हॉस्टेलला राहाताय?

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ७

boys-hostelअसं म्हणतात की, “ होस्टेल लाइफ् इज ए ट्रीट इन इटसेल्फ” !!
खरच आहे ते! कॉलेज लाइफ् इतकीच मस्त आणि धम्माल असते होस्टेल लाइफ्. जे जे होस्टेलला राहिले आहेत ते नक्कीच सहमत होतील माझ्याशी, हो की नाही? आणि मी तर असंही म्हणेन की ती एक शाळाच आहे अनुभवांची! मुक्त, अनुभव समृद्ध करणारी शाळाच दुसरी. जगाचा प्रत्यक्ष अनुभव देणारी शाळा.
आतापर्यंत आपण बरंच बोललो नाही का कॉलेजबद्दल आणि अभ्यासाबद्दल! कॉलेजबद्दल बोलताना होस्टेलचा विषय नाही आला तरच नवल… अन्यथा चर्चा अपूर्णच राहिली म्हणायची. खूप पूर्वीपासून जेव्हा शिक्षण इतकं सहज उपलब्ध नव्हत, तेंव्हापासून ‘वसतिगृह’ म्हणजेच ‘होस्टेल’ अस्तित्वात आहेत. यामुळे खूप दूर-दूरच्या विद्यार्थ्यांची सोय झाली. त्यांना घरापासून दूर राहून शिकता आला. घरातल्या ज्येष्ठांनी सांगितलेलं मला आठवतं, माझे मामा १९४८-५० च्या दरम्यान बनारस विश्व हिंदू विद्यालयामध्ये शिकायला होते. कुठे आमचं आजोळ धारवाड आणि कुठे बनारस.. म्हणजे त्या काळी देखील होस्टेलची सोय होती. आत्तासारखी फाइव्ह स्टार नसतील तेंव्हाची वसतिगृहं. पण अनेक होतकरू मुलांची सोय नक्कीच झाली. मी देखील ५ वर्ष होस्टेलला राहिले म्हणून सामान्य ज्ञानात आणि व्यवहार ज्ञानात इतकी भर पडली आणि ती पुढील आयुष्यात खूप कामी देखील आली.
१०-१२ चे जे विद्यार्थी आता होस्टेलला राहणार आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा लेख लिहावासा वाटला. जर तुम्ही होस्टेलला राहणार असाल, तर बिलकुल दडपण घेवू नका. हां, घरापासून, आई बाबांपासून दूर राहावं लागेल याची हुरहूर नक्कीच असेल, पण आता तुम्ही तुमच्या स्वतंत्र विश्वात पाऊल टाकणार आहात, त्यामुळे अतिशय प्रसन्न मनाने होस्टेल या पर्यायाचा स्वीकार करा. कारण, नाइलाजाने स्वीकारून कोणताच पर्याय आनंद देत नाही. मी अनेक मुले-मुली पाहिली आहेत जी अतिशय खट्टू मनाने वर्षानुवर्ष होस्टेलला रहातात. त्यांना त्यात आनंद शोधताच येत नाही. नेहमी घरची आठवण काढून होमसिक होतात. तर काही मुलं चक्क स्वच्छंदीपणे बागडून घेतात. आपल्याला मिळालेल्या या मुक्त स्वातंत्र्याच्या भेटीचा मोकळ्या मनाने स्वीकार करा आणि पहा, तुमच्यामध्ये इतका छान बदल घडून येईल, की तुम्हीच म्हणाल एक दिवस की, होस्टेलला राहिलो म्हणून शिकलो हे सारे.
⦁पूर्वतयारी : होस्टेलला राहायला जायची पूर्वतयारी काय? होस्टेलला अॅडमिशन घेताना माहिती करून घ्या की तुम्हाला तिथे काय काय सोयी सुविधा उपलब्ध असतील. उदा. कॉट, गादी, नित्योपयोगाच्या वस्तू इ. त्याचप्रमाणे, आपले सामान तयार ठेवा. आजकाल इतकी सुसज्ज होस्टेल असतात, की तिथे ए.सी. सारख्या सुविधाही मिळू शकतात (ते त्या होस्टेलच्या फी नुसार अवलंबून आहे) कपडे, पुस्तकं व इतर सामान ठेवण्यासाठी कपाट देखील मिळणार आहे का याची चौकशी करून घ्या. कुलुपाच्या कपाटाची सोय नसेल तर आपले मौल्यवान चीजवस्तू नीट जपून ठेवण्यासाठी कुलूप असलेल्या बॅगची सोय असुद्या. होस्टेलच्या निम्म्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी या चीजवस्तू हरवल्याबद्दल असतात.
