richwood
richwood
richwood

पंढरीची वारी आणि तरुणाई !

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : १०
wari1 copy“मनी विठू गान, पावसाचे दान,
पायी पंढरीची वाट, तरुणाई चालते”
नव्या पिढीच्या अभंगाचे बोल आहेत हे!
गेल्या काही वर्षापासून तरुण पिढी आषाढातील पंढरपूरच्या पायी वारीकडे आकर्षित झालेली दिसते. खास करून ज्यांच्या घरी वारीची परंपरा नाही, अशी तरुण मंडळीदेखील काहीशा कुतूहलाने, काही भक्तीने, काही अगम्य मनःशांतीच्या ओढीने पंढरपूरची वाट चालताना दिसते आहे. यात ग्रामीण, शहरी अशा दोन्हीचा समावेश आहे. वारी आता केवळ शेतकरी, कष्टकरी किंवा ग्रामीण वारकऱ्यांची अशी राहिलेली नाही, त्यात आता मुंबई, पुण्यासारख्या शहरातील लोकही अतिशय उत्साहाने आणि शिस्तीने सहभागी होताना दिसतात.
वारीला जाण्याची प्रत्येकाची प्रेरणा निरनिराळी असते; कोणी श्रद्धेपोटी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी पंढरीच्या वारीचा इतिहासाचा, व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी, कोणी केवळ वारकऱ्यांची, विठूरायाची सेवा करण्यासाठी तर कोणी वारीमध्ये काही नवीन व्यवसाय देखील करून अर्थार्जन करण्यासाठी! माझ्या मते, कोणत्याही प्रकारे वारीशी संलग्न होणे म्हणजे विठूभक्तीची वाट चालाण्यासारखेच आहे. आजची तरुणाई देखील याला अपवाद कशी असेल? कालच आषाढी एकादशीचा मनोहारी उत्सव अतिशय भक्तीभावाने पंढरपुरात साजरा झाला. यात तरुणाई मोठ्या संख्येने सामील झाली होती. जीन्स- टीशर्ट, पाठीवर सैक, गळ्यात डीजीटल कैमेरा अशा रूपात अनेक तरुण मंडळी सध्या आषाढवारी करताना दिसतात. अर्थात त्याकरिता पूर्ण पंढरपूरपर्यंत चालले पाहिजे असे नाही तर अनेक जण केवळ विकेंडला आपल्या सोयीने यात सहभागी होताना दिसतात. यामध्ये कॉलेजचे विद्यार्थी, आयटीमधील तरुण मंडळी देखील सहभागी होताना दिसतात. चक्क ‘आयटी दिंडी’ सुद्धा वारीत गेल्या काही वर्षापासून आहे.
सोशल मीडिया मुळेच वारी जास्त तरुणांपर्यंत पोहोचली. आजची तरुण मंडळी, यात विद्यार्थी, नोकरदार दोन्हींचा समावेश आहे, जे वारीपुर्वी त्याबद्दल इंटरनेट साईट्सवरून माहिती गोळा करतात, अभंग ऐकतात, संतपरंपरेबद्दल, दिंडीबद्दल वाचतात. या निमित्ताने त्यांना आपल्या समृद्ध संतपरंपरेची ओळख देखील नव्याने होते आहे आणि त्यांना एका अनामिक ओढीची देखील जाणीव होते आहे, जी इंटरनेट, मोबाइल फोन, चॅटींग यामध्येच नाही! तर वारीमध्ये चालत असताना एकमेकास ‘माउली’ असे हाक मारणे देखील अतिशय जिव्हाळा आणि आपलेपणा निर्माण करणारे आहे. वारीमध्ये सहभागी होणे हे केवळ वारीचे अतिशय कलात्मक फोटो काढणे, फेसबुक अथवा ट्वीटरवर अपडेट करणे, इतकंच याचं स्वरूप मर्यादित नाहीये. तर, वारीचा भव्यपणा, वारकऱ्यांमधील शिस्त, वारीचं व्यवस्थापन, त्यासाठीची बांधिलकी, कमिटमेंट हे सगळच विठूमाऊली इतकंच ओढ लावणार आहे. बहुदा म्हणूनच हळूहळू पंढरीची वारी तरुणाईमध्ये एक आकर्षण बनली. हेही मान्य केले पाहिजे की आज सोशल मीडिया, न्यूज तरुणाईच्या सहभागाला कवरेज देवून एक प्रकारे प्रोत्साहन देते आहे. देवाच्या ओढीने इतके पायी चालत जाण्याची जी ताकद येते ती भक्तीभावामुळेच येते असं वारकरी सांगतात. या वारीतून हेच आजची तरुण पिढी शिकत आहे की जर प्रचंड मेहनत करायची जिद्द असेल, सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ताकद पणाला लावायची तयारी असेल तर आपल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचता येतं! या संकल्पातून देशाची बळकट नवीपिढी निर्माण होतेय, जी या वारीतून सेवाकार्याचा महत्व जाणून घेतेय ही लाखमोलाची बाब आहे.
