Home » दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी, संवाद » बनारसहून दिल्ली नजरेच्या टप्प्यात!

बनारसहून दिल्ली नजरेच्या टप्प्यात!

दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी

नवी दिल्लीचा रस्ता बनारसवरून जातो! भाजपाने बनारसहून नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून राजकीय वर्तुळात हे नवे विधान केले जात आहे. आतापर्यंत नवी दिल्लीचा रस्ता लखनौहून जातो असे मानले जात होते. लखनौ जिंकणारा नवी दिल्ली जिंकतो असा एक इतिहास राहिलेला आहे. दोन वर्षांपूर्वी लखनौ जिंकणार्‍या मुलायमसिंगांसाठी दिल्ली नजरेच्या टप्प्यात असावयास हवी होती. मात्र, तसे होणार नाही. कारण, नवी दिल्लीला जाणार्‍या मार्गात अचानक बदल झाला असून बनारसहून दिल्ली अधिक जवळ असल्याचे दिसत आहे.
अनावश्यक वाद
उत्तरप्रदेशच्या बनारसमधून नरेंद्र मोदी यांची उमेदवारी घोषित झाल्याने राज्याची राजकीय हवा बदलून गेली आहे. पूर्व उत्तरप्रदेश व बिहारचा काही भाग यातील ३० जागांचे राजकारण बनारसहून चालते, असे म्हटले जाते. हाच उद्देश समोर ठेवून भाजपाने मोदींना बनारसहून मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे सुपरिणाम पक्षाला मिळतील असे दिसते. या महत्त्वाच्या राज्यातील उमेदवारांची निवड हा एक महत्त्वाचा घटक सांगितला जात होता. त्या निकषावरही भाजपाने घोषित केलेली यादी बर्‍यापैकी गुणवत्तेच्या आधारावर असल्याचे मानले जात आहे. मात्र, उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत एक त्रुटी स्पष्टपणे दिसून आली. ती त्रुटी आहे समन्वयाची. यामुळे प्रथम बनारसबाबत वाद झाला. नंतर लखनौवर वाद झाला. अमृतसरवर वाद झाला; आणि शेवटी गांधीनगर की भोपाळ हा वाद झाला. वास्तविक मोदी बनारसहून लढणार हे काही दिवसांपूर्वीच ठरले होते. अरुण जेटली अमृतसरहून लढणार हेही पूर्वीपासूनच ठरले होते. राजनाथसिंग गाझियाबादऐवजी लखनौतून लढणार हे जगजाहीर झाले होते, अडवाणी गांधीनगरहून लढणार हेही पक्षात सर्वांना माहीत होते. या नेत्यांच्या मतदारसंघात आश्‍चर्य वाटावे, अचानक बदल व्हावा असे काहीच झाले नव्हते. मग, तरीही याबाबत वाद का झाला? याची अप्रिय व अनावश्यक चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झाली. ती पक्षाच्या हिताची झाली नाही.
उत्तरप्रदेशात भाजपाच्या यादीवर मोदींच्या कार्यशैलीचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. कारण, बहुतेक मतदारसंघातील तिकीटवाटप मेरिटवर करण्यात आले. या तिकीटवाटपानंतर उत्तरप्रदेशात भाजपाला चांगले यश मिळेल असे मानले जाते. चांगले यश म्हणजे किती जागा हा प्रश्‍न मात्र स्वाभाविकच अनुत्तरित आहे.
मैनपुरी-आझमगढ
उत्तरप्रदेशात मोदींच्या आव्हानाने हादरलेल्या मुलायमसिंगांनी मैनपुरी व आझमगढ या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मैनपुरी यादव वर्चस्वाचा त्यांचा परंपरागत मतदारसंघ आहे, तर आझमगढला मुस्लिम प्रभावाचा मतदारसंघ मानले जाते. मुजफ्फरनगरच्या दंगलीपासून मुस्लिम समाज मुलायम व सपापासून दुरावला आहे. या निवडणुकीत सपाला धडा शिकविण्याच्या मनस्थितीत मुस्लिम असल्याचे सांगितले जाते. याची कल्पना असल्याने मुलायमसिंगांनी आझमगढमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आझमगढला अतिरेक्यांचा अड्डाही मानले जाते. राज्यात यादव-मुस्लिम हे समीकरण आपल्याला सोयीचे ठरेल, असे मुलायमसिंगांना वाटत असले, तरी मुस्लिम त्यांना सोडून जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
मुस्लिम-ब्राह्मण
उत्तरप्रदेशात भाजपाजवळ ब्राह्मण चेहरा नाही हे हेरून बसपा नेत्या मायावतींनी आपल्या ८० उमेदवारांच्या यादीत ब्राह्मण व मुस्लिम यांना भरपूर प्रतिनिधित्व दिले आहे. कॉंग्रेस व भाजपा यांच्याजवळ ब्राह्मण नेतृत्व नाही. अशा स्थितीत ब्राह्मण- दलित- मुस्लिम अशी युती तयार झाल्यास आपल्याला ३० जागा हमखास मिळतील, असा मायावतींचा हिशेब आहे. नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी त्यांनी आपले विश्‍वासू सहकारी सतीशचंद्र मिश्रा यांना बनारसहून उभे केले आहे.
मोदी कार्ड
