richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ब्रिटनमध्ये आज जनमत चाचणी

ब्रिटनमध्ये आज जनमत चाचणी

=युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही?=
european union -EU_flagलंडन, [२२ जून] – ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही, या मुद्यावर उद्या गुरुवारी ब्रिटनमध्ये सर्वंकष जनमत चाचणी घेण्यात येणार आहे. यापूर्वी स्कॉटलंडबाबतही अशाच प्रकारची जनमत चाचणी घेण्यात आली होती.
युरोपियन युनियनमध्ये राहायचे की नाही, यावर या देशातील नागरिक उद्या मतदान करणार आहेत. या जनमत चाचणीचा निकाल जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी २०१४ मध्ये स्कॉटलंडने ब्रिटनमध्ये रहावे की नाही, यासाठी जनमत चाचणी झाली होती.
१९७५ च्या जनमत चाचणीने ब्रिटनने युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीत राहाण्याच्या बाजूने कौल दिला होता. पण, त्यानंतरच्या काळात युरोपियन समूहाचे स्वरूप बरेच बदलले असून, हा बदल ब्रिटनमधील आजच्या पिढीला मान्य आहे का, हे तपासण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात येत आहे.
ब्रेक्झिट म्हणजे काय?
ब्रिटिश आणि एक्झिट या शब्दांना एकत्र करून ‘ब्रेक्झिट’ हा शब्द तयार झाला आहे. ब्रिटनची युरोपियन समूहातून एक्झिट असा त्याचा अर्थ होतो. युरोपियन युनियन हा २८ देशांचा समूह असून, त्यात पश्‍चिम युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी यासारख्या देशांचा समावेश आहे. या २८ देशांचे नागरिक कोणत्याही सदस्य देशात मुक्तपणे प्रवास, व्यापार आणि नोकरी करू शकतात. त्यासाठी युरोपियन समुहात युरो हे स्वतंत्र चलनही अस्तित्वात आहे.
युरोपियन समूहात इतर देशांच्या तुलनेत ब्रिटन भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या तगडा देश आहे. यामुळे इतर युरोपियन देशांतून आलेल्या नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा दावा लीव्ह कॅम्पेनने एका सर्वेक्षणातून केला आहे. युरोपात येणारे निर्वासितांचे लोंढे ब्रिटनपर्यंत येऊ नये, या भावनेतूनही अनेकजण ब्रेक्झिटला पाठिंबा देत आहेत. ब्रिटनला युरोपियन समूहातील सदस्यत्वापोटी वर्षाला ९९ हजार कोटी रुपये द्यावे लागतात. ब्रिटन या समूहातून बाहेर पडल्यास हा पैसाही वाचेल, असा या संस्थेचा दावा आहे.
तिथेच, युरोपियन समूहात सहभागी झाल्यापासून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाल्याचे रिमेल गटाचे मत आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास भाजीपाल्यासह अनेक वस्तू महाग होतील, करही वाढेल. शिवाय, सुमारे १० लाख ब्रिटिश नागरिकांना नोकरी गमवावी लागू शकते, असे या गटाला वाटते.
सध्या कुणाचे पारडे जड
डेली एक्सप्रेस या दैनिकाने काही दिवसांपासून केलेल्या सर्वेक्षणानुसार, ८० टक्के लोक युरोपियन युनियनच्या विरोधात आहेत. युरोपियन समूहातून ब्रिटनने बाहेर पडावे, असा बहुतांश नागरिकांचा सूर आहे.
भारतावर होणारा संभाव्य परिणाम
ब्रिटन जर युरोपियन समूहातून बाहेर पडल्यास भारत आणि अन्य देशांवरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे. २८ देश आणि ५० कोटी लोकसंख्येच्या युरोपियन समूहाची अर्थव्यवस्था १६ खरब डॉलर्सची असून, तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातील वाटा एक चतुर्थांश इतका आहे. युरोपियन समूह भारतासाठी सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. ८०० पेक्षा जास्त भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची ६ ते १८ टक्के कमाई ब्रिटनमधून होते. बहुतांश भारतीय कंपन्यांसाठी ब्रिटन हे युरोपचे प्रवेशद्वार आहे. अशा स्थितीत ब्रिटन जर युरोपियन समुहातून बाहेर पडला, तर या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्याने करार करावे लागतील. त्यामुळे खर्चात वाढ होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावे लागेल.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28714

Posted by on 3:05 pm. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google