richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » नॅशनल हेरॉल्डवरून संसदेत गदारोळ

नॅशनल हेरॉल्डवरून संसदेत गदारोळ

loksabhaनवी दिल्ली, [८ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्डप्रकरणी न्यायालयाने कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावण्याच्या मुद्यावरून आज मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यामुळे राज्यसभेचे कामकाज पाचवेळा, तर लोकसभेचे कामकाज तीन वेळा स्थगित करावे लागले. याप्रकरणी कॉंग्रेस तसेच सत्ताधारी भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.
मंगळवारी लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. ‘तानाशाही नही चलेंगी, हिटलरशाही नही चलेंगी,’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. कॉंग्रेसच्या सदस्यांनी आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन सभापती सुमित्रा महाजन वारंवार करीत होत्या. पण सदस्य ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. तुम्ही कोणतीही नोटीस दिली नाही, त्यामुळे तुमचा मुद्दा काय हे समजत नाही. तुम्ही जागेवर जा, तुमच्या नेत्याला मी विषय मांडण्याची परवानगी देते, असे महाजन म्हणत होत्या. पण कॉंग्रेस सदस्य ऐकत नव्हते. त्यांची घोषणाबाजी सुरूच होती. विशेष म्हणजे, सोनिया गांधी यावेळी सभागृहात उपस्थित होत्या. सुमित्रा महाजन यांनी या गोंधळातच प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. गोंधळातच सदस्य प्रश्‍न विचारत होते आणि मंत्री त्याला उत्तर देत होते. पण गोंधळामुळे काहीच ऐकू येत नव्हते. संपूर्ण तासभर कॉंग्रेस सदस्यांची घोषणाबाजी सुरू होती. गोंधळ घालणार्‍या सदस्यांना काही सूचना करताना सोनिया गांधी दिसत होत्या. प्रश्‍नोत्तराच्या तासानंतरही गोंधळ थांबत नसल्यामुळे अध्यक्ष महाजन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी दोनपर्यंत स्थगित केले. दुपारी २ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर कॉंग्रेस सदस्य पुन्हा घोषणा देत वेलमध्ये आले. आपला मुद्दा कोणता आहे, ते कॉंग्रेस सांगत नाही, नुसताच गोंधळ सुरू आहे, याकडे लक्ष वेधत सांसदीय कामकाज राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी म्हणाले की, संसदेत दुष्काळासारख्या महत्त्वाच्याच विषयावर चर्चा व्हायची आहे, पण कॉंग्रेस सदस्य सभागृहात कामकाज होऊ देत नाही, हा प्रकार योग्य नाही. आपल्या जागेवरून उठून रुडी रालोआच्या सदस्यांशी बोलायला गेले. त्यावर सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतला. सभागृहाचे कामकाज चालावे, अशी अनेक सदस्यांची इच्छा आहे, त्यांना आपली भूमिका मांडायची आहे, पण त्यावर गांधी हरकत घेत असल्यामुळे मला आश्‍चर्य वाटते, असे रुडी म्हणाले. सभागृहाच्या कामकाजात सोनिया गांधी अडथळा आणत आहे. कॉंग्रेसला देशातील लोकांची आणि शेतकर्‍यांची चिंताच नाही, असा आरोप रुडी यांनी केला. यामुळे सोनिया गांधी अतिशय संतप्त झाल्या. तावातावात त्या काही बोलू लागल्या. तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांकडे जात त्यांना आपला मुद्दा सांगू लागल्या. सरकार सूडबद्धीने कारवाई करीत असल्याचा विरोधी पक्षांचा समज आहे, विरोधकांचा आवाज सभागृहात दडपला जात आहे, असा आरोप करीत तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय यांनी या मुद्यावर आम्ही कॉंग्रेससोबत असल्याचे सांगितले. सभागृहाबाहेरच्या मुद्यावर सभागृहात विनाकारण गोंधळ घातला जात आहे. ज्या प्रकरणाचा संदर्भ दिला जात आहे, ते न्यायालयीन कारवाईशी संबंधित आहे, सरकार न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही, असे रुडी म्हणाले. अन्य भाजपा सदस्यही कॉंग्रेसच्या या गोंधळामुळे संतप्त झाले होते. गोंधळामुळे पुन्हा ३ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले.
राज्यसभेतही गोंधळ
राज्यसभेच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच कॉंग्रेसचे सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले. कॉंग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सदस्यांनी आपल्या जागेवर जाण्याचे आवाहन उपसभापती पी. जे. कुरियन वारंवार करीत होते. पण, कॉंग्रेस सदस्य त्याला प्रतिसाद देत नव्हते. कशासाठी तुमचा गोंधळ सुरू आहे, ते समजत नाही, तुमचे म्हणणे काय ते तरी सांगा, असे कुरियन म्हणत होते.
कॉंग्रेस सदस्यांचा विरोध न्यायालयाच्या विरोधात आहे की, सरकारच्या अशी विचारणा सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. अशा प्रकारे गोंधळ घालून जनतेच्या विकास कामांना कॉंग्रेस विरोध करत आहे, असा आरोप नकवी यांनी केला. कॉंग्रेसची तक्रार न्यायालयाच्या विरोधात आहे, तुम्ही त्याचे निराकरण करू शकता का, अशी विचारणा व्ही. पी. सिंह बदनोरे यांनी केली. सरकार बदल्याच्या भावनेने काम करीत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी केला. उत्तरप्रदेशातील समाजवादी पार्टीच्या सरकारला बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे अग्रवाल म्हणाले. विशेष म्हणजे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यावेळी पहिल्या बाकावरील आपल्या जागेवर शांतपणे बसून हा गोंधळ पाहात होते. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे राज्यसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत दोनदा स्थगित करण्यात आले. १२ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर गोंधळ आणखी वाढला. त्यामुळे कामकाज आधी दोन वाजेपर्यंत, नंतर तीन वाजेपर्यंत आणि शेवटी दिवसभरासाठी स्थगित करावे लागले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26045

Posted by on 7:04 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google