Home » विविधा » कोकणायन

कोकणायन

kokanदोन महिन्यांपासून ट्रिपला कुठं जायचं याचा घोळ चालू होता. कुणी काश्मीर म्हणायचं तर कुणी केरळ! थोडे वादविवाद झाले.शेवटकोकणातील आंबोलीला जायचं ठरलं. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे जायच्या तयारीला लागले. दोन वर्षांपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतचे सारे सामील झाले. सगळ्यांनी नागपूर स्टेशनवर भेटायचं ठरलं. वेळ होताच गाडी मुंबईकडे धाऊ लागली. रात्रीचे नऊ वाजले. जेवणाची वेळ झाली. प्रत्येकानं आपापले डबे उघडले. गाडी सारखी धावतच होती. शेवटी धाऊन किती धावणार? तिचेही सांधे दुखणारच! मध्येच रुळाचं काम सुरू होतं ते यानंच. गाडी मध्ये मध्ये थांबून विश्रांती घेत होती. अखेर ठाणे आलं. सगळे जण पांगले. कुणी बहिणीकडे, तर कुणी कुठे असे गेले. आम्ही मात्र ठाण्यालाच ठाण मांडलं. तेवढ्यात फोन खणखणला. आम्ही सगळे दहिसर, बोरिवलीवाले ठाण्याला सकाळी आठला पोहोचतोय् तयार रहा असं बजावण्यात आलं.वरसोवावाले कुठे सामील होणार ही विचारणा करण्यात आली. दुसर्‍या दिवशी सकाळचे आठ वाजून गेले, तरी बोरीवलीवाल्यांचा पत्ता नाही. पुुढं दहा वाजून गेल्यावर मात्र ठाणेकर कंटाळले. त्यांच्या कपाळावर आठ्या दिसायला लागल्या. वरसोवावाले पनवेलला पोहोचून बाकीच्यांची वाट बघत ताटकळत होते. एकदाचे येणारे ते आले. आजूबाजूला जणू काय ईश्‍वरानं हिरवेकंच मखमली गालिचे पसरलेले, त्यातून कुंकवाच्या रंगाच्या नागमोडी पायवाटा डोंगरमाथ्यावर चढत गेलेल्या. मध्ये मध्ये लहान-मोठे निर्झर खळाळत असलेले.
मध्येच कुणीतरी म्हणालं, ‘‘ए मराठी सिनेमाची कॅसेट लाव ना! मग सगळ्यांचे डोळे टीव्हीकडे लागले, पण त्यात चित्र न दिसता फक्त गाणंच ऐकायला लागलं. मग मध्येच एकीचा आवाज आला, ‘हम है बंबईवाले,’ सगळे हसले. नंतर कसाबसा सिनेमा चालू झाला. मग मात्र एकदम शांतता पसरली.’’
रात्रीचे दहा वाजून गेले आणि पोटात कावळे कोकलत होते. मग बस एका हॉटेलशी थांबली. जेवण करून प्रत्येकच जण आपापल्यापरीनं पेंगू लागला. बाहेर निसर्गही झोपलेला. त्यालाही बहुधा अंगाईनं झोप लागली असावी. अखेर आंबोली आली. खाली उतरताच सगळ्यांच्या तोंडून उद्गार निघाले, ‘‘आ हा हा! काय थंडगार हवा! जणू निसर्गानं सभोवताल सर्वत्र ए.सी. लावलेला! झोपायला धुक्याच्या गाद्या पसरलेल्या! थकले भागले सगळे जमिनीला पाठ लागताच झोपले,सकाळी लवकर उठण्याच्या चिंतेसह!’’
सकाळी सहालाच आधी उठलेल्यांचे आवाज यायला लागले. आपापलं सामान घेऊन उगवत्या नारायणाच्या साक्षीनं हॉलमध्ये जमले. चहा, कॉफी आटोपून सगळे बसमध्ये स्थिरावले.बस हिरण्यकेशी मंदिराकडे धावू लागली. देऊळ डोंगरातल्या एका भुयारात आहे. शंकराच्या मूर्तीच्या आजूबाजूला त्याचा पुत्र गणपती, नंतर लक्ष्मी, सरस्वती वगैरे मूर्ती आहेत. कुणीतरी हिरण्यकेशी नदीचा उगम विचारला तेव्हा महाराजानं भुयाराकडे सरकून तो दाखवला.तिथं पाण्याची छोटी धार वाहताना दिसत होती. पुढे सगळेजण सनसेट पॉईंट व सूर्यास्त बघायला निघाले. सगळ्या दर्‍या-खोर्‍या पाहून झालेल्या. शेवटी बायकांचा मोर्चा सूर्यास्ताकडे वळला. सूर्य हळूहळू खाली जात होता.तोही दिवसभर पृथ्वीची सेवा करून श्रमांनी लालबुंद झालेला. बायकांचा मोर्चा आपल्याकडे येत असलेला पाहून अखेर त्या नारायणानं डोंगराआड पलायन केलं. संध्याकाळ होऊन अंधार वाढू लागला. रस्त्यांवरचे दिवे लागले तसा सगळा मोर्चा माघारी फिरला. उलट्या प्रवासानं बस पुन्हा मुक्कामी परतली. रात्रीचे अकरा वाजलेले. त्यानंतर जेवणावळ आटोपली. तेवढ्यात घोषणा झाली की, उद्या गोव्याला जायचं आहे. ‘गोवा’शब्द ऐकताच सगळ्यांचे कान टवकारले. बायकांना काजूचं आकर्षण, तर पुरुषांना काजू-फेणीचं!
