Home » विविधा » किचन कट्टा

किचन कट्टा

kithchanगृहिणी असो वा नोकरदार स्त्री तिचा बराच वेळ किचनमध्ये जातो. किचनमध्ये काम करायचं म्हणजे किचन स्लॅब अर्थातच किचन ओट्याजवळ उभं राहूनचकरावं लागतं.किचनमध्ये ओटा अतिशय महत्त्वाचा असतो. पूर्वी स्वयंपाकघरात ‘चौका’ असायचा. म्हणजे स्वयंपाकघरात एक चौकोनी भाग उंच बांधलेला असायचा.त्यावर गॅस अथवा चूल ठेवून,शेजारी खालीच बसून गृहिणी स्वयंपाक करायची. आता मात्र सर्वच घरात किचन ओटा अत्यावश्यकच बनला आहे. घर बनवताना इतर सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. मात्र, बर्‍याचदा ओटा हा दुर्लक्षित राहतो. मात्र, पुढे चुकीच्या बांधणीमुळे त्रास होऊ लागतो. म्हणूनच किचन-ओटा बनवताना काही गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवलं पाहिजे.
किचनमध्ये स्वयंपाक बनवताना पायाखाली पाट अथवा स्टूल घ्यावा. तुमची उंची अधिक आहे आणि ओट्याची उंची कमी आहे, तो भाग तुमच्या कंबरेच्या खाली येत असेल तर स्वयंपाक करताना बराच ताण सहन करावा लागतो. बर्‍याच महिलांना अशा त्रासाचा सामना नित्याने करावा लागतो. ओटा पुन्हा तोडून नवा तयार करण्यापेक्षा आहे तेच चालू द्या, असा कल बर्‍याच महिलांचा असतो. मात्र, असं न करता वेळीच ओटा आपल्या उंचीप्रमाणे बनवून घ्यावा. काही वर्षांपूर्वी ओटा ३८ इंचांचा असायचा. मात्र, आता सर्वसाधारपणे ३३ इंचांचा असतो. अलीकडे स्लॅब न तोडताही त्याची उंची कमी जास्त करता येते.
ओटा बनवताना सर्वात प्रथम पोळ्या करताना योग्य प्रकारे उभं राहता येतं का, हे पाहावं. आपल्या उंचीनुसार ओट्याची उंची ठरवावी. ओट्याची जागा अशी असावी, जिथून इतर वस्तू सहजपणे हाताशी येतील, अर्थात जवळ पडतील. ओट्यावर जिथे गॅस ठेवणार आहात त्याच्या आजूबाजूला कोणतीही विजेची जोडणी नसावी. ओव्हन, मिक्सरची जागा थोडी लांबच ठेवावी.ओट्यावर ठेवण्यात येणारा दगड शक्यतो काळाच असावा. म्हणजे डाग पडले तरी दिसत नाहीत.अलीकडे यात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मार्बल ग्रॅनाईटमध्ये विविध रंग उपलब्ध आहेत. त्यातही गडद शेड निवडावे. ग्रीन, ग्रे हे रंगही पर्याय म्हणून वापरता येतील. तुम्ही उजव्या अथवा डाव्या कोणत्या हाताने काम करता याचाही विचार ओट्याची आणि इतर सामानाची रचना करताना करावा. जेणेकरून वस्तू हाताळणं सोपं जाईल.
सध्या ‘ई-साइज’ किचनचा ट्रेंड बदलून ‘आयलँड साइज’चा ट्रेंड आला आहे. ‘ई-साइजमध्ये’ किचनच्या एकाच भागात सर्व काम करायचं आणि त्यानुसार रचना करायची. त्यामुळे किचनचा दुसरा भाग रिकामाच राहत असे. ती जागा वापरात येत नसे. ‘आयलँड’मध्ये किचनच्या प्रत्येक जागेचा मोठ्या कल्पकतेनं वापर केला जातो.सर्व भागात सामानाचं नियोजन करता येतं.
ओटा बनवल्यानंतर गॅसच्या वरच्या बाजूने शक्यतो कॅबिनेट्‌स बनवू नये.एक तर ओट्याच्या रुंदीमुळे तिथून वस्तू काढणं अवघड जातं. त्याचबरोबर फोडणीच्या धुरामुळे कॅबिनेट्‌स सतत खराब होत राहतात. त्यापेक्षा ओट्याची रुंदी सोडून उजव्या आणि डाव्या बाजूने वॉल कॅबिनेट करणं उत्तम पर्याय आहे. वास्तुशास्त्रानुसार ओट्याची दिशा शक्यतो पूर्व किंवा दक्षिण पूर्व असावी.गॅस तरी किमान दक्षिण पूर्व दिशेने ठेवावा आणि सिंक अथवा वॉश बेसिन उत्तर पूर्व भागात असावं. अर्थात या टिप्स ज्यांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे,अशांसाठी आहेत. इतरांनी मात्र आपल्या सोयीनुसार रचना बनवावी.
हल्ली ‘एल’ आकाराचा ओटा बनवता येतो. मुख्य ओटा पूर्व अथवा दक्षिण पूर्व दिशेने असला पाहिजे.म्हणजे दक्षिण भिंतीला ओट्याचा दुसरा भाग असावा.त्यावर मायक्रो-ओव्हन,मिक्सर इत्यादी वस्तू ठेवाव्यात. ओट्याच्या वर छतापर्यंत टाईल्स लावून घ्याव्यात म्हणजे साफ करण सोयीचं जातं. हल्ली ‘सी-शेप’ ओट्याचीही चलती आहे. त्यासाठी अर्ध्या अंतरावर लाकडी अथवा फायबरचा प्लॅटफॉर्म बनवला जातो. तो फिट करण्यासाठी स्टीलचे बीम, रॉड, वापरतात. या प्लॅटफॉर्मचा वापर चहा, नाश्ता करण्यासाठी केला जातो. प्लॅटफॉर्मच्या वरच्या बाजूने स्टोअरेजही केलं जातं.यामुळे किचनला आधुनिक टच येतो. प्लॅटफॉर्मजवळ बसण्यासाठी, फिरते स्टूल, फोल्डिंग चेअरचा वापर करता येतो. किचन-ओट्याचे बरेचसे पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मॉड्युलर किचन बनवलं तर ओट्याची जागाही तुम्ही पाहिजे तशी बदलू शकता. थोडक्यात काय, तर कोणताही ओटा बनवायचा असला तरी गृहिणीची सोय सर्वात महत्त्वाची असते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=1481

Posted by on Feb 5 2013. Filed under विविधा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विविधा (6 of 7 articles)


दोन महिन्यांपासून ट्रिपला कुठं जायचं याचा घोळ चालू होता. कुणी काश्मीर म्हणायचं तर कुणी केरळ! थोडे वादविवाद झाले.शेवटकोकणातील आंबोलीला जायचं ...

×