Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महात्मा गांधींच्या नातवावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

महात्मा गांधींच्या नातवावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ

kanubhai-ramdas-gandhiनवी दिल्ली, [१४ मे] – सर्वसामान्य घरच्या वृद्धांवरच वृद्धाश्रमात राहायची वेळ येते, असे नाही, तर मोठे नाव असलेल्या घरच्या लोकांवरही आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमाचा आश्रय घेण्याची वेळ येते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांबरोबर संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे नातू कनू रामदास गांधी यांच्यावर वृद्धाश्रमाच्या पारतंत्र्यात अडकण्याची वेळ आली आहे.
एमआयटी पदवीधर असलेले आणि नासामध्ये काम केलेले कनू गांधी गेल्या आठवड्यापासून दिल्ली-फरिदाबाद सीमेवरील गुरू विश्राम वृद्धाश्रमात आश्रयाला आहेत. त्यांच्यावर अशी वेळ का आली, याबाबत कोणीच काही बोलत नाही. आतपर्यंत सरकार आणि कोणत्याही राजकीय पक्षाने कनू गांधी यांच्या वृद्धाश्रम प्रवासाची दखल घेतली नाही. मात्र, कनू गांधी यांना भेटण्यासाठी आणि त्यांची हालचाल घेण्यासाठी या वृद्धाश्रमात सर्वसामान्य लोकांची गर्दी वाढली आहे.
जवळपास चार दशके अमेरिकेत घालविल्यानंतर ८७ वर्षीय कनू गांधी पत्नी डॉ. शिवा लक्ष्मी सोबत भारतात परतले. या दाम्पत्याला मूलबाळ नाही. कनूभाई महात्मा गांधी यांचे तिसरे पुत्र रामदास गांधी यांच्या तीन मुलांपैकी एक आहेत.
तुम्हाला कोणी मदत केली नाही का, या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या प्रश्‍नावर कनू गांधी म्हणाले की, मला कोणाही समोर हात पसरण्याची लाज वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवाग्राम आश्रमात आले होते, त्यावेळी मी त्यांना संपूर्ण आश्रम दाखवला होता. त्यावेळी तुम्हाला कोणतीही अडचण आली तर माझ्याकडे या, मी तुम्हाला मदत करेन, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मी त्यांच्याकडे गेलो नाही, कारण मला कोणासमोर हात पसरण्याची लाज वाटते.
‘नासा’तील दिवसांची आठवण काढत कनू गांधी आज त्यांच्यावर आलेल्या आपत्तीने काही प्रमाणात खचल्यासारखे झाले आहेत. माझ्या पत्नीची स्थिती पाहून मला रडू येते, असे ते म्हणाले. वयाच्या २० व्या वर्षी कनू गांधींना महात्मा गांधींच्या मदतीसाठी सेवाग्राम आश्रमात पाठवण्यात आले होते. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या कनू गांधी यांच्यावर आज वृद्धाश्रमात राहायची वेळ आली आहे. गांधींजींच्या नातवावर आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते, ही संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी घटना असल्याचे या वृद्धाश्रमाचे संचालक विश्राम मानव यांनी स्पष्ट केले. गांधींच्या नावावर राजकारण करणार्‍यांचे तसेच त्यातून स्वत:ची तुंबडी भरणार्‍यांचे डोळे या घटनेतून तरी उघडावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
मात्र, या स्थितीसाठी कनू गांधी स्वत:च जबाबदार आहेत, असे महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. गांधीजींशी संबंधित अनेक संघटनांनी गेल्या काही वर्षात कनू गांधी आणि त्यांच्या पत्नीचे आदरातिथ्य केले आहे. मात्र, कनू गांधी आपल्या स्वभावामुळे कुठेच टिकत नाही, असे ते म्हणाले. आजही मी स्वत: आणि गांधी आश्रम त्यांची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. गांधी परिवारातील लोकांना सांभाळणे, त्यांचे पालनपोषण करणे ही सरकारची जबाबदारी नाही, असे तुषार गांधी यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28230

Posted by on May 15 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (356 of 2453 articles)


=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व दहा जणांवरील मोक्का आरोपही मागे= मुंबई, [१३ मे] - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या ...

×