richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » व्ही के सिंह यांच्यावर कारवाईची मागणी

व्ही के सिंह यांच्यावर कारवाईची मागणी

=लोकसभेत कॉंग्रेस सदस्यांचा गदारोळ=
vk_singhनवी दिल्ली, [२ डिसेंबर] – परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवरून आज लोकसभेत गदारोळ झाला. कॉंग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येत जोरदार घोषणाबाजी केली.
लोकसभेत आज प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर आपल्या स्थगनप्रस्तावाचे काय झाले, अशी विचारणा कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी केली. त्यावर तुम्ही जो मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याला कालच गृहमंत्र्यांनी उत्तर दिले आहे, त्यामुळे तुमचा स्थगनप्रस्ताव मी नाकारत आहे, असे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितले. महाजन यांच्या निर्णयावर खडगे यांनी आक्षेप घेतला. यावेळी खडगे आणि सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यात जुगलबंदी झाली. तुम्ही आमच्या मंत्र्याबद्दल अवमानजनक भाषा वापरता, पंतप्रधानांच्या विरोधात घोषणा देता, हे योग्य नाही, त्यामुळे आता थोडी सहिष्णुता तुम्हीही दाखवा, असे नायडू म्हणाले. मात्र कॉंग्रेसचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. व्ही. के. सिंह यांच्यावर कारवाई करण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसचे सदस्य अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या आसनाजवळ आले आणि घोषणा देऊ लागले. दलितांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणार्‍या सिंह यांच्यावर कारवाई करावी, अशी कॉंग्रेसच्या सदस्यांची मागणी होती. सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणाही सदस्य देत होतेे. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सदस्यांनी शांत राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुमित्रा महाजन वारंवार करत होत्या. पण, त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. विशेष म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे कॉंग्रेसच्या सदस्यांच्या घोषणांना अधिकच जोर येत होता.
या मुद्यावर सिंह यांनी आपली बाजू आधीच मांडली आहे, त्यामुळे हा मुद्दा आता संपला आहे, याकडे लक्ष वेधत सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कॉंग्रेस सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण कॉंग्रेसचे सदस्य कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे या गोंधळातच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तामिळनाडूतील पूरपरिस्थितीवरील चर्चा सुरू केली. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्याचे पाहून शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहातून निघून गेले.
दलितांच्या विरोधात कोणीच काही बोलले नाही, तरीसुद्धा वारंवार असा आरोप करणे, हा दलितांचा अपमान आहे, असे नायडू म्हणाले. विरोधकांना तामीळनाडूतील पूरपरिस्थितीवर चर्चा करायची नाही, त्यामुळे ते हा मुद्दा उपस्थित करतात, असा आरोप नायडू यांनी केला. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मल्लिकार्जुन खडगे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25931

Posted by on 2:56 pm. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google