Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » महानिर्मिती देशात पुनः अग्रेसर स्थान प्राप्त करणार

महानिर्मिती देशात पुनः अग्रेसर स्थान प्राप्त करणार

=ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्‍वास=
Chandrashekhar Bawankuleमुंबई, [२८ नोव्हेंबर] – गेल्या एक वर्षाच्या कालावधीत आपल्या कार्यक्षमतेत व एकूण कामगिरीत उल्लेखनीय सुधारणा करणार्‍या महानिर्मितीने आगामी काळात आणखी जोमाने प्रयत्न केल्यास महानिर्मितीला देशात पुनःश्‍च अग्रेसर स्थान प्राप्त होऊ शकते, असा विश्‍वास राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला.
प्रकाशगड येथे आयोजित महानिर्मितीच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. सदर बैठकीत महानिर्मितीने आपल्या औष्णिक संचांच्या कामगिरीत भारांक, उपलब्धता, उष्मांक या बाबतीत केलेल्या सुधारणांबाबत सादरीकरण करण्यात आले. इंधन तेलाचा कमीतकमी वापर, बॉयलर ट्युबगळती व अन्य तांत्रिक बिघाडांचे प्रमाण कमी करण्यात तसेच संयंत्रांना लागणार्‍या विजेचे प्रमाण कमी करण्यात आलेले यश आदी तांत्रिक मुद्यांचा त्यात समावेश होता. त्याचप्रमाणे औष्णिक वीज संचांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्तीचा कालावधी कमी करणे, वीजकेंद्राचे प्रभावी उर्जा लेखापरीक्षण, सुयोग्य नियोजनाद्वारे कोळसा हाताळणी विभागात केलेल्या विविध सुधारणा यामुळे देखील महानिर्मितीची कामगिरी उंचावण्यास मदत झाली, हे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले. ग्राहकांना रास्त दरात वीज मिळण्यासाठी वीजनिर्मितीचा खर्च आटोक्यात ठेवण्याची गरज लक्षात घेऊन महानिर्मितीने या वर्षी केलेल्या एकत्रित प्रयत्नांची बावनकुळे यांनी प्रशंसा केली.
सदर बैठकीस बहुमोल मार्गदर्शन करताना, बावनकुळे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरताना महानिर्मितीच्या वरिष्ठ अभियंत्यांनी देशपातळीवर व जागतिक पातळीवरच्या वीज क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन केले. आपले वीज केंद्र हे स्वच्छ, नीटनेटके व पर्यावरणसंवर्धक ठेवण्यासाठी, वीजकेंद्रासाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याचा १०० टक्के पुनर्वापर होण्यासाठी, वीज कर्मचारी व कंत्राटी कामगार यांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी बावनकुळे यांनी आग्रही भूमिका मांडली. सामुग्री खरेदीचे धोरण व निविदा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक पद्धतीने व्हावी, तसेच वीज केंद्रांची सुरक्षा व सुरक्षितता अधिक प्रभावी व्हावी यासाठी त्यांनी बैठकीत अनेक उपाययोजना सुचविल्या. विशेष म्हणजे, यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सर्व मुख्य अभियंत्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण होईल, याची ग्वाही दिली. दुपारच्या सत्रात महानिर्मितीच्या पूर्णत्वाकडे जात असलेल्या वीज प्रकल्पांविषयी व सौर प्रकल्पांविषयीचे सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीत महानिर्मितीच्या स्वतंत्र ‘सेवा नियमन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सदर बैठकीत प्रधान सचिव (ऊर्जा) मुकेश खुल्लर, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, संचालक (प्रकल्प) चंद्रकांत थोटवे, संचालक (संचलन) विजय सिंह, संचालक (वित्त), जयकुमार श्रीनिवासन, मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, कार्यकारी संचालक (मा.सं.) मनोज रानडे, कार्यकारी संचालक (प्रकल्प-१) अनिल नंदनवार व महानिर्मितीच्या मुख्यालयातील व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व मुख्य अभियंते व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25796

Posted by on Nov 29 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1131 of 2451 articles)


संविधान बदलण्याचा विचारही कुणी करू शकत नाही घटनेनुसारच चालणार देशाचा कारभार लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन नवी दिल्ली, ...

×