⦁होस्टेल फी / पेईंग गेस्ट फी : होस्टेल अथवा, पेईंग गेस्टची सुविधाही आजकाल उपलब्ध आहे. आई-वडिलांबरोबर हे सुनिश्चित करा की तुम्ही फी कशी भरणार आहात. फीच्या पावत्या जपून ठेवा. काही अडचण आल्यास त्या पावतीची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे ही पावती त्याची एखादी झेरॉक्स काढून जपून ठेवावी. जर तुम्ही होस्टेलला न राहता, एखादी सदनिका (flat) भाड्याने घेवून राहणार असाल, तर त्याची भाडेकरार पावती नक्की करा आणि ती कागदपत्रं जपून ठेवा. मला चांगलं आठवत आहे की, असा कोणताही करार न करता राहिलेल्या एका विद्यार्थ्याला घरमालकांनी अचानक रात्री घराबाहेर काढले होते व त्याचे पूर्ण भरलेले पैसे देखील परत द्यायला नकार दिला. मी त्याला कायदा हा विषय शिकवत असल्याने त्याने लगेच मला मदतीसाठी फोन केला. परंतु, प्रथमतः असा कोणताही करार न करता राहणे हेच मदत करण्यामध्ये अडथळा ठरले. म्हणून हा मुद्दा आवर्जून सांगावासा वाटला.
⦁आर्थिक नियोजन : होस्टेलला रहाणे म्हणजे आपला खर्च आपण स्वतःच सांभाळणे. पालक ठराविक रक्कम तुम्हाला देतील, त्यामध्ये आपला महिन्याभराचा खर्च कसा भागवायचा, याचे पहिले शिक्षण होस्टेलमध्ये राहताना मिळते. कारण आजवर आपल्याला पालकांकडून मिळालेला पॉकेटमनी खर्च करणे आणि आपले आपण पूर्ण महिन्याच्या खर्चाचे नियोजन करणे यात खूप फरक आहे. कोणते खर्च महत्वाचे, कोणते कमी महत्वाचे, कोणते खर्च अचानक उद्भवतात व त्याचे नियोजन कसे करायचे, हे आपले आपणच ठरवायचे असते. यामध्ये सुरुवातीला पालक नक्कीच मार्गदर्शन करतात. हिशेब विचारतात. त्याचे वाईट वाटून घेऊ नये, उलट यामुळे आपल्याला आर्थिक नियोजनाची शिकवणी मिळतेय असा विचार करा.  यात अनेक गमतीजमती सुद्धा होतात. बरेचदा, महिना संपत आला की पैसे संपत आलेले असतात, कधी वायफळ खर्च झालेला असतो, त्यामुळे आर्थिक तंगी येते, त्यात सुद्धा कसं भागवायचं हे आपल्याला होस्टेल लाईफच शिकवतं. मला आठवतं, की आम्ही मुली शेवटच्या रविवारचा नाश्ता हा रद्दी विकून त्या पैशाने करायचो. एकदा कधीतरी तसे करावे लागले म्हणून केले, पण नंतर ती प्रथाच झाली. मजा होती पण त्यातदेखील. (पूर्वार्ध)

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=23298

Posted by on Jul 7 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (61 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• बिहारमध्ये केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिश कुमारांचे जनता परिवाराजवळ जाणे, कॉंग्रेस, कम्युनिस्टाशी युती करण्याचा प्रयत्न ...

×