Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक » कॉलेज लाईफ एन्जॉय करा अन् प्रगतीही साधा

कॉलेज लाईफ एन्जॉय करा अन् प्रगतीही साधा

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ५
STUDENTS ARTICLE SERIES_5“अग, कॉलेजला कोणी थ्री फोर्थ घालत का? फुल जीन्स घे, थ्री फोर्थ वगैरे काही नाही”, मार्केटमध्ये फिरताना एका आई आणि मुलीचा प्रेमळ संवाद कानी पडला. आपल्या नव्याने कॉलेजला प्रवेश घेतलेल्या मुलीसाठी खरेदी चालू होती. मुलगी शाळेच्या युनिफॉर्ममधून सुटका झाली म्हणून फॅशनेबल कपडे घालण्याच्या उत्साहात होती. होतच पण असं… शाळा कधी एकदा संपून कॉलेज सुरु होईल याची इतकी वाट पाहतो आपण त्याचं एक कारण हे सुद्धा असत की आता युनिफॉर्मला सुट्टी! अर्थात काही ज्युनिअर कॉलेज याला अपवाद आहेत, जिथे ११-१२ वी ला देखील युनिफॉर्म आहे.
नुकतेच दहावी-बारावी झालेल्या मुलामुलींना आता कॉलेजची आणि नवीन कपडे, नवी पुस्तकं, नवे मित्र मैत्रिणी, उत्साहाच वातावरण या सगळ्याची ओढ लागली आहे. अगदी साहजिकच आहे म्हणा. अॅडमिशन झाली की एक टप्पा गाठल्याचे समाधान आणि पुढील वर्षांबद्दल उत्सुकता असते मनामध्ये. खऱ्या अर्थाने फुलपाखराला पंख फुटण्याचे दिवस असतात हे. म्हणून तेंव्हाच खूप गोष्टींबाबत काळजी घेणे पण आवश्यक असते. कॉलेज लाईफची मजा अनुभवता अनुभवता, स्वतःच्या एक व्यक्ती म्हणून प्रगती होण्याकडेही लक्ष देणे आवश्यक असते.
⦁अभ्यासक्रमाची निवड व अभ्यासाची मानसिक तयारी : यापूर्वी देखील आपण अभ्यासक्रम व अभ्यासबाबत काही गोष्टीवर चर्चा केली आहे. तरीही एक गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगावीशी वाटते, की विद्यार्थ्यांनी अतिशय विचारपूर्वक अभ्यासाच्या वाटेची निवड करावी. यासाठी घरामध्ये आई-वडील, मोठे बहिण-भाऊ, शिक्षक, कौन्सेलर्स, ओळखीच्या तज्ञ व्यक्ती आदींशी सखोल चर्चा करून, मार्गदर्शन घेवून मगच कोणताही अभ्यासक्रम निवडावा. मित्र सगळे कॉमर्सला गेले आहेत, म्हणून चांगले मार्क्स असून, आई-वडिलांची इंजिनियरींगचे शिक्षण द्यायची तयारी असून देखील कॉमर्सला अॅडमिशन घेतल्यास नंतर आपल्याला वैफल्य येवू शकते किंवा आपल्याला न झेपणारा अभ्यासक्रम घेतल्याने नंतर शाखा बदलून घेतल्यानेही शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ शकते. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की, असे बदल केल्यामुळे मुलांना आपण मागे पडल्याचं सतत वाईट वाटत राहते. म्हणूनच, निर्णय घेताना, विचारपूर्वक घ्या.
कॉलेजच्या नव्या वातावरणात एकदम भारावून न जाता, आपण इथे अभ्यासदेखील करायचा आहे, याचं सतत भान ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आपण जर अवघड अभ्यासक्रम निवडला असेल, तर सुरुवातीपासूनच नियमित अभ्यासाकडे कल ठेवला पाहिजे, अन्यथा आपल्या ध्येयापासून दूर जाण्यास वेळ लागणार नाही.
⦁कॉलेज लाईफ आणि फॅशन : हे वय आहेच मुळी मस्त नटायचं-मुरडायचं. नुकतीच शाळा आणि युनिफॉर्ममधून सुटका झालेल्या मुला-मुलींना नक्कीच खूप आनंद असतो की आता रोज वेगवेगळया तऱ्हेचे कपडे घालायला मिळणार. यासाठी, आपण ज्या कॉलेजला अॅडमिशन घेतली आहे, तिथे किती प्रकारचे कपडे घालणे चालेल? काही बंधनं आहेत का?, याचा जरूर विचार करून आपल्या वयाला शोभतील असे फॅशनेबल कपडे जरूर घालावे. यात आपल्या सोयीचा आणि कम्फर्टचा देखील विचार करावा. सध्या सर्व माध्यमातून याबद्दलच्या फॅशनची चर्चा चालू आहे.
