Home » युवा भरारी » पत्रकारिता बदललेले स्वरुप

पत्रकारिता बदललेले स्वरुप

पत्रकारिता बदललेले स्वरुप – सध्या टिव्हीवर अनेक वृत्तवाहिन्यांचे पेवच फुटले आहे. या सगळ्या वाहिन्यांमागे जाहिरातींचे फार मोठे अर्थकारण असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण ‘नेम आणि फेम’ देणारे हे क्षेत्र नेमके कसे आहे? चोवीस तास बातम्या देणार्‍या एखाद्या वाहिनीमागे किती जण कार्यरत असतात? कोण असतात हे पत्रकार? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे जनसंवाद विभागाचे प्रमुख मोईझ मन्नान हक यांच्याशी आम्ही बातचीत केली खास तुमच्यासाठी…
देशात सध्याच्या वातावरणात वाढत्या तंत्रज्ञानामुळे माध्यमांना एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक मंदीचे सावट देशावर असताना, तरुणांना चांगली संधी आणि त्याचवेळी पैसा देणारे क्षेत्र म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जात आहे. आगामी तीन ते चार वर्षांत पत्रकारिता आणि संबंधित क्षेत्रामधील आर्थिक उलाढाल साधारण दुपटीने वाढणार आहे, असे सांगून हक पुढे म्हणाले की, सध्या या व्यवसायात साधारण ८२,००० कोटींची गुंतवणूक आहे. येत्या २०१७ वर्षापर्यंत ती वाढून १,६६,००० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
आजकाल प्रत्येक तरुणाच्या कानात ‘इअरफोन’ लावलेले दिसतात. मोबाईलवर एफएम रेडिओ ऐकण्याची फॅशन रूढ झाली आहेच. या एफएम रेडिओची इंडस्ट्रीही चांगलीच फोफावली आहे. या क्षेत्रातील गुंतवणूकही २,३०० कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज आहे. मार्च २०१४ पर्यंत खाजगी एफएम रेडिओ केंद्रांची संख्या २४५ वर जाणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मानाचे आणि चांगला पैसा मिळवून देणारे क्षेत्र म्हणून जनसंवाद आणि पत्रत्तकारिता हे एक चांगले ऑप्शन आहे.
आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांपासून आतापर्यंत बर्‍याच गोष्टी बदललेल्या असल्या तरी एक मूळ संकल्पना आजही कायम आहे, ती म्हणजे या क्षेत्रात असणारे ‘थ्रिल’ दुसर्‍याच एखाद्या विषयात पदवी किंवा उच्च शिक्षण घेतलेले अनेक जण केवळ या थ्रिल साठी पत्रकारितेचे क्षेत्र निवडत असल्याचे हक म्हणाले. अगदी इंजिनियरिंगची पदवी घेतलेला मुलगाही केवळ याच आकर्षणापोटी या अभ्यासक्रमाला दाखल झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
वृत्तवाहिनी, मासिक असो किंवा एखादे वर्तमानपत्र त्यांचे अर्थकारण सांभाळण्याची जबाबदारी जाहिरातींवर असते. या सर्व माध्यमांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून सध्या होणारी गुंतवणूक ३२,७४० कोटी रुपये असून काही वर्षांत त्यात नऊ टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे. लहान-मोठ्या गाव आणि शहरात लोकप्रिय असणारे मुद्रीत माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. या क्षेत्रातील एकूण गुंतवणूकीपैकी तब्बल ४६ टक्के वाटा एकट्या प्रिंट माध्यमाचा आहे, हे विशेष. त्याशिवाय, टेलिव्हिजनवरील वृत्त आणि इतर मनोरंजन वाहिन्यांचाही या गुंतवणुकीत मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. माध्यमांचा आत्मा असलेल्या जाहिरातींच्या क्षेत्रातही २०१७ या वर्षापर्यंत दुपटीने वाढ अपेक्षित असून त्यातील गुंतवणूक ६३,००० कोटी रुपयांवर जाणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणातून पुढे आला असल्याची माहिती मोईझ यांनी दिली.