सगळेजण सकाळी सात वाजताच चहा-कॉफी घेऊन तयार झालेले. प्रवास सुरू झाला. प्रवासात मध्येमध्ये आंबे, फणस आणि रानंब्याची झाडं लागत होती. सारी झुल्यावर बसल्यागत वार्‍यानं झुलत होती. मध्येच एका जागी थोडावेळ बस थांबवली गेली. बायकांना मोह आवरला नाही. गोवा जसजसा जवळ येऊ लागला तसा पोरांचा गलका वाढू लागला. सारे किती छान! किती छान! म्हणू लागले.
गोव्यात शिरताच आरशासारखे चकाचक रस्ते, नीटस् चौक, मार्गावरचे पुतळे बघताच ‘गोवा आला, गोवा आला’ ही पोरांची ओरड सुरू झाली. बस प्रथम सेंट फ्रान्सिस चर्चसमोर थांबली. पहिल्या भागातच फादरची बॉडी ठेवलेली होती. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. थोडीफार खरेदी झाल्यावर आपला प्रवास सुरू झाला. बस मंगेशीच्या देवळाकडे धावू लागली.देऊळ येताच प्रत्येकीनं आपापल्या श्रद्धेप्रमाणे पूजा केली. चलायची पुकार होताच सगळे बसमध्ये बसले. बस बीचकडे निघाली. फेसाळलेल्या लाटांवर जणू जलदेवता आल्याचा आभास देणारा! वर आकाशात कापूस पिंजून ठेवल्यागत ढग, खाली चाळून ठेवल्यागत वाळू, बारीक आणि स्वच्छ. अंधाराची चाहूल लागू लागली होती. सूर्याचा कधी ढगाआड तर कधी बाहेर असा लपंडाव सुरू होता. वारं जोरात सुटलं होतं. पक्षी आपल्या घरट्यांकडे झेपावत होते.सारं बघून मला कविताओळी आठवल्या-
‘वृक्ष डोलतो, फुले हसती
विहंग तरूवर नाचती…’
हळूहळू सगळा बीच रिकामा झाला आणि आमची बस आंबोळीकडे परतू लागली. हॉटेलवर पोचायला रात्रीचे बारा वाजले. सगळे फार थकलेले, दोन घास पोटात ढकलून आपापल्या जागी जाऊन निवांत झोपले. सकाळी सिंधुदुर्गला जायचं होतं.
नित्याप्रमाणे सगळी तयारी करून सगळे तळमजल्यावर उतरले. सकाळच्या साताला ब्रेकफास्ट झालेला.अखेर सगळे बसमध्ये चढले आणि सिंधुदुर्गचा प्रवास सुरू झाला. गाडी किल्ल्याच्या दिशेनं धावू लागली. तोवर सूर्य तळपत माथ्यावर आला होता. जिकडे-तिकडे गर्द निळं पाणी. लॉंचमधले कुणी बाजूच्या पाण्यात हात घालून ते इतरांच्या अंगावर उडवत होते. पाण्याच्या लाटा परस्परांवर आदळत असल्यानं पाण्यावर केसाचे तरंग येत होते.
