richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

=सेनेने तोंड काळे करून घेण्याची वेळ!=
vidhanbhavan ngpनागपूर, [६ डिसेंबर] – सुधींद्र कुळकर्णीच्या तोंडाला काळ फासणार्‍या शिवसेनेची सरकारमधील अवस्था बघितली, तर स्वत:चे तोंड काळे करून घेण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा जोरदार हल्लाबोल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत विरोधकांनी केला. तर, मागील वर्षभरात सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती करण्यास असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार घालण्याचीही घोषणा यावेळी केली.
शेतकरी आत्महत्येत वाढ, कर्ज रोख्यात वाढ, महसुली तूटीचा उच्चांक, उपोषणाने बालमृत्यूत वाढ, गुन्हेगारीत वाढ असे विविध विक्रम या सरकारने एका वर्षात स्थापित केले आहेत. मात्र, सरकारमध्ये राहायचे आणि विरोधकांची भूमिका बजावण्याचा मूर्खपणाचा विक्रम हा शिवसेनेने स्थापित केला असल्याचा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून विषय सोडवायचे सोडून, वेगवेगळ्या करांच्या बाबतीत सरकारच्या निर्णयाचा विरोध करताना, आपल्याच वित्तमंत्र्यांना पाकिटमार संबोधण्याचाा महाविक्रम देखील सेनेने केला. हा तर एका पाकिटमाराने दुसर्‍याला पाकिटमार म्हणण्याचा प्रकार होय, असा टोलाही विखे-पाटील यांनी लगावला.
कापसाला ६ हजार रुपये भाव देऊ, सातबारा कोरा करू, यासारख्या मोठमोठ्या घोषणा सरकारने केलेल्या होत्या. मात्र, हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून, राज्यातील मंत्र्याचे नातेवाईक आता आत्महत्या करू लागले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचाच या सरकारवर विश्‍वास उरला नाही, तर सर्वसामान्य जनतेन कसा विश्‍वास ठेवायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचेही ते म्हणाले.
जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न : मुंडे
१९७२ मध्ये उद्‌भवलेल्या दुष्काळी परिस्थितीपेक्षा हा दुष्काळ मोठा आहे. याबाबतची जाणीव मागील अधिवेशनात आम्ही करून दिली होती. त्यानंतर सरकारने सभागृहात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ती आजवर झालेली नाही. एक हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.
शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, कुठल्याही पॅकेजची अंमलबजावणी झाली नाही, आणेवारी घोषित करण्यात घोळ, डान्सबार बंदीबाबत सरकारची संशयास्पद भूमिका, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळते करणे, डाळ घोटाळा, धनगर, मराठा आणि मुस्लिम आरक्षणात वेळकाढू धोरण, असे विविध आरोपही त्यांनी यावेळी केले. तर, नागपूर अधिवेशनाला एक विशेष महत्त्व असून, यात जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते यावेळी म्हणाले.
महाधिवक्त्यांना पायउतार करा
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत मुंबईतील शहीद झालेल्या हुतात्म्यांच्याबाबत केलेले विधान आक्षेपार्ह असून, राज्याच्या एका संवैधानिक पदावर राहून असे विधान करणे हा त्या पदाचा अवमान आहे. त्यामुळे अणे यांना तत्काळ राज्याच्या महाधिवक्ता पदावरून पायउतार करावे, अशी मागणीही विरोधकांनी यावेळी केली.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26025

Posted by on 9:50 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google