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांपैकी कोणीही आपल्याला पत्रकार व्हायचे आहे, अशी ईच्छा व्यक्त करीत नाही. कारण पत्रकार म्हणजे दाढी वाढविलेला, खांद्यावर शबनम बॅग घेऊन सायकलवर फिरणारा असे काहिसे चित्र आजही समाजमनात खोलवर रुजली आहे. ‘झोला ब्रिगेड’ अशी संभावना केल्या जाणार्‍या पत्रकार जमातीची व्याख्या आता बदलण्याची गरज असून सध्या सगळ्यात ‘ग्लोरिफाईड’ आणि ‘हॅपनिंग’ जर कोणते करिअर असेल तर ते हेच आहे. शिवाय, रात्री झोपताना मनात आपण काहीतरी चांगले आणि ‘क्रिएटिव्ह’ काम केल्याचे समाधान मिळतेच, असा विश्‍वास प्राध्यापक हक यांनी व्यक्त केला.
आता या प्रवाही क्षेत्रात येण्यासाठी काय आवश्यक आहे, हा प्रश्‍न तुम्हाला पडलाच असेल. त्यावर मोईझ म्हणाले की, सगळ्यात आधी जर तुम्हाला काही आवश्यक असेल तर ते आहे, ‘ऍटीट्यूड’ जर ते तुमच्याजवळ आहे तर बाकी आवश्यक गुण आपोआपच तुमच्याकडे येतील. त्यात भाषेवर प्रभुत्व आणि उत्तम संवादकौशल्य या दोन प्रमुख गुणांचा समावेश आहे. अर्थात हे शिकण्यासाठीच तुम्हाला जनसंवाद अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. यासाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. देशभरात अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये हा अभ्यासक्रम घेतात. शिवाय, मुक्त विद्यापीठांतूनही हा अभ्यासक्रम करता येऊ शकतो.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक वर्षाचा ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम’ आणि एक वर्षाचा ‘व्हिडीओ प्रोग्रामिंग’ हे अभ्याक्रम उपलब्ध आहेत. हे दोन्ही अभ्यासक्रम पदव्युत्तर करावयाचे आहेत. त्याशिवाय, चार सेमिस्टर म्हणजेच दोन वर्षांचा ‘एम.ए. इन मास कम्युनिकेशन’ हा अभ्यासक्रमही एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी एका विशिष्ट पदवीची गरज नाही. कोणत्याही अगदी एम.बी.ए. झालेले तरुणसुद्धा या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात.
हे सर्व अभ्यासक्रम लेखी आणि प्रात्यक्षिक परिक्षा पद्धतींवर आधारीत आहेत. जाहिरात आणि जनसंपर्क हे विषयही अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले असून बातम्याचे संकलन, संपादन आणि इतर लिखाणाच्या सरावाचाही त्यात समावेश आहे.
एकूण काय, हा अभ्याक्रम केवळ एका पत्रकाराला घडवित नसून, संबंधित तरुणापुढे व्यवसायाच्या अनेक संधींचा मार्ग प्रशस्त होतो. हा एक ‘प्रोफेशनल’ अभ्यासक्रम असल्याने कॉपी रायटर, कॉपी एडीटर, फिचर रायटर, कॅमेरामन, व्हिडीओ एडीटर, निवेदक, पटकथा-संहिता लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि वेब कन्टेन्ट रायटर या आणि अशा अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.
तर मग मित्रांनो, मोईझ मन्नान हक यांनी दिलेली ही माहिती आवडली ना! हे भन्नाट आणि वेगवान विश्‍व तुमच्यासारख्या तरुणांसाठीच आहे. मग आता पत्रकारितेच्या क्षेत्राचाही करियर म्हणून विचार करायला हरकत नाही, व्हॉट से?
रेवती अंधारे-जोशी

Short URL: https://vrittabharati.in/?p=8628

Posted by on Oct 8 2013. Filed under युवा भरारी. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in युवा भरारी (11 of 28 articles)


आपल्या आवडत्या क्षेत्रात करीअर करावे असे सर्वांनाच वाटत असते. लहानपणापासून तशी संधी सगळे शोधत असतात, त्यासाठी प्रयत्न करतअसतात.कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी ...

×