Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » देहबोली हवी सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण!

देहबोली हवी सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर• 

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ७
MRINAL PERSONALITY ARTICLE7“मोठ्या माणसांसमोर असं पाय वर करुन बसू नये रे/ नये गं”,
“महाशय, आपण वर्गात बसला आहात, बागेत नाही”,
अमुक तमुकला ना कुठे कसं उठावं बसावं याचा काही पोच नाही मुळी”,
“हिच्याकडे पाहून वाटलं नाही ही इतकी घाबरट असेलसं”,
हे किंवा असं काही आतापर्यंत अनेकदा आपल्या कानावर पडलेलं असेल. यात मूलतः आपल्या देहबोलीबद्दलची लोकांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. आपल्या हालचालीं, उठणे-बसणे यावरुन देखील आपल्याबद्दलचे मत अथवा इंप्रेशन तयार / दृढ होत असते आणि म्हणूनच देहबोली सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण असायला हवी!
आपले पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी अमेरिकेच्या राजकीय दौऱ्यावर गेलेले असताना, त्यांच्या व अमेरिकेचे अध्यक्ष श्री. बराक ओबामा यांच्या भेटीची अनेक क्षणचित्रे गाजली व चर्चिली देखील गेली. त्यापैकी सर्वात अधिक चर्चा झालेले क्षणचित्र म्हणजे ज्यामध्ये संभाषणादरम्यान बराक ओबामा यांनी नरेंद्र मोदीजींच्या दंडाला स्पर्श केला होता. अमेरिकेसारख्या एका महासत्तेच्या सर्वोच्च राजकीय नेत्याशी संभाषणातील नरेंद्र मोदींची सकारात्मक आणि आव्हानात्मक देहबोली भारताची अमेरिकेसोबत बरोबरी करण्याची ताकद व मोदींचा प्रचंड आत्मविश्वास दाखवून गेली व त्याचे कौतुकही झाले. दोघांचे मैत्रीपूर्ण संबंधही व्यक्त झाले. परंतु, हेच परवा विश्वचषक पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये विक्रमवीर सचिन तेंडुलकरच्या हस्ते बक्षिस घेताना ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिशेल स्टार्कने उजव्या हाताने बक्षिस घेवून डाव्या हाताने सचिनच्या दंडाला स्पर्श केला… तुम्हाला कोणाला हे लक्षात आलं का नाही माहीत नाही; पण मला मात्र ते तत्क्षणी खटकलं! यामध्ये दिग्गज अशा आपल्या लाडक्या सचिनशी बरोबरी केल्याची भावना नसून त्या प्रसंगामध्ये मिशेल स्टार्कचं ते वागणं थोडं उर्मटपणाचं वाटलं इतकंच. या दोन्हीही घटना साधारण सारख्याच आहेत. पण व्यक्ती, प्रसंग आणि परिस्थितीनुरूप याचा अर्थ बदलतो आणि परिणामही बदलत असतो.
मुद्दा हा की आपली देहबोली ही आरशासारखी आहे; यात आपलं प्रतिबिंब तर दिसतंच पण, समोरच्या व्यक्तिबद्दल, त्या प्रसंगाबद्दल आपल्याला काय वाटतं हे त्या व्यक्तीलाही लख्ख दिसतं. म्हणूनच देहबोली / बॉडीलॅन्गवेजला खूप महत्व आहे. या विषयावर अनेक पुस्तकं, लेख उपलब्ध आहेत व सतत बोलले ही जाते. पण, अमुक तऱ्हेनेच उठणं बसणं सोपंही नाही आणि सतत त्याच्या ओझ्याने दबून जाणंही योग्य नाही. देहबोलीबद्दल खूप संशोधनानंतर हे सारं लिहिलं गेलं असलं तरी, याला कधी कधी अपवाद असू शकतोही. याच देहबोलीचा सखोल विचार करून नाटक- चित्रपटामध्ये विविध पात्रे उभी केली जातात, म्हणूनच आपण आयुष्य आनंदाने व आत्मविश्वासाने जगण्यासाठी देहबोलीची अभ्यासपूर्ण माहिती घ्यायला हवी.
ही एक दुहेरी प्रकिया आहे असं मला वाटतं; म्हणजे देहबोलीतून आपला आत्मविश्वास जाणवणं आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोलीमुळे आत्मविश्वासात वाढ होणं!
आपण लहान गावातून शिक्षण, नोकरी अथवा अन्य कारणाने मोठ्या शहरांत / परदेशातही जातो आणि त्या वातावरणामध्ये रुळेपर्यंत आपल्या हालचालींमधून आपला नवखेपणा दिसून येतो. यात गैर ते काय, हे असं होणारच असंही म्हणेल कोणी… बरोबर! पण, कधी कधी या प्रक्रियेमध्ये एखाद्याचा आत्मविश्वास खूप डगमगूनही जाऊ शकतो. आणि त्या व्यक्तिच्या इतर गोष्टींवरही याचा वाईट प्रभाव पडतो.
मैत्रिणींनो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल भीती, निराशा, कमीपणा वाटत असेल तर त्यावर कशी मात करायची व त्यासाठी सकारात्मक देहबोलीचा कसा उपयोग करायचा हे पुढील लेखात पाहूया.
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापनही करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=21862

Posted by on Mar 31 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (83 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• युरोपियन महासंघाच्या अडमुठ्‌या भूमिकेला इटलीच कारणीभूत आहे. संपुआ सरकारने सोनिया गांधींच्या दबावाखाली घेतलेल्या चूकीच्या भूमिकेमुळे आता ...

×