Home » कला भारती, ठळक बातम्या » फिल्म फेअरमध्ये ‘क्विन’ने मारली बाजी

फिल्म फेअरमध्ये ‘क्विन’ने मारली बाजी

kangna ranaut film queen=‘हैदर’चाही बोलबाला, कंगना राणावत सर्वोत्तम अभिनेत्री, शाहिद कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेता=
मुंबई, [१ फेब्रुवारी] – दिग्दर्शक विकास बहलच्या क्विन या चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बाजी मारली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या तीन महत्त्वाच्या पुरस्कारांसह एकूण सहा पुरस्कार पटकावले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या शानदार समारंभात विजेत्यांना हे मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेल्या क्विनला सर्वोत्कृष्ट संपादन, छायाचित्रण आणि पार्श्‍वसंगीताचाही पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या स्पर्धेत कंगनासोबत मेरी कोममधील भूमिकेसाटी प्रियांका चोप्रा आणि मर्दानीमधील भूमिकेसाठी राणी मुखर्जी होती. याशिवाय, आलिया भट, माधुरी दीक्षित आणि सोनम कपूरही आपापल्या चित्रपटांसाठी या पुरस्काराच्या शर्यतीत होत्या.
विल्यम शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकावर आधारित आणि विशाल भारद्वाज दिग्दर्शित हैदर या चित्रपटाने समीक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवित एकूण पाच पुरस्कारांवर नाव कोरले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहिद कपूरला तर, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार याच चित्रपटातील भूमिकेसाठी के.के.मेनन आणि तब्बू यांना प्रदान करण्यात आला. हैदरच्या वेशभूषाकार डॉली अहलुवालिया आणि सुब्रत चक्रवर्ती यांना सर्वोत्तम निर्मिती डिझायनिंगसाठीचा फिल्म फेअर देण्यात आला.
भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. हायवे या चित्रपटासाठी नवोदित अभिनेत्री आलिया भटला समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनेत्रीचा तर आंखो देखीसाठी संजय मिश्राला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पदार्पणातील सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार हिरोपंतीसाठी किर्ती सननला तर पदार्पणातील सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला खुबसूरत या चित्रपटासाठी मिळाला.
गेल्या वर्षीचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरलेल्या आमिर खानच्या पीकेला मात्र दोनच पुरस्कारांवर समाधान मानावे लागले. सर्वोत्कृष्ट पटकथा आणि संवादांसाठी आमिर खान अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांना सन्मानित करण्यात आले.
एक व्हिलन चित्रपटातील ‘गलियां…’ या गाण्यासाठी अंकित तिवारीला सर्वोत्तम गायकाचा तर रागिणी एमएमएस-२ मधील ‘बेबी डॉल…’साठी कनिका कपूरला सर्वोत्तम गायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. शंकर-एहसान-लॉय या त्रयींना टु स्टेट्‌ससाठी सर्वोत्तम संगीतकार तर, सिटीलाईट्‌समधील ‘मुस्कुराने की वजह तुम हो…’ या गाण्यासाठी रश्मी सिंह यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला. गुंडे या चित्रपटातील ऍक्शन दृश्यांसाठी श्याम कौेशल आणि सलमान खानच्या ‘जुम्मे की रात…’ या गाण्यातील नृत्य दिग्दर्शनासाठी अहमद खानला पुरस्कृत करण्यात आले.
विनोदवीर कपिल शर्मा आणि दिग्दर्शक करण जोहरने कार्यक्रमाचे निवेदन केले. अभिनेता सलमान खान, अर्जुन कपूर, वरुण धवन, रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर आणि आलिया भट यांनी कार्यक्रम सादर केले. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20193

Posted by on Feb 2 2015. Filed under कला भारती, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, ठळक बातम्या (2140 of 2457 articles)


=राहुल गांधींची लुडबुड होतीच! : जयंती नटराजन यांचा गौप्यस्फोट • कॉंग्रेसला रामराम= नवी दिल्ली, [३० जानेवारी] - गांधी घराण्याशी एकनिष्ठ ...

×