काहींना तरुणाईचा वारीतील टेक्नो-सहभाग हे एक फॅड वाटतो. पण, याकडे केवळ टीकात्मक वृत्तीने न पाहता सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणं आवश्यक आहे. मला वाटत की ही तरुणाई एका अतिशय सकारात्मक सद्संगतीत जाते आहे. पूर्वी संतांनी जनतेला व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी, परमार्थाची ओळख करून देण्यासाठी म्हणून अभंग रचले, देवाबद्दल गोडी उत्पन्न केली, काही अंशी धार्मिकपणा वाढीस लावला. आजच्या क्लब-पबमध्ये रमणाऱ्या तरुण पिढीला पुन्हा या साऱ्याची गरज आहे. त्यांच्यामधला संवाद वाढेल, त्यांना आपली संस्कृती माहिती होईल, जपता येईल, मनःशांती मिळेल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. अशावेळी, ही पंढरीची वारी नक्कीच काही परिवर्तन करू शकेल. महाराष्ट्राची संतपरंपरा काही अंशी का होईना पण नक्कीच पुढे चालत राहील.
आता पंढरपूरला पायी चालत जाणे इतकीच यातील तरुणाईच्या सहभागाची व्याप्ती राहिलेली नाही तर आता ठिकठिकाणी तरुण मंडळी यात वारकऱ्यांची अनेक प्रकारे सेवा करताना दिसतात. कॉलेजमध्ये एन. एस. एस., एन. सी. सी. अशा उपक्रमांमुळे, विविध गणेशमंडळांमधील उपक्रमातील सहभागामुळे आजच्या तरुण पिढीला सामाजिक कार्याचे भान येवू लागले आहे. तरुण पिढी आज अतिशय शिस्तबद्धपणे सोशल मीडियाच्या मदतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवताना दिसते. यात वारीच्या वाटेवरील गावांमधून पाण्याची सोय करणे, अन्नदान, स्वच्छता, मोबाइल चार्जिंग, तसेच आरोग्यसेवा अशा अनेक स्वरूपात तरुणाई सेवा करताना दिसते आहे. ‘वारकऱ्यांची सेवा हीच विठूरायाची सेवा’ हा भाव अनेक तरुण मंडळींच्या सेवेमध्ये दिसून येतो. मला स्वतःला देखील वारकरी मंडळाला देणगी देणे, सहकार्य करणे यात देखील काही अंशी विठूरायाच्या सेवेचे समाधान मिळते आणि नकळत वारीतील तुळशी वृन्दावनाला हात जोडले जातात.

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: http://vrittabharati.in/?p=23530

Posted by on 4:32 am. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

2 Comments for “पंढरीची वारी आणि तरुणाई !”

  1. अतिशय सांगोपांग, प्रगल्भ लिखाण, यात एकचंमुद्दा मला add करावासा वाटतो, तो म्हणजे नाविन्याची ओढ, सोशल मीडिया, आणि technology chaya असह्य कोंडमा र्यातून बाहेर पडण्याची गरज, याने तरुण पिढी अशा वाटा चोखंदळताना दिसते, ज्याच अप्रूप वाटते तिकडे मन धाव घेते पण कशाचेही अप्रूप वाटण्याच्या पलीकडे आपली वाटचाल चालू आहे
    खूप सुरेख लिखाण

    • स्थितप्रज्ञता येण्यासाठी खरं तर लोक आध्यात्माची कास धरतात, पण, वारी आताची पिढी फोटोग्राफीसाठी करू लागली आहे मागील 2 वर्षात.

      त्यातून मिळणारा निर्भेळ आनंद पुन्हा बाजूला पडतो आहे असे वाटते

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google