Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘नीट’ अध्यादेशावर राष्ट्रपतींची मोहर

‘नीट’ अध्यादेशावर राष्ट्रपतींची मोहर

=एक वर्षासाठी राज्यांना दिलासा=
neet- medical enterence examनवी दिल्ली, [२४ मे] – वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’च्या कक्षेतून राज्यांच्या सीईटीला एक वर्षासाठी बाहेर ठेवणे का अनिवार्य आहे, याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिल्यानंतर, राष्ट्रपतींनी आज मंगळवारी ‘नीट’बाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. यामुळे एक वर्षासाठी का होईना महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘नीट’बाबत अध्यादेश जारी करण्याची आवश्यकता सरकारला का भासावी, यासह काही महत्त्वाचे प्रश्‍न राष्ट्रपतींनी उपस्थित केले होते. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींना दिली. आज सकाळी मुखर्जी यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी करून तो जारी केला, अशी माहिती राष्ट्रपती भवनातील सूत्राने दिली.
ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यासोबत आरोग्य मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी आज सकाळीच राष्ट्रपती भवनात गेले आणि राष्ट्रपतींनी विचारलेल्या सर्वच प्रश्‍नांची उत्तरे दिली. नीटवरील अध्यादेश केंद्र सरकारने शनिवारीच राष्ट्रपतींकडे पाठविला होता उत्तराखंडवरील सरकारचा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर नीटबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी सावध भूमिका घेतली होती. पण, केंद्राचे स्पष्टीकरण समाधानकारक दिसल्यानंतर त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली, असे सूत्राने सांगितले.
राज्यांच्या सीईटीला यावर्षी ‘नीट’च्या कक्षेतून बाहेर ठेवणारा अध्यादेश जारी झाल्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील २८१० प्रवेश सीईटीनुसार होणार आहेत.
एमबीबीएस आणि बीडीएस यासारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ हाच एकमेव पर्याय राहील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालाला महाराष्ट्रासह १५ राज्यांनी विरोध करून, ‘नीट’मधून विद्यार्थ्यांना सुटका मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे धाव घेतली होती. या प्रकरणी केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली. न्यायालय आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अखेर ‘नीट’च्या कक्षेतून एक वर्षाकरिता का होईना सीईटीला दूर ठेवण्यासाठी अध्यादेशाचा मार्ग केंद्राने स्वीकारला होता. त्यावर राष्ट्रपतींनी आज मोहर उमटवल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्व खाजगी महाविद्यालये ‘नीट’च्या कक्षेत : जे. पी. नड्डा
देशातील सर्व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’च्या कक्षेत येतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज मंगळवारी दिली.
वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यांतर्फे घेतल्या जाणार्‍या सामायिक प्रवेश परीक्षांना (सीईटी) ‘नीट’च्या कक्षेतून वगळण्यासाठीच केंद्र सरकारने अध्यादेश जारी केला आहे. त्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज मोहर उमटवली. यामुळे राज्यांना यावर्षी एमबीबीएस आणि बीडीएस यासारख्या परीक्षा घेण्याची संधी मिळाली आहे. पण, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ‘नीट’ अनिवार्य आहे, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.
खाजगी महाविद्यालयांपुढे दुसरा कुठलाच पर्याय नसला, तरी राज्यांना एकतर ‘नीट’चा स्वीकार करणे किंवा स्वत:ची सीईटी घेणे, असे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28498

Posted by on May 25 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (268 of 2453 articles)


=स्कायमेटचा अंदाज= नवी दिल्ली, [२४ मे] - संपूर्ण देश भीषण दुष्काळाने त्रस्त झाला असताना यावर्षी मान्सूनचे आगमन सहा दिवस उशिरा ...

×