richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » राजकीय स्वार्थापोटी बहिष्कार : मुख्यमंत्री

राजकीय स्वार्थापोटी बहिष्कार : मुख्यमंत्री

  • मतभेद विसरून शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहा
  • तूर डाळ प्रकरणी पारदर्शी कारवाई
  • कायदा व सुव्यवस्था संदर्भात सभागृहात उत्तर देणार

devendra-fadnavis9नागपूर, [६ डिसेंबर] – सतत चौथ्या वर्षी राज्यावर दुष्काळाचे संकट असताना, राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी पक्षभेद व राजकीय स्वार्थ सोडून शेतकर्‍यांच्या पाठीशी राहण्याची, त्यांच्या मनातील निराशा दूर करण्याची गरज आहे. परंतु, विरोधी पक्षांना याचेही राजकारण करायचे आहे, असे दिसते. अन्यथा त्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला नसता, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर आरोपांचा मारा करीत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावर पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकून असहकाराची चुणूक दाखविली असली, तरी शेतकर्‍यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याच्या कामी विरोधी पक्षांचे सहकार्य मिळविण्याचा आपण प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
विरोधकांच्या सर्व मुद्यांवर चर्चेला आम्ही तयार आहोत. विरोधकांनीच सभागृह चालू दिले पाहिजे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
दुष्काळ, शेतकर्‍यांचे व विदर्भाचे प्रश्‍न या संदर्भात हे अधिवेशन महत्त्वाचे आहे, असे प्रारंभीच नमूद करून मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनातील सरकारचा प्राधान्यक्रम स्पष्ट केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्रपरिषदेपूर्वी विरोधी पक्षनेत्यांची पत्रपरिषद झाली. त्यात विरोधी पक्षांनी जे आरोप केलेत, त्याला मुख्यमंत्र्यांनी सुयोग्य उत्तरे दिलीत.
दुष्काळाशी सामना : दुष्काळाच्या स्थितीत कधी नव्हे तर जुलै महिन्यात चारा-छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
-रोजगार हमी योजनेअंतर्गत यावर्षी २० लाख मनुष्यदिनाचे जास्त काम करण्यात आले आहे.
-एनडीआरएफकडून दुष्काळासाठी ९०० कोटी मिळाले आहेत. अधिक मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारकडे ९ नोव्हेंबरला निवेदन गेले आहे. भरीव मदतीची आशा आहे.
-केंद्राच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकार स्वबळावर शेतकर्‍यांच्या पाठीशी मजबुतीने उभे आहे.
कापूस खरेदी व भाव : कापूस खरेदीसाठी खरेदी केंद्र सुरू झाली आहे. आजपर्यंत ४६ लाख क्विंटल कापूस खरेदी झाली असून, ३ डिसेंबरपर्यंतच्या खरेदीचे पैसे चुकते करण्यात आले आहेत. निधी पुरेसा आहे.
– आम्ही विरोधी पक्षात असताना कापसाला ६ हजार रुपये भाव मागत होतो. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात ७ ते ८ हजार रुपये भाव होता. एकाधिकार कापूस खरेदी बंद झाल्यामुळे कापसाचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर ठरत असतो. त्यानुसार आजचा हमी भाव निश्‍चित झालेला आहे. गेल्या वर्षी बाजारभाव ३२०० रुपये असताना, सरकारने ८०० रुपये जास्त देऊन सुमारे १ कोटी क्विंटल कापूस शेतकर्‍यांकडून खरेदी केला होता.
डाळ प्रकरण : डाळ प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर विरोधी पक्षांनी केलेला हल्ला मुख्यमंत्र्यांनी परतवून लावला.
-विरोधी पक्षांचे म्हणणे विसंगत आहे. डाळीचे भाव वाढू नयेत म्हणून तत्परतेने कारवाई केली. सरकारची कारवाई चेहरा पाहून होत नाही. राज्यात जप्त केलेला डाळीचा साठा बाजारात आला आहे. व्यापार्‍यांकडून १०० रुपये प्रति किलो तूर डाळ विकण्याचे हमीपत्र घेतले आहे आणि त्याची निगराणीची व्यवस्था केली आहे.
-आधीच तूर डाळीची देशात तूट असते. त्यात राज्यातील तूर डाळीचे उत्पन्न ३५ टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दर नियंत्रण यंत्रणा पुन्हा लागू करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.
कायदा, सुव्यवस्था : राज्यातील अपराध-सिद्धी दर (कन्व्हिक्शन रेट) गेल्या राजवटीपेक्षा दुप्पटीपेक्षा आहे, हे एनसीआरबीने प्रकाशित केले आहे. विरोधी पक्षांच्या या संदर्भातील सर्व आरोपांना सभागृहात सडेतोड उत्तर देणार.
पत्रपरिषदेला एकनाथ खडसे, शिवसेनेचे सुभाष देसाई, चंद्रशेखर बावनकुळे, राजकुमार बडोले, गिरीश बापट, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, गिरीश महाजन, पंकजा मुंडे व मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित होते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26022

Posted by on 9:53 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google