Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक » कॉलेज लाईफ एन्जॉय करा अन् प्रगतीही साधा (उत्तरार्ध)

कॉलेज लाईफ एन्जॉय करा अन् प्रगतीही साधा (उत्तरार्ध)

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ६
STUDENTS ARTICLE SERIES_6हॅलो फ्रेंड्स! कुठवर आली कॉलेजची तयारी? पाहिजे त्या कॉलेजला अॅडमिशन मिळाली की कोण आनंद होतो. आणि मग तयारी सुरु. पुस्तकं, वह्या, प्रॅक्टीकल बुक्स, जर्नल्स, नवी कॉलेज बॅग, क्लासला अॅडमिशन, नवी बाईक, खूप काही. मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, आपली कॉलेज लाईफची थोडी मानसिक तयारी झालीच असेल. मित्र-मैत्रिणी देखील कोण कुठे अॅडमिशन घेतंय पाहून झालंय.. आपल्या बरोबर कोण असेल याची उत्सुकता मात्र थोडी अजून शिल्लक आहे. फ्रेंडशिप डे, कॉलेज कट्टा, कॅन्टीन याची मजा अनुभवायची वाट पाहतो आहोत आपण, नाही का?
⦁कॉलेज म्हंटलं की अभ्यासाशिवाय इतर उपक्रमदेखील तितकेच खुणावतात आपल्याला. आजकाल सर्वच कॉलेजेसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम / महोत्सव भरवले जातात. या कार्यक्रमांचं एक वैशिष्ट्य आहे, की यामुळे केवळ मुलांना त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी एक व्यासपीठ मिळत नाही तर त्यामुळे कॉलेजचे नाव आणि प्रतिमा देखील उंचावली जाते. पूर्वी सर्वच कॉलेजमध्ये या गोष्टी बहुदा होत नसत आणि म्हणून मग, नाटक, वक्तृत्व, गायन इ. मध्ये जास्त रस असलेली मुले मुली काही ठराविक कॉलेजला अॅडमिशन घेत असत. आता जवळजवळ सर्व कॉलेजमध्ये लहान मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक व अभ्यासेतर उपक्रम, स्पर्धा भरविल्या जातात, ज्यामुळे मुलांच्या सांघिक गुणांचा (टीमवर्क) विकास होण्यास मदत होते. यांचा उपयोग पुढे त्यांना नोकरी मिळवतानादेखील होतो. कल्चरल शिवाय अनेक स्पर्धा, क्लब् / मंडळ असतात. तसेच एन. सी. सी., एन. एस. एस. असे स्व-संयम, स्वयंशिस्त लावणारे व सामाजिक भान जपणारे, विकसित करणारे उपक्रमदेखील आपल्या व्यक्तिमत्व विकासाला मदत करतात. या उपक्रमांमध्येही मुलानी जरूर भाग घ्यावा. अशा उपक्रमांची आपल्याला एक माणूस व एक चांगला नागरिक घडण्यासही मदत होते.
⦁कॉलेज आणि मोबाईल : आज भ्रमणध्वनीयंत्र म्हणजेच मोबाईल हा आपल्या जीवनाचाच नव्हे तर आपल्या शरीराचाही एक अविभाज्य अवयव झाला आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. आजची युवापिढी मोबाईलशिवाय स्वतःच्या अस्तित्वाची कल्पनादेखील करू शकत नाही. बऱ्याच पालकांनी मुलांना शाळेत असतानाच कधी हौस तर कधी सोयीचा भाग म्हणून मोबाईल घेवून दिलेला असतो. कॉलेजला येईपर्यंत नवनवीन मोबाईल हँडसेट बदलून देखील झालेले असतात. तर काही मुलामुलींना कॉलेजला गेल्यावर मोबाईल मिळेल असे आश्वासन मिळालेले असते, म्हणून देखील ते कॉलेजची वाट पहात असतात. मोबाईलमुळे कम्युनिकेशन / संवाद सोप्पा झाला आहे यात वादच नाही. परंतु, याचा आपल्या अभ्यासावर, आपल्या वागणुकीवर काही विपरीत परिणाम होवू नये यासाठी विद्यार्थ्यांनीच स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणजे नक्की काय करायचं? सोपच आहे. आपल्या क्लासमधील मुलांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे म्हणून त्यांच्या वाटसअप ग्रुपमध्ये राहणं भाग आहे. असे अनेक ग्रुप सांभाळत आपला अभ्यास यामुळे कमी होत नाही ना… हे देखील पाहिलं पाहिजे. वर्गात तास चालू असताना, परीक्षेच्या, प्रॅक्टीकल सुरु असताना आपल्या मोबाईलमुळे शिस्तभंग होत नाही नां, इतरांना त्याचा उपद्रव होत नाही ना, याची खबरदारी घेतली पाहिजे. काही कॉलेजमध्ये शिक्षकांचे संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करून देण्यात येतात, जेणे करून काही अडचण आल्यास संपर्क करता येवू शकतो. अशावेळी, मुलांनी ते क्रमांक आपल्याजवळ नेहमी बाळगले पाहिजेत, विशेषतः हॉस्टेलला राहणाऱ्या मुलांनी, किंवा घराबाहेर राहणाऱ्या मुलांनी. अचानक काही अपघात, रॅगिंग अथवा आजारी पडल्यास संपर्क करून मदत मिळवता येऊ शकते.
⦁व्यक्तिमत्व विकास : कॉलेजच्या शैक्षणिक वर्षांमध्ये आपल्या वागणुकीकडे सगळ्यांचेच अतिशय बारकाईने लक्ष असते. पालक, शेजारी-पाजारी, शिक्षक, आपले मित्र-मैत्रिणी, सगळेच आपल्याकडे कधी कुतूहलाने, तर कधी शिस्तीच्या भावनेतून पहात असतात. अशावेळी, या घडत्या वयामध्ये आपण केवळ मजा करतो, की सतत चांगल्या गोष्टींचे अनुकरण करून एक चांगला व्यक्ती म्हणून घडतो, यासाठी मुलांनी प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनही केले पाहिजे, उत्तम साहित्य व कलाकृतींचा देखील आस्वाद घेतला पाहिजे, खेळ खेळले पाहिजेत व आपल्या शारीरिक वाढीसाठी सतर्क व प्रयत्नशील राहिले पाहिजे. या सर्वांमुळे अभ्यासाचा ताण कमी होण्यासदेखील मदत होते. अनेक मुलेमुली कॉलेजच्या बरोबरीने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी देखील सुरु करतात. तर अनेकजण काही कला शिकण्याचा प्रयत्न करतात. आजकाल कॉलेजमध्ये अनेक उपक्रमांच्या माध्यमातून चांगले वक्ते, उद्योजक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते आदींना मुलांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. मुलांनी अशा कार्यक्रमांनाही उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला पाहिजे. चांगले वाचन, परिसंवाद, व्याख्याने या सगळ्याचा आपल्याला खूप फायदा होतो. ऐकलेली, शिकलेली कोणतीच गोष्ट कधीच वाया जात नाही. ती आपल्या व्यक्तीमत्वाचा एक भाग बनून राहिलेली असते आणि भविष्यात नक्कीच आपल्या उपयोगी पडते.
आणि हो, हे सारं करताना अभ्यास विसरू नका… कारण आपण अजूनही परीक्षेवर अवलंबून असलेल्या शिक्षणपद्धतीमध्ये जगत आहोत. मस्त कॉलेज लाइफ एन्जॉय करा… आणि मस्त मार्क्सदेखील मिळवा. तुमच्या मस्तीभर्‍या कॉलेज लाइफसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा!
 ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=23143

Posted by on Jun 30 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. Both comments and pings are currently closed.

Comments are closed

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (63 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान योगदिनामुळे उंचावली आहे यात दूमत नाही. भारताचा हरवलेला सन्मान योगदिनामुळे पुन्हा मिळाल्याची ...

×