मैत्री करताना…

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ४
college students“यारा यारा यारा… ,
फ्रेंडशिपचा खेळ सारा,
येडे चाळे कधी उनाड मस्ती,
जरी जागरण तरी न सुस्ती,
यारो ओके मग सरी बरसतील,
फुलतील फ्रेंडशिपच्या बागा…”
‘दुनियादारी’ या हिट सिनेमाच्या या गाण्याने अनेकांना आपल्या कॉलेजच्या दिवसांची पुन्हा आठवण करून दिली. तरुणाईला वेड लावलं या सिनेमाने आणि यातील गाण्यांनी! कॉलेज सुरु होण्याचे दिवस आले… आता कॉलेज कट्टे पुन्हा फुलतील… जिवंत होतील… मैत्रीचे नवे धुमारे फुटतील… खूप मस्त दिवस असतात नाही का कॉलेजचे! शाळेपासूनच या मैत्रीच्या अध्यायांना सुरुवात होते. एका सर्व्हेमध्ये असं निदर्शनास आलं होतं की शाळेमधील मैत्रीच सगळ्यात जास्त वर्ष टिकते. अर्थात्, या मैत्रीमध्ये नवनवीन मित्र-मैत्रिणींची भरच पडत जाते. आजकाल इंटरनेट, फेसबुक, व्हाटस्अपमुळे जुनी मैत्री टिकवणे आणि नवीन मैत्री करणे दोन्ही सोप्पं झालंय.
काय देत नाही आपल्याला मैत्री? खूप काही!, जे सांगता येतं. खूप काही!, जे कळत देखील नाही असं देवून जाते मैत्री. आधार, आपुलकी, विश्वास, प्रेम, माया, उमेद खूप काही दिलं आणि घेतलं जातं मैत्रीमध्ये. अतिशय सुंदर नातं आहे हे. पूर्वीसारख आता मुलं आणि मुली यांच्या मैत्रीला बंधन नाही. मोठ्या शहराततरी मुला-मुलींची निखळ मैत्री समाजमान्य झाली आहे.
मैत्रीला काही नियम नाहीत की कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी नाही. याला वयाचं, शिक्षणाचं, सामाजिक प्रतिष्ठेचं, आर्थिक परिस्थितीच, कशाचंच बंधन नाही. मैत्री करायला काही क्वालीफिकेशन नसत. पण, ती फुलवण्यासाठी, जपण्यासाठी मात्र काही गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. मैत्री सकारात्मक कशी राहील आणि त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम कसा होणार नाही, यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
शाळा-कॉलेजमध्ये आपण कोणाशी मैत्री करतो आहोत किंवा आपले पाल्य कोणाशी मैत्री करत आहे, याबद्दल थोड जागरूक राहिलं पाहिजे. नाकळत्या वयात मैत्रीमध्ये वाहून जाण्याचा धोका देखील असतो. मी असं मुळीच म्हणणार नाही की चुकीच्या माणसांशी मैत्री होण्याचा धोका असतो, कारण, मी स्वतः असं मानते, की व्यक्ती चुकीच्या नसतात, तर परिस्थिती आणि सवयी चुकीच्या असतात. प्रत्येक माणसाचे एक वैशिष्ट्य असते आणि ते समजून, जाणून जर आपण मैत्री केली आणि त्या चुकीच्या सवयी आड येऊ नाही दिल्या तरी मैत्री आपल्या जागी सुरक्षित राहते. अशाच काही गोष्टी ज्या लक्षात घेतल्या तर मैत्री फुलेल आणि छान जपली देखील जाईल, असं तज्ञांचं मत आहे.
⦁आपल्या मैत्रीमध्ये सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक प्रतिष्ठा आड येऊ देऊ नका.
⦁मित्र-मैत्रीणीना मदत करणे आपले कर्तव्य आहे. परंतु, अनेक वेळा पैशाचे व्यवहार मैत्री बिघडण्यास कारणीभूत होतात. म्हणून, मैत्रीमध्ये पैशाचे व्यवहार जपून करावे.
⦁मैत्रीला शक्यतो कोणतेही लेबल लावू नये. बेस्ट फ्रेंड, खास फ्रेंड असे लेबल आपल्याला आणि आपल्या मित्राना सुखावह वाटू शकतात, पण त्यामुळे वागणुकीबद्दल काही अपेक्षा निर्माण होऊ शकतात. त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास मानसिक त्रास होतो, वाद होतात. उदा. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, म्हणून तू असाच वागायला हवा होतस! म्हणूनच लेबल न लावलेलच बर. आणि समजा लावलं तरी अवास्तव अपेक्षा ठेवू नये, कारण अपेक्षाभंगाचा त्रास आपल्यालाच होतो.
⦁मैत्रीमध्ये किंवा कोणत्याही नात्यामध्ये एकमेकाला स्पेस देणं, हे फार महत्वाचं असत. आपल्या मित्राबद्दल अथवा मैत्रिणीबद्दल कितीही पझेसिवनेस वाटला तरी या स्पेसला कधी धक्का लागू देवू नये. प्रत्येकाला आपल काही खासगी आयुष्य असत, आपला म्हणून वेळ हवा असू शकतो आणि तो आपण द्यायला शिकल पाहिजे. त्यामुळे नातं जपल जायला मदतच होते.