⦁कॉलेज लाईफ आणि मित्र मैत्रिणी : मैत्र हा आपल्या आयुष्याचाच एक अविभाज्य घटक आहे. कॉलेजला जाताना काही जुने फ्रेंड्स असतातच आपल्याबरोबर, पण अनेक नवनवीन मित्रमैत्रिणींची त्यात भर पडते. यामध्ये आपल्या वर्गातील, कोचिंग क्लासमधील, प्रॅक्टीकलला सोबत असणारे, कॅंटीन फ्रेंड्स, कल्चरल ग्रुपमधले, स्पोर्टस्‌ ग्रुपमधले अशा अनेक वेगवेगळ्या मित्रांशी मैत्री जमत राहते आणि फुलत राहते. या मैत्रीचा आपल्या अभ्यासावर विपरीत परिणाम न होऊ देता आपल्या व्यक्तिमत्व विकसित होण्याला कसा फायदा होईल हे देखील पाहिले पाहिजे. उदा. माझ्या ग्रुपमधील उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या मित्र/मैत्रिणीमुळे माझंदेखील इंग्रजी सुधारेल का? हा विचार करणं अजिबात गैर नाही. कारण, दुसऱ्याचे चांगले गुण आपण नेहमी तत्परतेने घेतले पाहिजेत. त्याचा आपल्याला पुढे फायदाच होतो. कित्येकदा अशा मैत्रीमधून अनेक मोठे उद्योग व्यवसाय जन्माला आले आहेत. सुंदर निरोगी मैत्री कशी फुलेल यासाठी जरूर प्रयत्न करा.
⦁फ्रेशर्स पार्टी : अनेक कॉलेजमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या मुलांसाठी सिनिअर मुले फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करतात. माझ्या कॉलेजमध्ये ही प्रथा नव्हती त्यामुळे मला मी प्राध्यापक झाल्यानंतरच याची मजा मुलांबरोबर अनुभवता आली. सर्वाची ओळख होणे, कॉलेजला आल्यानंतर एकप्रकारचे टेन्शन असते ते हलके करणे असा याचा मूळ उद्देश आहे. या पार्टीचे स्वरूप वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळे असते. काही ठिकाणी मोठे पार्टी हॉल बुक करून देखील पार्टी साजरी होते. काही ठिकाणी शिक्षकांना यात सामील केले जाते, काही ठिकाणी मुले स्वतंत्रपणे याचे आयोजन करतात. कधी ड्रेस कोड असतो, कधी नसतो. अनेक नाविन्यपूर्ण कल्पना लढवून फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केलेले असते. कसेही असेल तरी फ्रेशर्स पार्टी ही एक मस्त आठवण असते… ती जरूर अनुभवा.
⦁कॉलेज लाईफ आणि कल्चरल्स : कॉलेज सुरु झाल्यावर सगळ्यात मोठे आकर्षण असते ते विविध ‘डेज’चे! सगळ्यात आधी येतो तो ‘फ्रेंडशिप डे’! मग हळू हळू एक एक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा यांच्या नोटीस झळकू लागतात. ज्यांना गाणे, अभिनय, नृत्य, कविता, वक्तृत्व, इ. ची आवड आहे, त्यांसाठी ही पर्वणीच असते. विविध स्पर्धांमधून आपल्या कलागुणांना जरुर वाव मिळतो, अनेक नवनवीन ओळखी होतात, अड्डे जमतात, चर्चा होते, वाद विवाद होतात. काहींना कॉलजमध्ये आपल्यातला गायक, कलाकार, लेखक/ कवी, नाटककार अथवा नेता सापडतो. या अशा स्पर्धा व कार्यक्रमांमुळे आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळतो, ग्रुपमध्ये काम करण्याचे कौशल्य मिळते, नवी मैत्री होते आणि अतिशय निखळ आनंद मिळतो. म्हणून हे सगळ जरूर अनुभवा! (पूर्वार्ध…)

 ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=23083

Posted by on Jun 23 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (65 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• आपले दुर्दैव हे आहे की आपल्याच देशातील विरोधी पक्षाला आणि काही तथाकथित विद्वानांना म्यानमारमधील सेनेची कारवाई ...

×