richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » देशात हरित महामार्ग बांधणार: गडकरी

देशात हरित महामार्ग बांधणार: गडकरी

nitin-gadkari11नवी दिल्ली, [३ डिसेंबर] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारने हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे पर्यावरणाचे तर संरक्षण होईलच, पण सोबतच १० लाख रोजगारही निर्माण होतील, असे केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात स्पष्ट केले.
के. गीता यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, सध्या देशात १ लाख किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत, आणखी ५० ते ६० हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे देशातील अपघातांची संख्या कमी होईल. दरवर्षी देशात ५ लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. ५५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. हा आकडा जीडीपीच्या ३ टक्के एवढा आहे.
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी हरित महामार्ग बांधण्याचा निर्णय देशात पहिल्यांदाच घेण्यात आला. या योजनेत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले जाणार आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणात येणारी झाडे न तोडता ती दुसरीकडे हलवली जाणार आहेत. यासोबतच महामार्गाची देखभाल आणि सौंदर्यीकरणही केले जाणार आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, हरित महामार्गाबाबत दिल्लीत नुकतीच एक कार्यशाळा घेण्यात आली. त्याला संपूर्ण देशातून स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हरित महामार्गाच्या धोरणाला या कार्यशाळेत अंतिम रूप देण्यात आले. येत्या मे जून महिन्यापासून या धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
पाच पाच किमी लांबीचे पट्‌टे तयार करून ते स्वयंसेवी संस्थांकडे दिले जातील, या संस्था झाडे लावतात की नाही, यावर गुगलच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाईल, असे स्पष्ट करत गडकरी म्हणाले, त्यामुळे या योजनेत गैरप्रकार आणि फसवाफसवी होणार नाही. या योजनेत सहभागी होणार्‍यांना ट्रॅक्टर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी निविदा प्रक्रिया राहणार नाही, तर पायलट प्रोजेक्ट सादर करणार्‍यांना काम दिले जाईल. जो जांगले काम करेल, त्याला अधिक काम दिले जाईल आणि जो चांगले काम करणार नाही, त्याला बाद केले जाईल.
ग्रामपंचायतींनाही या योजनेत सहभागी करून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायतींनी जर महामार्गाच्या बाजूला आंब्याची झाडे लावली, तर त्याचे उत्पन्न त्यांनाच मिळेल, असे गडकरी म्हणाले.
यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या एक टक्का रकमेची तरतूद करण्यात आली आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, कॅनडातील तंत्रज्ञानाचा वापर करत एक झाड दुसर्‍या ठिकाणी स्थानांतरित केले जाणार आहे. महामार्गाच्या रूंदीकरणात एकही झाडे कापले जाणार नाही. आतापर्यंत जेवढ्या घोषणा मी केल्या तेवढे काम झाले आहे. कोणते काम झाले नाही, असे कुणी सिद्ध केले तर त्यावर सभागृहात चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे गडकरी म्हणाले. मुलायमसिंह यादव, कल्याण बॅनर्जी, राजीव सातव, हिना गावित यांच्यासह अनेकांनी यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25974

Posted by on 5:12 am. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google