Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘नीट’विरोधात महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा

‘नीट’विरोधात महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा

=विनोद तावडे यांची माहिती=
Vinod_Tawdeनवी दिल्ली, [२ मे] – राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) मधून महाराष्ट्राला सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आज सोमवारी याचिका दाखल केली असून, राज्य सरकारच्या भूमिकेला केंद्राचा पाठिंबा असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा मुद्दा असल्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे तावडे यांनी सांगितले. या मुद्यावर तावडे यांनी आज मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी आणि आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. राज्य सरकारच्या ‘नीट’संदर्भातील भूमिकेला पाठिंबा देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविल्याचे तावडे यांनी सांगितले.
वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) अनिवार्य करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यावर अन्याय होणार असून, त्यांच्यावर वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ही परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने या याचिकेतून केली आहे.
शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी महाराष्ट्रात एक परीक्षा घेतली जाते, ही परीक्षा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. तर नव्याने राष्ट्रीय स्तरावर होणारी परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई) अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असल्यामुळे परीक्षेतून महाराष्ट्राला वगळण्याची आणि वगळणे शक्य नसेल, तर २०१८ पर्यंत त्याला मुदतवाढ देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. २०१८ पयर्र्त महाराष्ट्रातील शाळा आणि महाविद्यालये या राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेच्या दृष्टीने आपला अभ्यासक्रम तयार करतील, जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसणे शक्य होईल, असेही या याचिकेत म्हटले आहे.
श्याम दिवाण, पूर्णिमा कंथारिया आणि कथनेश्‍वरकर या वकिलांनी महाराष्ट्र सरकारतर्फे ही याचिका दाखल केली. विशेष म्हणजे, यावेळी तावडे न्यायालयात उपस्थित होते. हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्‍न असल्यामुळे तुम्ही जातीने दिल्लीला जा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे मी दिल्लीला आलो, असे तावडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जे विद्यार्थी १ मे रोजी झालेली ‘नीट’ परीक्षा देऊ शकले नाही, त्यांना २४ जुलैला होणार्‍या परीक्षेला बसण्याची अनुमती देण्यात यावी, अशी मागणीही तावडे यांनी केली.
दरम्यान ५ मे रोजी राज्यात होऊ घातलेली सीईटी ठरल्याप्रमाणे होईल, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले. राज्य शासन विद्यार्थ्यांच्या पाठिशी असल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. नीट परीक्षेचा कुठलाही ताण विद्यार्थ्यांनी घेऊ नये, राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28138

Posted by on May 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (391 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२ मे] - माजी खासदार आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष बलराज मधोक यांचे आज सोमवारी दीर्घ आजाराने निधन ...

×