजागृती करणार्‍या एका संस्थेकडून शुक्रवारी रुग्णालयाला दूरध्वनी आला आणि सूरत येथे असा एक ब्रेन डेड रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील प्रतीक्षा यादी तपासण्यात आली असता एका रुग्णाचा रक्तगट ब्रेन डेड रुग्णाच्या रक्तगटाशी जुळत होता. त्यानंतर लगेचच गुजरात आणि महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकार्‍यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आणि त्यांच्या मदतीने ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्यात आले.
त्यानंतर मुंबईस्थित विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती (झेडटीसीसी) आणि आरोग्य महासंचालनालयातील राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण योजनेच्या (एनओटीपी) वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपसात विचारविनिमय केला. यासाठी अर्धा ते पाऊण तास गेला. दाता हा गुजरातमधील असला तरी त्या भागात घेणारा कुणीही नव्हता. शिवाय जिवंत हृदयाचा प्रवास चार ते पाच तासांत पूर्ण करावा लागत असल्याने भौगोलिक परिस्थितीही आव्हानात्मक होती.
सर्व अधिकार्‍यांनी तयारी दर्शविल्यानंतर फोर्टिस रुग्णालयातील अधिकारी सूरत येथे दाखल झाले. तिकडे मुंबईत एका पथकाला सज्ज राहाण्यासह वाहतूक पोलिसांना याची सूचना देण्यात आली. मंुंंबई पोलिसांनी चार वेळा अशी योजना पूर्णत्वास नेली आहे. सूरत येथून जिवंत हृदयासह निघालेले विमान शुक्रवारी रात्री ११.३० वाजता मुंबईत उतरले. विमानतळाहून ११.४९ ला निघालेल्या हृदयाचा रुग्णालयापर्यंतचा प्रवास १२.०८ वाजता पूर्ण झाला. अशाप्रकारे १९ किमीचे अंतर १९ मिनिटांत पूर्ण करण्यात आले. यासाठी मुंंबई पोलिसांनी एका पायलट वाहनासह संपूर्ण ग्रीन कॉरिडोरमध्ये ७० ते ८० वाहतूक पोलिसांना तैनात केले होते, अशी माहिती वाहतूक शाखेचे सह-पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.
सूरत येथून सुरू झालेला जिवंत हृदयाचा प्रवास फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत दीड तासात पूर्ण झाला. त्यानंतर डॉ. अन्वय मुळये आणि डॉ. संजीव जाधव यांनी रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून, त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले आहे. अशा स्थितीत ७२ तास नेहमीच महत्त्वाचे असतात. परंतु, शस्त्रक्रिया चांगली झाली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती फोर्टिसचे विभागीय संचालक डॉ. एस. नारायणी यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26252

Posted by on 2:08 pm. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google