लॉंच किल्ल्याशी येऊन थडकली. आम्ही सगळे उतरलो. बरोबर गाईड घेतला होता. तो पाच मिनिटागणिक थांबून शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत होता. ‘हे शिवाजीचं मंदिर, त्याचा धाकटा मुलगा राजाराम यानं बांधलेलं. ही बावडी सहाशे वर्षांपूर्वी बांधलेली. येथूनच भुयाराला सुरुवात झाली. ती थेट जाते ते मुरूड-जंजिरापर्यंत. हा किल्ला अजिंक्य आहे. आजूबाजूला प्रवाळाची वनस्पती आहे. येथून सगळ्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा परिसर दिसतो. सर्व मंडळी किल्ल्यावर चढली. मी पण चढले. सगळ्यांच्या मनात पाल चुकचुकली, ही हार्टपेशंट उद्या हिला काही झालं तर आम्हा सगळ्यांवर शेकणार!मी मात्र देवाचं नाव घेऊन किल्ला सर केला. दुपारी चार वाजता आम्हाला माघारी नेणारी लॉंच होती. ती लगेच सुटणार असल्यानं आम्ही लगबगीनं खाली उतरलो व लॉंचकडे पळालो आणि पटापट आत जागा धरल्या. सुरू होऊन केवळ वीस मिनिटातच ती धक्क्याला लागली. काळोख पडायला लागला होता. अंधारापूर्वी तारकळी बीचवर पोहोचायचं होतं. तारकळीला बराच लांबलचक म्हणजे बावीस किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला.एवढी लांब निसर्गरम्य खाडी! स्वच्छ आणि अथांग काचेसारखं निर्मळ पाणी. जवळच कर्ली नदीचं मुख. ती समुद्राला मिळते तिथंच हे तारकली गाव वसलेलं. संगमापुढे समुद्रात रंगीबेरंगी मासे तसेच डॉल्फिन आढळतात म्हणे! या भागाला मिनी गोवा म्हटलं जातं. गोवा सरकार आता पर्यटकांसाठी काचेचा तळ असलेल्या बोटी बनवणार असल्याचं ऐकलं. सिंधूदुर्ग जिल्ह्यात बघण्यासारखी खूपशी ठिकाणं आहेत. आंबोळी, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आदी. आम्ही परतेस्तोवर काळोख पडायला आलेला. हॉटेलला पोहोचेस्तोवर रात्रीचे अकरा झालेले. बस ‘जानकी’ नावाच्या हॉटेलसमोर थांबली. सकाळपासून खाण्यापिण्याचं काही सोबत नसल्याने सगळे खाण्यात गुंतले. कलकलाटात कुणाचं कुणाला कळेना. मात्र, सगळे जेवणानं तृप्त झाले आणि ढेकर देत बसमध्ये चढले. बस बिचारी सगळ्यांची वाट बघत होती. पॅसेंजर आले पण तिला मालक दिसेना. अखेर ड्रायव्हर आला आणि ती मुक्कामाकडे धाऊ लागली. धावून धावून किती धावणार.तिलाही भूक लागलेली म्हणून ती पेट्रोलपंपावर थांबली. आम्ही मुक्कामी पोहोचलो आणि प्रत्येक जण रात्रीच्या कुशीत विसावला.
आजचा दिवस विश्रांतीसाठी राखलेला. तरी सकाळी थोडा फेरफटका झालाच. नंतर मात्र विश्रांती. दुपारी चारला पुकार झाली ‘फार्मला जायला तयार व्हा’ सगळे गडबडीनं उठून तयार होऊन बसमध्ये बसले. प्रवास सुरू झाला. रस्त्यानं आमराई दिसताच बस थांबवली गेली. तिथल्या एका झाडावरच्या शेंड्यावरून कोकिळा सूर लावत होती. बहुधा तिचं लॉजिंग, बोर्डिंग त्याच जागी असणार. तिच्या स्वरातून खात्रीनं ‘कुहू कुहू बोले रे कोयलिया’ उमटलं असणार! म्हणूनच त्यावर आमच्यातून ‘वाहवा! क्या बात है!’ ही दाद आली. माणसाची चाहूल लागताच कोकिळा उडून पसार झाली. पाऊस येण्याचा रंग दिसत होता. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य उमटलेलं. आभाळ तांबडंलाल होऊन संधीप्रकाश पसलेला. छोट्या छोट्या पावसाळी ढगांचे पुंजके बालकाप्रमाणे दुडदुड धावल्यागत खेळत होते. दुसर्‍या दिवशी मुंबईला परतायचं म्हणून आम्ही विसावलो.
नित्याप्रमाणे सकाळीच तयार होऊन बसमध्ये बसलो. रत्नागिरीच्या मार्गावर बस थांबवण्यात आली. आंब्याचं मोठं मार्केट होतं. भाव स्वस्त असल्यानं कुणी दोन, तर कुणी चार डझन अशी खरेदी केली. मात्र खात्रीनं आंब्यात मिसळ होती. चांगला भाव मिळाल्यानं आंबेवाला खूष आणि स्वस्त मिळाले म्हणून आम्हीही खूष! बस मुंबईकडे निघाली. मुंबईला पोहोचेस्तोवर रात्रीचे बारा झालेले.
नागपूरकरांना मेजवानी द्यायचं ठरलं. मुख्य पदार्थ आंब्याचा रस! रस काढताना लक्षात आलं की, डझनामागं २-३ आंबे सडके आहेत. मग एकमेकींना फोन सुरू झाले. सगळ्यांकडे तेच होतं. मेल्या आंबेवाल्यानं सगळ्यांना हातोहात फसवलेलं. म्हणजे पैसे पाण्यात गेले. अखेर मेजवानी पार पडली. नागपूरकरांची परतीची गाडी रात्री अकराला होती. सगळ्यांनी स्टेशनवर भेटायचं ठरलं. मुंबईकरांनी नागपूरकरांना ‘हॅपी जर्नी’ म्हणून निरोप दिला, तर नागपूरकरांनी म्हटलं-
‘आम्ही जातो अमुच्या गावा
अमुचा रामराम घ्यावा…’
इंदुमती मनोहर सप्रे

Short URL: https://vrittabharati.in/?p=1478

Posted by on Feb 5 2013. Filed under विविधा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google