Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयएची क्लीन चिट

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयएची क्लीन चिट

=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व दहा जणांवरील मोक्का आरोपही मागे=
SADHVI_PRADNYAमुंबई, [१३ मे] – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व इतर पाच आरोपींवरील सर्व आरोप शुक्रवारी मागे घेत त्यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल प्रसाद पुरोहितसह सर्व दहा आरोपींवर मोक्का या कठोर कायद्यांतर्गत लावलेले आरोपही मागे घेतले आहेत.
या घटनेच्या तपासादरम्यान प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतर पाच आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर चालविण्यात येणारा खटला टिकणार नाही, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सात जण ठार झाले होते.
हिंदू कट्टरवादी गटांकडून हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप झाल्यानंतर या घटनेच्या तपासात अनेक चढउतार आले. प्रारंभी, या घटनेचा तपास मुंबईचे तत्कालीन सहआयुक्त व एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी केला होता. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांचा मुकाबला करताना हेमंत करकरे शहीद झाले. एनआयएने २०११ साली या प्रकरणाचा तपास हाती घेण्यापूर्वी एटीएसने १६ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला. परंतु, २० जानेवारी २००९ व २१ एप्रिल २०११ रोजी फक्त १४ आरोपींविरुद्ध मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर व कर्नल पुरोहित यांनी या आरोपपत्राला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात अनेकदा आव्हान दिले. प्रज्ञा ठाकूरशिवाय शिव नारायण कलसंगरा, श्याम भंवरलाल साहू, प्रवीण टक्कालकी, लोकेश शर्मा आणि धानसिंग चौधरी या इतर पाच आरोपींवरील आरोप मागे घेण्यात आले.
या प्रकरणात मोक्का कायद्यानुसार कोणताही गुन्हा करण्यात आलेला नाही, असेही एनआयएने स्पष्ट केले. या कायद्यानुसार अधीक्षक स्तरावरील अधिकार्‍यासमोर दिलेले कोणतेही बयाण पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या प्रकरणात कोणतेही घूमजाव करण्यात आले नसल्याचे एनआयए प्रमुख शरद कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यापूर्वी साध्वी प्रज्ञा व इतर आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जाला विरोध करण्याबाबत विचारले असता, जोपर्यंत आमचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला एटीएसच्या तपासावर विसंबून राहावे लागले. आता आम्ही आमचा तपास पूर्ण केला असून, अंतिम आरोपपत्र सादर केले आहे, असे शरद कुमार यांनी स्पष्ट केले. सरकारी वकील गीता गोडांबे यांनी विशेष न्यायाधीश एस. डी. टेकाले यांच्यासमोर हे आरोपपत्र दाखल केले.
प्रज्ञा ठाकूरला गोवण्यात आले : भाजपा
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूरला क्लीन चिट देण्याच्या एनआयएच्या निर्णयाचे भाजपाने स्वागत केले असून, कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात प्रज्ञा ठाकूरला जाणीवपूर्वक गोवण्यात आल्याचा आरोप केला. मालेगाव व समझौता बॉम्बस्फोट प्रकरणात कटकारस्थान करून तपास संस्थांनी हिंदुत्ववादी गटांवर खटले चालविले. काही राजकीय नेत्यांनी देशाच्या हिताविरोधात काम केले, असा आरोप भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी केला.
दरम्यान, कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजसिंह यांनी एनआयएच्या निर्णयावर टीका केली असून, दहशतवादी कृत्यांमध्ये लिप्त असलेल्यांना संघ, भाजपाकडून वाचविण्याचे प्रयत्न होतील; असे भाकीत आपण आधीच केले होते, असेही त्यांनी सांगितले. यासाठीच एनआयए प्रमुखांना मुदतवाढ देण्यात आली का, असा सवाल त्यांनी केला. परंतु, संस्थांच्या तपासात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे सांगत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिग्विजयसिंह यांचा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28226

Posted by on May 14 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (356 of 2451 articles)


मुंबई, [१३ मे] - तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने २००९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हिंदू दहशतवादाचा भ्रम निर्माण करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ...

×