Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राज्य घटना अबाधित राहणार

राज्य घटना अबाधित राहणार

=मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप सरकारने फेटाळला=
venkaiah-naidu-in-lok-sabhaनवी दिल्ली, [२७ नोव्हेंबर] – राज्य घटनेत फेरबदल कराल, तर देशात रक्तपात होईल, अशी धमकी कॉंगे्रसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्यानंतर, घटनेला धोका असल्याचा विरोधकांचा आरोप सरकारने आज शुक्रवारी ठामपणे फेटाळून लावला. कॉंगे्रसने त्यांच्या सत्ताकाळात आणिबाणी लादून देशवासीयांचा जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला होता, अशी खरपूस टीका करताना, आज आमच्या सरकारच्या काळात देशात आणिबाणी लादण्याची तीळमात्रही शक्यता नाही, अशी ग्वाही संसदीय कामकाज मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी लोकसभेत दिली.
भारतीय राज्य घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द कॉंगे्रसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी समाविष्ट केला असला, तरी आम्ही तो काढणार नाही, असेही नायडू यांनी ‘राज्य घटनेविषयी बांधिलकी’ यावर आयोजित चर्चेत सहभागी होताना स्पष्ट केले.
भाजपाप्रणीत सरकार राज्य घटनेला कुठलाही धक्का पोहोचविणार नाही आणि ‘सेक्युलर’ हा शब्दही काढणार नाही. आणिबाणीचा धोका तर मुळीच नाही, आम्ही कोणत्याही राजकीय विरोधकाला अटक करणार नाही आणि न्यायाधीशांच्या अधिकारांवरही गदा आणणार नाही. उलट, राज्य घटना आणखी बळकट करण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
याचवेळी नायडू यांनी कथित धर्मनिरपेक्षवाद्यांवरही सडकून टीका केली. जे लोक जाती व धर्माच्या नावावर राजकारण करीत असतात, तेच खरे जातीयवादी असतात आणि दुसर्‍यांना जातीयवादी असल्याचे संबोधत असतात. हे लोक जाती, धर्माच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करीत असतात. एकदा सत्ता हातात आली की, पुढील पाच वर्षेपर्यंत त्यांना याच जनतेचा विसर पडत असतो, असा हल्लाही नायडू यांनी चढविला.
मतांचे राजकारण करून विशिष्ट समाजाची गठ्ठा मते लाटण्यापेक्षा देशाचा सर्वांगिण विकास हेच आपल्या सर्वांचे एकमेव उद्दिष्ट राहायला हवे, असे स्पष्ट करताना ते म्हणाले की, दादरी घटनेला राजकीय रंग काही राजकीय पक्षांनी देशात असहिष्णुता असल्याचे चित्र रेखाटले. यात भाजपा आणि संघ परिवारातील काही सदस्यांनीही आपले मत व्यक्त केले. सरकार या कोणाच्याही मताशी सहमत नाही. अशा वक्तव्यांचा आम्ही निषेधच केला आहे. हाच मुद्दा आणखी पुढे रेटताना त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन केलेल्या भारतविरोधी वक्तव्याचाही उल्लेख केला. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांचा कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी निषेध करतील, अशी आशा मी त्यांच्याकडून करतो. त्यांना असे वक्तव्य मान्य होईल, असे मला मुळीच वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरसह संपूर्ण भारतात विध्वंस घडविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असताना, पाकमध्ये जाऊन भारतविरोधी वक्तव्य करणार्‍या या नेत्यांचा कॉंगे्रस नेत्यांनी अद्याप निषेध का केला नाही, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार उलथून लावल्याशिवाय भारत-पाक संबंध सुरळीत होणार नसल्याची भाषा बोलणार्‍या मणिशंकर अय्यर यांना कॉंगे्रसने अद्याप जाब का विचारला नाही, असा सवालही नायडू यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25788

Posted by on Nov 28 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1138 of 2456 articles)


पुणे, [२७ नोव्हेंबर] - खाजगी रुग्णालयांतूनही शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी रुग्णालयांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री ...

×