⦁मित्र होण्याकरता आधी मित्र बनलं पाहिजे असं म्हणतात. म्हणजेच, मैत्री हे नातं देखील दोन्ही बाजूनी येणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असत.
⦁    अल्पकाळाच्या फायद्यासाठी मैत्री करण अतिशय चुकीचं आहे. अशी मैत्री टिकत देखील नाही व समोरच्या व्यक्तीला दुखद अनुभव देवून जाते. यापेक्षा, आपल्यामुळे आपल्या मैत्रीमध्ये मौल्यवान भर कशी पडेल, एकमेकाच्या व्यक्तिमत्वाला कसा फायदा होईल हे पाहिलं पाहिजे.
⦁कधी कधी आपल्या मित्र-मैत्रिणींच्या काही सवयी आपणास चुकीच्या वाटू शकतात. त्या जर खरच वाईट सवयी असतील तर त्यापासून आपण त्यांना परावृत्त केलं पाहिजे. पण, जर ते शक्यच नसेल, तर किमान त्या वाईट सवयींना आपण बळी पडणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. कारण, वाईट सवयीच नेहमी पटकन अंगवळणी पडतात. चांगल्या सवयींसाठी फार प्रयत्न करावे लागतात.
⦁स्पष्ट बोलणे आणि पारदर्शक असणे हे कोणत्याही नात्यासाठी आवश्यक आहे. न बोलल्यामुळे अनेकदा गैरसमज होतात, म्हणून छोटे मोठे गैरसमज झाले तरी स्पष्ट बोलून ते दूर करता आले तर जास्त बर.
⦁असं म्हणतात की विश्वास हा खोड-रबर सारखा असतो, जितका खोडला जाईल, तस तसा तो कमी कमी होत जातो! अगदी खरे आहे. मैत्री ही विश्वासावर उभी असते, मैत्रीमध्ये विश्वासघात करू नये, खोटे बोलणे टाळावे. एकमेकाच्या पाठीमागे वाईट बोलणेही अयोग्य.
⦁विश्वासार्ह मैत्रीसाठी प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी अनेक प्रसंगांमध्ये आपल्यावर आपला मित्र अथवा मैत्रीण कसं विसंबू शकतो / शकते हे सिद्ध करावे लागते.
⦁कोणत्याही नात्यामध्ये लवचिकता असणे फार महत्वाचे. तशी ती मैत्रीच्या नात्यात देखील असायला हवी. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी, आपल्याला हवी तशी आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने केली पाहिजे, असं हट्ट धरून नाही चालत. थोडसं समोरच्याच्या कलाने घेता आल तर मन जपता येतं.
⦁’मुच्युअल बेनिफिट’ म्हणजेच परस्परास उपयोगी पडणारी मैत्री देखील हवी. म्हणजे, या नात्यामुळे अनेकदा एकमेकाला मदत होऊ शकते. उदा. एका मित्राचे इंग्रजी संभाषण उत्तम आहे, व दुसऱ्याचे जनरल नॉलेज. मग याची जर देवाण घेवाण झाली तर नक्कीच याचा दोघांनाही फायदा होऊ शकेल. एकाचे इंग्रजी सुधारेल, तर दुसऱ्याचे जनरल नॉलेज.
⦁मैत्रीमध्ये सुद्धा एकमेकाचा आदर करणे गरजेचे असते. अगदी एकेरी किंवा टोपण नावांनी हाक मारत असलो तरी एक व्यक्ती म्हणून एकमेकाचा आदर करणे खूप आवश्यक आहे. ते आपण एक चांगली व्यक्ती असल्याचे लक्षण होय.
⦁अनेक मित्र असणे, हे तुम्ही सोशल असल्याचे लक्षण आहे. परंतु, यामध्ये सकारात्मक विचार असणाऱ्या मित्रांची / मैत्रिणींची संख्या जास्त असावी. याचा आपले सकारात्मक विचार टिकवण्यास अथवा प्रत्यक्षात आणण्यास मदत होते. नकारात्मक विचार असणाऱ्या मित्र मैत्रीणीमुळे आपले नुकसान होऊ शकते. आपल्या व्यक्तीमत्वावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
खूप काही देणारी, खूप काही जपणारी अशी ही मैत्री… आपल्या शाळा – कॉलेज जीवनाचा अविभाज्य घटक असते व पर्यायाने आपल्या आयुष्याचा देखील! तुमची अशीच सुंदर मैत्री जुळण्यासाठी व फुलण्यासाठी माझ्या शुभेच्छा!!!

 ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22954

Posted by on Jun 16 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (67 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• सिंधु, ब्रह्मपुत्रा, तीस्ता आणि गंगा नदीच्या पाण्याच्या वाटणीवरुन चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशाबरोबर तणावाची स्थिती निर्माण ...

×