रिझल्टच्या उंबरठ्यावर…!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : १
STUDENTS ARTICLE 1 MRINAL“काय मग इंजीनिअर साहेब, कधी आहे रिझल्ट?”, “आईने देव पाण्यात घातलेत चांगल्या मार्कांनी पास व्हावास / व्हावीस म्हणून”, “काय मग पेढे कधी?….” असे एक ना अनेक प्रश्न… ज्याची उत्तरं प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला देखील माहित असतात बहुतेक वेळा! पण, “यंदा बारावी ना? मग काय मेडीकल का इंजिनिअरिंग?” हे प्रश्न विचारले की आपल कर्तव्य केल, असं समजून काही लोक मुलांना विचारून त्रस्त करून सोडतात. आधीच बिचारी अभ्यासाच्या ओझ्याने दबलेली, रिझल्टच्या टेन्शनने झोप उडालेली आणि आई-बाबांच्या अपेक्षांच ओझं वाहून वाकलेली मुलं अजूनच त्रस्त होवून जातात. आता घोडा मैदान जवळच आहे. बऱ्याच मुलांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. म्हणूनच मी जाणीवपूर्वक असे प्रश्न विचारायचे नेहमीच टाळते आहे, कारण मला अजून देखील आठवत आहे की मी स्वतः किती वैतागून जायचे या प्रश्नांनी.
एकीकडे, वर्षभराच्या अभ्यासातून आणि टाईमटेबलमधून सुटल्याचा आनंद किंवा पुढील वर्षाच्या पूर्व तयारीचे क्लास यात मग्न असलेली किंवा दहावी संपून कॉलेजला जायचं या आनंदात आणि उत्साहात असलेली मुलं, रिझल्ट जवळ आला की त्या टेन्शनमुळे पार कोमेजून जातात. त्यात आई-बाबांना देखील टेन्शन असतच, की आपली इज्जत राखेल ना याचा / हिचा रिझल्ट? रिझल्ट मनासारखा झाला की कॉलेज आणि कोर्स शोधायची गडबड… तरी आजकाल पाक्षिकं, वृत्तपत्र, आणि इंटरनेट यामुळे कॉलेज आणि कोर्स शोधणे, फॉर्म भरणे आदी कामे सोपी झाली आहेत. तरीही त्यामागे धावपळ होतेच. कॉलेजच्या नव्या वातावरणात, नव्या अभ्यासात आणि नव्या मित्र-मैत्रिणींमध्ये रमत असतानाही मुलांना एक प्रकारचा ताण असतोच. काही मुलांना कसलाच ताण न घेण्याची कला जमते, तर काहींना उगीच ताण घ्यायची सवय असते. एकूण काय, १०-१२ वी आणि पुढील शिक्षण संपेपर्यंत ही कसरत चालूच राहते.
आत्ता सध्या ‘कसे निवडाल तुमचे करिअर’, अशा प्रकारच्या कार्यक्रमांची जोरदार चर्चा आणि गर्दी आहे. हे छानच आहे. कारण यामुळे ज्यांना घरी जास्त मार्गदर्शन द्यायला कोणी नसते त्यांना याचा फायदा होतो. किंवा जर काही शंका असतील तर त्याचे निरसन होते. मुलांनी जरूर या लेखांचा, कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा. याचबरोबर स्वतः देखील बसून थोडासा आपला आपण स्वतंत्रपणे आणि सारासार विचार करावा, घरात चर्चा करावी की आपल्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्याच बरोबर उत्तम अर्थार्जन होईल असे कोणते करिअर आपण निवडू शकतो आणि त्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे. आंधळेपणाने अमुकने या कोर्सला प्रवेश घेतला किंवा सगळे मित्र कॉमर्स घेणार म्हणून मी सुद्धा, असा विचार करू नये. आज बऱ्याच क्षेत्रांमध्ये स्याचुरेशन आले आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा ओळखून विचारपूर्वक अभ्यासक्रम निवडले पाहिजेत.
मला माहित आहे, इतकं वाचून देखील माझ्या १०वी – १२वीच्या मित्र-मैत्रिणींना धाप लागली असेल. पण, आजची पिढी खूप विचार करते, माहिती कशी आणि कुठून मिळवायची याची त्यांना जाण आहे, आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे? याचा बऱ्यापैकी विचार करते आणि त्यामुळेच आपला निर्णय आपण घ्यायची क्षमतादेखील आहे त्यांच्याजवळ.
या सदरात आपण तुमच्या करिअरबद्दल, कॉलेजबद्दल आणि वेगवेगळ्या अडचणी व त्यावर कशी मात करायची याबद्दल गप्पा मारू. तोपर्यंत सुट्टी मस्त एन्जॉय करा. माहिती गोळा करत राहा, आणि हो, विचारांना कुलूप नका लावू… ते चालूच राहुद्या. कारण, विचार केल्याशिवाय कृती होत नाही!!

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22616

Posted by on May 19 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (73 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• सलमान खानच्या बिईंग ह्युमनची, अमिर खानच्या सत्यमेव जयतेची तारिफ करताना प्रसार माध्यमे थकत नाहीत. माध्यमांनी यांच्या ...

×