Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक » हॉस्टेलला राहाताय? (उत्तरार्ध)

हॉस्टेलला राहाताय? (उत्तरार्ध)

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ८

hostelमैत्री ही एखाद्याचं आयुष्य घडवू शकते किंवा एखाद्याला आयुष्यातून उठवू शकते. त्यामुळे होस्टेलवर राहताना मित्र-मैत्रिणीनबाबत खूप जागरूक असणं महत्वाचं आहे.
⦁होस्टेल फ्रेंड्स : होस्टेलचा अविभाज्य आणि मुख्य घटक म्हणजे रूममेट्स! मुले असोत वा मुली, रूममेट्सची मैत्री ही एकदम अनोखी असते. प्रत्येकवेळी मैत्री होतेच असे नाही, परंतु, रूममेट्सबरोबर जमवून घेवून राहणे ही कला नक्कीच आत्मसात करता येते. अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून होस्टेल लाईफच्या गमती जमती दाखवल्या आहेत. एकाच वेळी सगळ्यांना तयार व्हायचे असते, त्यामुळे होणारी धांदल, रुसवे-फुगवे, एकमेकाचे कपडे, चप्पल वापरणे, लटकी भांडणही होतात आणि एकमेकाशिवाय करमत देखील नाही, असं हे होस्टेल लाइफ्!! या सगळ्यांमुळे होस्टेल जीवनाला मस्त खमंग फोडणीच मिळते.
या फ्रेंडशिपमध्ये खूप सारी एन्जॉयमेंट आहेच, पण यातले धोके देखील आपण वेळीच ओळखले पाहिजेत. चुकीच्या अथवा वाईट सवयी लागायला कधी वेळ लागत नाही. म्हणूनच, होस्टेलला नवीन मैत्री करताना अतिशय सावधपणे करा. वाईट सवयींपासून दूर रहा. अपरिचित व्यक्तींवर अतिशय सावधपणे विश्वास ठेवा आणि सतत एक भान ठेवा, की आपण शिक्षणासाठी व अभ्यासासाठी इथे आलो आहोत, यामुळे आपोआप तुम्हाला वाईट सवयींपासून दूर राहण्यास मदत होईल.
⦁सांस्कृतिक बदल आणि फरक : मला एक किस्सा आठवतो. माझी एक मैत्रीण उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. तिने जातानाच इथून सर्व माहिती इंटरनेटद्वारे मिळवली होती व त्याचबरोबर आपल्यासाठी होस्टेलला रूममेट देखील मराठी मुलगीच शोधली होती. जेणेकरून जास्त ऍडजेस्टमेंट करावी लागू नये. पुढे काही कारणाने त्यांचे एकमेकीशी पटेनासे झाले. ते प्रकरण इतके वाढले, की त्या मनस्तापाने ती खूप आजारी पडली. तिचा भाऊ येथून मग तिची दुसरी सोय लावून देण्यासाठी म्हणून अमेरिकेला गेला. त्याने प्रथम तिच्यासाठी दुसऱ्या देशाची रूममेट शोधली आणि तो तिला रागावला की भारतातून अमेरिकेत शिकायला आली आहेस, तर फक्त मराठी मुला-मुलींशी मैत्री का करतेस… इथे तुला पूर्ण जगातली मुले-मुली व त्यांच्या संस्कृतीची कवाडे उघडी आहेत. थोडं सर्वामध्ये मिसळ, इतरांची संस्कृती जाणून घे. त्यामुळे तुझ्याच ज्ञानात आणि व्यक्तीमत्वात फरक पडेल.
मी स्वतः अशा एका छोट्याश्या घटनेमुळे इतकी बदलले, की मी मराठी असून मराठी भाषिक रूममेटचा आग्रह कधी धरला नाही. मला नेहमी परप्रांतीय रूममेट्स मिळाल्या आणि त्यांच्यामुळे मला इतर राज्यातील सांस्कृतिक चालीरीती समजल्या, त्यामुळे माझ्या ज्ञानामध्ये भरच पडली. माझा एक प्रांजळ सल्ला आहे, अगदीच पटत नसेल तरच रूम बदला, नाहीतर जी व्यक्ती रूममेट म्हणून मिळाली आहे, तिच्याशी जमवून घेणंसुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातं.