सपा-बसपा यांना उत्तर देण्यासाठी भाजपाने राज्यात मोदी कार्ड खेळण्याचे ठरविले आहे. मोदी यांना बनारसमधून उभे करण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे या शहराला ब्राह्मण नेतृत्वाचे केंद्र मानले जाते. कॉंग्रेस नेते कमलापती त्रिपाठींपासून भाजपाचे श्रीश्‍चंद्र दीक्षित ते मुरली मनोहर जोशी यांच्यापर्यंत या शहराने ब्राह्मण नेत्यांना साथ दिली आहे. मोदी ओबीसी असले तरी त्यांना येथून उभे करून भाजपाने राज्यातील प्रभावी अशा ब्राह्मण वर्गास आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींचा झंझावात चालल्यास राज्यात भाजपा ५० चा आकडा गाठू शकतो. राज्यातून येणारी माहिती तसा संकेत देत आहे. मुलायम-कॉंग्रेस नाहीच. मायावती-मोदी चालतील. लखनौसाठी मायावती आणि दिल्लीसाठी मोदी असा मतदारांचा कल असल्याचे गैरभाजपा गटातून सांगितले जात आहे. ‘नीचे बसपा, उपर भाजपा’ या भाषेत मतदार आपला मानस व्यक्त करीत आहेत; आणि ही मानसिकता बनारसहून मोदींची उमेदवारी घोषित होण्यापूर्वीची आहे. मोदींच्या उमेदवारीने ही मानसिकता अधिक बळकट होण्याची शक्यता आहे.
आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या विरोधात बनारसहून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी ते मोदींना कोणतेही आव्हान देण्याच्या स्थितीत नाहीत. सपा, बसपा, कॉंग्रेस आपल्याला पाठिंबा देतील व दिल्लीत आपण शीला दीक्षित यांना पराभूत करण्याचा जो चमत्कार केला तो बनारसमध्ये मोदींना पराभूत करून करू, असे केजरीवाल यांना वाटत होते. त्यांना पहिला धक्का दिला तो सपाने. बनारससाठी प्रथम सपा व नंतर बसपा यांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. कॉंग्रेसही आपला उमेदवार घोषित करणार आहे. म्हणजे किमान पंचरंगी होणार्‍या येथील लढतीत केजरीवाल यांना जमानत वाचविणे जड जाण्याची शक्यता आहे.
दुसरा मतदारसंघ
भाजपाने बडोदा मतदारसंघातूनही मोदींची उमेदवारी घोषित केली आहे. याची दोन कारणे सांगितली जात आहेत. एक तर काही कारणाने बनारसची निवडणूक स्थगित झाल्यास एक पर्याय म्हणून दुसरा मतदारसंघ शोधला जात होता. तो दुसरा मतदारसंघ गुजरातमधील असणे आवश्यक होते. मोदींनी गुजरातमधून निवडणुक न लढविल्यास त्यांनी गुजरातला एकदमच डावलले असा संदेश गेला असता. जो पक्षासाठी चुकीचा ठरला असता. मोदी गुजरातमधूनही लढतील व अहमदाबाद पूर्व वा बडोदा यापैकी एकाची निवड केली जाईल, हे स्पष्ट झाले होते. या दोनपैकी बडोदा मतदारसंघ भाजपासाठी अधिक अनकूल राहिला आहे. मोदींना आपल्या मतदारसंघात फारच कमी वेळ देता येणार असल्याने त्यांच्यासाठी अधिक भक्कम अशा मतदारसंघाची निवड करण्यात आली.
नजरेच्या टप्प्यात?
उत्तरप्रदेशात भाजपा, सपा, बसपा, कॉंग्रेस अशी प्रामुख्याने चौरंगी लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. या लढतीत मुस्लिम मतदार एकगठ्ठा कोणत्याही एका पक्षाकडे जाण्याची शक्यता नाही. मोदींच्या भाषणांचा मुस्लिम समाजावर अनुकूल परिणाम होत आहे. राजधानीतील काही मशिदींचे इमाम प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना ही बाब खाजगीत मान्य करीत आहेत. मोदी पंतप्रधान होत आहेत, मग आम्ही त्यांच्याशी गुजरातचे भांडण पुन्हा उकरून काढण्याचे कारण नाही. त्यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान करण्याची आम्हाला गरज वाटत नाही, अशी भाषा हे इमाम बोलत आहेत. उत्तरप्रदेशातील मुस्लिम किती भागात विभागले जातील, हा एक प्रश्‍न आहे. सपा, बसपा वा कॉंग्रेस कोणत्याही एका पक्षासोबत ते जाणार नाहीत. २००९ मध्ये राज्यातील मुस्लिमांनी कॉंग्रेसला साथ दिली होती. त्याच शिदोरीवर कॉंग्रेसने राज्यात २१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी कॉंग्रेसला १० चा आकडा गाठता येणार नाही, असे मानले जाते. मुस्लिम कॉंग्रेसकडे न जाता सपा-बसपात विभागला जाईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे मोदींचे कार्ड जात- पात सोडून चालण्याचे संकेत आहेत आणि तसे झाल्यास बनारसहून दिल्ली नजरेच्या टप्प्यात आल्यासारखी दिसेल.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12284

Posted by on Mar 24 2014. Filed under दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी, संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी, संवाद (97 of 112 articles)


प्रहार : दिलीप धारूरकर आता लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी, हाच एकमेव पर्याय आहे, असे दिसत आहे. ...

×