Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सोनिया, राहुलची न्यायालयात हजेरी आज

सोनिया, राहुलची न्यायालयात हजेरी आज

=नॅशनल हेरॉल्ड प्रकरण=
soniaGandhi_rahulGandhiनवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी इतर नेत्यांसह उद्या शनिवारी सत्र न्यायालयात हजर राहाणार असून, यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
आज शुक्रवारी संसदभवन परिसरात यासंबंधी प्रश्‍न विचारला असता, सोनिया गांधी यांनी उद्या शनिवारी न्यायालयात उपस्थित राहाणार असल्याचे सांगितले. मात्र, जामीन मागणार की नाही, याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. या मुद्याचे राजकीय भांडवल करून त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सोनिया आणि राहुल गांधी न्यायालयात जामीन मागणार नाहीत, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. सोनिया व राहुल न्यायालयात हजर होण्यासाठी निघण्यापूर्वी कॉंग्रेसचे सर्व खासदार कॉंग्रेस मुख्यालयात गोळा होणार असून, त्याठिकाणी पुढील व्यूहरचना ठरविण्यात येईल, असा अंदाज आहे.
भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचे भासविण्यासाठी न्यायालयापर्यंत मार्च काढून एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची कॉंग्रेसची योजना होती, असे समजते. परंतु, नंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. पक्ष नेतृत्वासोबत एकजूटता दाखविण्यासाठी कुणालाही दिल्लीला बोलावण्यात आलेले नाही, असे कॉंग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र चालविणार्‍या द असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) या कंपनीचे ९० कोटींचे कर्ज कॉंग्रेसने पक्षाला मिळालेल्या देणगीमधून फेडले. यासाठी यंग इंडिया नावाची कंपनी स्थापन करून ५० लाख रुपयांच्या भागभांडवलात नॅशनल हेरॉल्डची हजारो कोटींची संपत्ती हडप केली, असा आरोप करून भाजपा नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सत्र आणि उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना काही गंभीर आक्षेप नोंदविले असल्यामुळे उद्या शनिवारी होणार्‍या सुनावणीत नेमके काय होते, याकडेच राजकीय वर्तुळासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
न्यायालय परिसरात कडक सुरक्षा
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात उद्या शनिवारी हजर राहाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस जिल्हा न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी), दिल्ली पोलिस आणि आयबीच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी न्यायालय परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, असे सूत्रांनी याबाबत माहिती देताना सांगितले. न्यायालय परिसरातील दुकाने उद्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26203

Posted by on Dec 19 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1012 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] - विद्यमान माहिती आयुक्तांपैकीच नियुक्ती करण्याच्या परंपरेला फाटा देत केंद्र सरकारने आज शुक्रवारी माजी संरक्षण सचिव ...

×