Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » तर संपूर्ण जीवसृष्टीवर कोसळेल संकट

तर संपूर्ण जीवसृष्टीवर कोसळेल संकट

=आज जागतिक हवामान दिन=
WorldEnvironmentDayनागपूर, [२२ मार्च] – जागतिक तापमानवाढीला वेळीच आवर घातला नाही, तर हवामानबदलाचे याहीपेक्षा भयंकर परिणाम भविष्यात मानवजातीला भोगावे लागतील. प्रचंड पूर, तीव्र दुष्काळ व चक्रिवादळे यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. हे लिहिण्याचे कारण म्हणजे बुधवार, २३ मार्च रोजी साजरा होणारा जागतिक हवामानशास्त्र दिन!
हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वार्‍याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणार्‍या वागणुकीचा अभ्यास करणार्‍या शास्त्रास हवामानशास्त्र (मीटीओरॉलॉजी) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोडींचे निरीक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार निकटच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते.
इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जायचा. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरीक्षणानुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दरवेळी अचूक ठरतील, असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.
इ. स. १९२२ मध्ये लुईस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिकीय पद्धती सुचवली. या पद्धतीनुसार निरीक्षणांच्या सांख्यिक विश्‍लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असे. संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सोपा झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. यानुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.
हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशा तिन्ही ठिकाणी निरीक्षणासाठी नियुक्त केली जातात. जमिनीवरील साधने प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात. तर ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या मदतीने विविध प्रकारच्या वृष्टींचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वार्‍याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते. तर समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणार्‍या फुग्यांसारख्या तरंगणार्‍या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा त्यातील एक महत्त्वाचा घटक होय. या घटकामुळेच पृथ्वीवरील विविध खंडांच्या विशिष्ट भागांत किती पाऊस पडणार, कधी पडणार, हे निश्‍चित होते. एवढेच नव्हे तर, त्या त्या खंडाचे तापमान किती राहणार, हेदेखील त्यावर ठरते. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचे सरासरी तापमान वाढले आणि ते वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले. याचा परिणाम म्हणजे अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण, चक्रीवादळांची संख्या आणि त्यांची तीव्रता वाढली आहे. ही सरासरी तापमानवाढ केवळ दोन ते तीन अंशाची दिसत असली तरीही पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास ती कारणीभूत ठरते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27541

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (584 of 2453 articles)


=ताज्या अभ्यासातील निष्कर्ष= नवी दिल्ली, [२२ मार्च] - फार आधीच्या काळात दिवाळी आणि होळी हे दोन सण मनुष्याला आगळाच आनंद ...

×