Home » ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » रा स्व संघाच्या गणवेशात बदल

रा स्व संघाच्या गणवेशात बदल

  • •स्वयंसेवकांना हाफ पॅण्टऐवजी फुल पॅन्ट
  • • खाकी रंगाची जागा तपकिरी घेणार

bhayyaji joshiनागौर (राजस्थान), [१३ मार्च] – ९१ वर्षांची परंपरा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रविवारी येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत गणवेशात बदल करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून, खाकी हाफपॅण्टऐवजी तपकिरी रंगाच्या फुलपॅण्टचा गणवेशात समावेश केला आहे. गणवेशातील इतर कुठल्याही साहित्यात बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून संघाच्या अधिकार्‍यांमध्ये गणवेशातील बदलांबाबत मंथन सुरू होते.
काळानुरूप स्वत:ला बदलविणे हा रा. स्व. संघाच्या धोरणात्मक प्रक्रियेचा एक भाग आहे. खाकी हाफपॅण्टला निरोप देऊन स्वयंसेवकांसाठी गणवेश म्हणून आम्ही तपकिरी फुल पॅण्ट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. काळाशी सुसंगत असा हा बदल आम्ही स्वीकारला आहे, अशी माहिती या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी दिली.
‘सामान्य जीवनात फुलपॅण्टला मान्यता आहे, तिचा स्वीकार केला जातो, म्हणून आम्हीही ती स्वीकारली. आम्ही समाजासोबत अर्थात कालसुसंगत चालणारे आहोत. गणवेशात बदल करण्यात आम्हाला कुठलाही कमीपणा वाटत नाही,’ असे भय्याजी जोशी यांनी सांगितले.
खाकी हाफपॅण्ट ही रा. स्व. संघाची ओळख नाही. स्वयंसेवकांना देण्यात येणारे शारीरिक प्रशिक्षण लक्षात घेऊन आम्ही हाफपॅण्टची निवड केली होती. पण, आता आम्ही बदलत्या काळाच्या प्रवाहात तपकिरी रंगाचा फुलपॅण्ट आणि पांढरा शर्ट हा गणवेश स्वीकारला आहे. हा गणवेश अतिशय आकर्षक दिसेल, याची आम्हाला खात्री आहे. कोणत्याही कारणामुळे आम्ही हा बदल स्वीकारलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या नव्या गणवेशामुळे स्वयंसेवकांची ओळख प्रभावित होईल काय, असे विचारले असता, या नव्या गणवेशाचा कुठलाही प्रतिकूल परिणाम स्वयंसेवकांच्या ओळखीवर पडणार नाही. आगामी चार ते सहा महिन्यांतच हा नवा गणवेश सामान्य बाब झालेला असेल, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले.
रा. स्व. संघाची तुलना इसिस या जहाल दहशतवादी संघटनेशी करणारे कॉंगे्रस नेते गुलाम नबी आझाद यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता, या वक्तव्यातून त्यांचे अज्ञानच दिसून येते, असे ते म्हणाले. संघाच्या कार्याची त्यांना विशेष माहिती नसल्यानेच ते असे बोलून गेले, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी यावेळी आरक्षणाबाबतची संघाची भूमिका देखील स्पष्ट केली. आरक्षणामुळे समाजातील कमजोर घटकांना बळकटी मिळते. समाजातील प्रभावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्ग जर आरक्षणाची मागणी करीत असेल, तर ती बाब नक्कीच चांगली नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि राज्यघटनेतील तरतुदींशीही ही बाब निश्‍चितच सुसंगत नाही, असेही ते म्हणाले.
मंदिरांमध्ये महिलांच्या प्रवेशाचे भय्याजी जोशी यांनी समर्थन केले. अशा प्रकारचे संवेदनशील मुद्दे आंदोलनाच्या माध्यमातून नव्हे, तर चर्चेतून सोडवायला हवेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काळानुरूप बदल
१९२५ मध्ये रा. स्व. संघाची स्थापना झाली, तेव्हापासूनच अनेकदा गणवेशात काळानुरूप बदल झाले आहेत. डॉक्टर हेडगेवारांच्या काळात गणवेशातील खाकी शर्टवर (खांद्यावर) आरएसएसचा बिल्ला लावला जात असे. लॉंग बूट आणि पटीस पुंगळ्यांचाही गणवेशात समावेश होता. तो इंग्रजांच्या वेळच्या सैनिकी गणवेशासारखा वाटत असे. पुढे त्यात बदल होऊन साधा पांढरा मनिला आला आणि लॉंग बुटांची जागा काळ्या बुटांनी घेतली. बाल स्वयंसेवकांसाठी पूर्वी पांढरे जोडे आणि निळे मोजे होते. त्यात बदल होऊन काळे जोडे आणि खाकी मोजे आले. मग गणवेशातील लाल रंगाचा चामड्याचा पट्टा जाऊन त्याची जागा तपकिरी पट्‌ट्याने घेतली आणि आता खाकी चड्डी जाऊन तपकिरी रंगाची फुलपॅण्ट संघाने गणवेशात अंतर्भूत केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27288

Posted by on Mar 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय (670 of 2455 articles)


=भारत-पाकचे विदेश सचिव भेटण्याची शक्यता= नवी दिल्ली, [१३ मार्च] - भारत व पाकिस्तान यांच्या विदेश सचिवांची बहुप्रतीक्षित भेट नेपाळमधील पर्यटन ...

×