⦁निर्णयक्षमता : होस्टेलला राहिल्यामुळे आपले निर्णय, भले ते अगदी छोटे असूदेत, आपले आपण घ्यावे लागतात. आजकाल मोबाईल फोनमुळे सतत घरातील व्यक्तींशी संपर्कात राहता येते, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी पण बोलून त्यावर निर्णय घेता येतो.  पण, जर तशी वेळ आली तर आपल्याला स्वतंत्रपणे निर्णय घेता आले पाहिजेत. होस्टेलला अॅडमिशन घेतली की हे ज्ञान आपोआप येणार नाही, तर ते हळू हळू चुकत माकत व अनुभवाने जमते. पण, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे. मी असे पाहिले आहे, की अनेक मुलामुलींना पदवीधर झाले तरीही बँकेचे, खरेदीचे व्यवहार करता येणं तर सोडाच, त्याची किमान माहिती देखील नसते. यात कदाचित त्यांची काही चूक नसेलही, घरात त्यांच्यावर जबाबदारी पडत नसेल, पण जर होस्टेलला किंवा स्वतंत्र राहणार असाल तर मात्र या गोष्टींची माहिती करून घ्या. नसेल तर शिका. कारण ते फार आवश्यक आहे.
⦁होस्टेल लाइफ् आणि तब्येतीची काळजी : स्वतंत्र राहिले की थोडीशी खाण्यापिण्याची मनमानी होते. कधी मेस / खानावळीचे जेवण आवडत नाही म्हणून, तर कधी मनात येईल ते खाता येते म्हणून! काहीच हरकत नाही. पण, हे सगळ जरा बेताने करा. कारण, इथे आजारी पडलात तर तुमची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे. रूममेट्स बरेच वेळा एकमेकाची काळजी घेतात. औषध पाणी देखील करतात. पण, प्रत्येक वेळी असे चांगले रूममेट्स असतीलच असे नाही. त्यामुळे, आपल्या खाण्याच्या सवयी सांभाळा. आपली औषधे (अस्थमा इ. असेल तर) नेहमी जवळ बाळगा. किंवा काही इतर आजार असतील तर डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन जवळ बाळगा म्हणजे तुम्हाला काही शारीरिक त्रास झाल्यास मदत मिळणे सोपे होईल.
⦁होस्टेल लाइफ् व स्वावलंबनाचे धडे : काहींना होस्टेल याच कारणासाठी आवडत नाही, की आपलं काम आता आपणच करावे लागेल. मी यावर काहीच मत देणार नाही. पण, हे मात्र खरं की होस्टेलमुळे आपण स्वतःची कामे स्वतः करायला शिकतो. आपली खोली स्वच्छ करणे, आपले कपडे धुणे, इस्त्री करणे, कपाट आवरणे, मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे अशा अनेक गोष्टी. आजकाल, रूम मेंटेनंसच्या सोयीखाली स्वच्छता, कपडे इ. कामांसाठी मदतनीस मिळू शकतो. अर्थात त्यासाठी जास्त फी भरावी लागते. पण, बऱ्याच मुलांना याची सवय नसते, त्यांना स्वावलंबनाचे धडे गिरवण्याची संधी होस्टेल मध्येच मिळते. अनेक मुले-मुली जी स्वतंत्र खोली घेवून राहतात, ती अनेकदा आपल्या पद्धतीचा स्वैपाक देखील मिळून बनवतात. उदा. राजस्थानी प्रकारचे जेवण सर्रास सर्वत्र मिळत नाही, इथे शिकायला राहिलेली ती मुले अनेकदा आपला आपण स्वैपाक करून जेवतात. कारण त्यांना महाराष्ट्रीयन जेवणाचा कंटाळा येतो व घरच्या जेवणाची आठवण पण येत असते. ही सवय देखील चांगली आहे. कारण शिकलेली कोणतीच गोष्ट वाया जात नाही. पुढे मागे नोकरीनिमित्त घराबाहेर राहावे लागले, तर याच स्वावलंबनाचा फायदा होतो.
होस्टेलमधला काळ हा अविस्मरणीय असतो. आयुष्यात कायम आठवण राहते या दिवसांची. कारण, आपण मित्रांबरोबर मौज मजाही करतो आणि खूप काही शिकतोही. आपापले शिक्षण संपले की आपली चारी दिशांना पांगापांग होते, कधी पुन्हा भेटी-गाठी होतात, तर कधी स्मृती काळाच्या पडद्याआड जातात. खूप मस्त एन्जॉय करा तुमची कॉलेज लाइफ् आणि होस्टेल लाइफ् सुद्धा.

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=23432

Posted by on Jul 14 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (59 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• डिजिटल इंडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारताला स्वयंपुर्ण बनेल. तंत्रज्ञान विकसनाच्या क्षेत्रातही भारत नव्या कक्षा पार करु ...

×