richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विधानसभेत कामकाज, परिषद ठप्प!

विधानसभेत कामकाज, परिषद ठप्प!

=कॉंग्रेसचा सभात्याग, जनतेचा पैसा वाया घालवणे अयोग्य : खडसे=
vidhan-sabha ngpनागपूर, [१० डिसेंबर] – हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी कर्जमाफी आणि आर्थिक मदतीचा विषय लावून धरला. विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे, विनाव्यत्यय सभागृहाचे अन्य कामकाज पार पडले. मात्र, परिषदेत शेतकर्‍यांच्या विषयासह राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळामुळे परिषद दिवसभरासाठी तहकूब करावी लागली.
जनतेच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने होणार्‍या अधिवेशनावर मोठा खर्च याठिकाणी केला जात आहे. मात्र, जनतेचा हा पैसा मिनिटा मिनिटाला वाया जात आहे. हे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही, या शब्दात कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आज गुरुवारी विधानसभेत विरोधकांवर केला. हे सभागृह चर्चेचे व्यासपीठ आहे. चर्चेतून येथे प्रश्‍न सोडविले जातात. त्यामुळे सरकारची चर्चेची तयारी असून, तत्काळ चर्चा सुरू करा, राजकारण करू नका, असे खडे बोलही त्यांनी सुनावले.
सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधी बाकांवर केवळ कॉंग्रेसचे सदस्य दिसत होते. कॉंग्रेसनंतर मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता. सभागृह सुरू होताच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही कर्जमाफी आणि आर्थिक मदतीचा मुद्दा मांडला. तेव्हा, खडसे म्हणाले, तुम्हाला जर शेतकर्‍यांबद्दल खरोखरच आस्था असती तर, असा वेळ आणि पैसा वाया घालवला नसता. राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत तर नसू द्या, पण कॉंग्रेसच्या सदस्यांचीही उपस्थिती शेतकर्‍यांप्रती अनास्था दर्शविणारी आहे.
शेतकर्‍यांच्या सार्‍या प्रश्‍नांची सरकारला जाण आहे. मात्र, कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही. शेतकरी आत्महत्येसाठी प्रामुख्याने ज्या यवमतमाळ जिल्ह्याचा उल्लेख केला जातो. तेथील केवळ २२ टक्के खातेदार शेतकर्‍यांना आजवर कर्ज दिले गेले आहे. ७८ टक्के शेतकर्‍यांना कर्ज दिले गेलेले नसून, त्यांनी स्वःखर्चाने लागवड केली आहे. त्यामुळे ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्यासाठी निर्णय होईल आणि ज्यांनी कर्ज घेतले नाही, मात्र त्यांची परिस्थितीही गंभीर आहे, अशांसाठी शासन म्हणून सर्वसमावेशक निर्णय घ्यायचा नाही का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. या राज्यातील कर्जदार शेतकर्‍यांसोबत बिगर कर्जदार शेतकर्‍यांच्यादृष्टीनेही निर्णय होण्याची गरज असून, त्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे चर्चा करावी, अशी विनंतीही त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केली.
सरकार चर्चेची तयारी दर्शवित असताना, चर्चेपासून पळ काढत विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारचा निषेध नोंदवून सभात्याग केला. यावेळी राष्ट्रवादीचे कुणीही सभागृहात नसल्याने, हा विरोधकांचा नव्हे तर केवळ कॉंग्रेसचा सभात्याग ठरला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26117

Posted by on 3:58 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google