Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » मुला-मुलीत का हा संकोच?

मुला-मुलीत का हा संकोच?

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ११

MRINAL PERSONALITY ARTICLE11“मला प्लीज ग्रुप बदलून द्या ना. मला मुलांच्या ग्रुपमध्ये नका टाकू.” वृषाली मला पुन्हा पुन्हा सांगत होती. मी म्हटलं, “अग, अस काय करतेस, मुले काय खाणार आहेत का तुला? उद्या ऑफिसमध्ये तुझ्या टीममध्ये मुले असतील, तर तू काय काम करायला नाही म्हणणार आहेस का? मुलं-मुली असाच ग्रुप करून क्लास असाइनमेंट पूर्ण करायची.” बारीकसा चेहेरा करून वृषाली गेली. मला कळेना, की लहानपणापासून यांना सवय असते, मुलं-मुली एकत्र शिकतात, पण तरी का हा संकोच? आणि असं संकोचून कस चालेल आजच्या जमान्यात? हेच प्रसंग कधी कधी मुलांच्या बाबतीतसुद्धा येतात. का बरं असं?
कितीही काळ बदलला असे म्हंटले तरीही अजूनही खूप ठिकाणी समाजात मोकळेपणाने वावरणे मुलींना अथवा स्त्रियांना शक्य नाही, जमत नाही. कधी घरामधले शिस्तीचे वातावरण, कधी समाजाची बंधने, कधी स्वतःमध्ये चार-चौघांमध्ये वावरण्याचा आत्मविश्वास कमी असणे, कधी लोक मला काय म्हणतील, याची भीती… एक न अनेक कारणे असू शकतात. कधी कधी केवळ मुलींच्या शाळेत गेल्यामुळे देखील त्यांना नंतर मुलांमध्ये मिसळायला संकोच वाटतो. एकप्रकारचा बुजरेपणा असतो, ज्यामुळे त्यांना मुलांबरोबर बोलणे, त्यांच्याबरोबर काही काम करणे देखील अवघड वाटते. “मी कशी बोलू, तो माझ्याशी काही वाईट वागला तर?” असे प्रश्न त्यांच्या मनात येतात. पण, सगळीच मुले / पुरुष तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत किंवा वाईट वागणार नाहीत. तरीही, सावध राहून तुम्हाला शाळा / कॉलेज अथवा कामाच्या ठिकाणी मुलींना / स्त्रियांना सहजतेने वावरता आले पाहिजे. त्यासाठी, मुळात स्वतःचे मन स्वच्छ असायला हवे आणि हाच स्वच्छपणा आपल्या वागण्यात देखील असायला हवा. ठराविक अंतर राखून वागणे आपल्याला जमायला हवे, ते हळू हळू अनुभवाने जमते देखील. पण, त्या भीतीने आपण फक्त मुलींमध्येच वावरायचे असे ठरवून उपयोग नाही. कारण, त्यामुळे नुकसान आपले आहे. म्हणूनच जर अभ्यासानिमित्त, कामानिमित्त, आपल्याला मुलांबरोबर, पुरुषांबरोबर वावरणे अनिवार्य आहे, तर त्यामध्ये एक सहजता आणणेही आवश्यक आहे.
ही सहजता कशी येईल?
⦁  प्रथम स्वतःला एक माणूस व व्यक्ती म्हणून वागणूक द्या!! सतत मी एक ‘स्त्री’ आहे, म्हणून मला अमुक एक गोष्ट जमेल का? मी असे वागू का? असे प्रश्न मनाला विचारू नका. यामुळे देखील खुपसा ताण आपोआप कमी होईल.
⦁  मुळात मनामध्ये सतत आजूबाजूच्या व्यक्तींबद्दल स्त्री / पुरुष असा विचार सतत करू नका; तर सह-विद्यार्थी, सह-कर्मचारी असा विचार करा.
⦁  आपला पेहेराव कामाच्या ठिकाणी शोभेल असा ठेवा आणि अतिशय प्रोफेशनल वागा. म्हणजेच कामापुरते, कामाशी संबंधित बोला अथवा लिहा.
⦁  योग्य शारीरिक अंतर राखा.
⦁  पण, मनावर दडपण येऊ देवू नका. चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवा. तुमच्या हालचालीमध्ये सहजता ठेवा.
⦁  काहींना सवय असते, की संपर्कात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला भाऊ अथवा दादा मानतात. ते चूक आहे असं म्हणणार नाही, पण त्याची खरं तर आवश्यकता नाही. सहकाऱ्याला सहकारी, मित्राला मित्र मानणे आणि त्याप्रमाणे वागणे आपल्याला जमले पाहिजे.
⦁ ऑफिसमध्ये शक्यतो आपल्या स्त्री असण्याचा बाऊ करून काही सवलती न मागणेच चांगले, कारण त्यामुळे आपोआप समोरच्या व्यक्तीला आपल्याला एक सह-कर्मचाऱ्याप्रमाणे वागणूक देणे सोपे होते… एक स्त्री कर्मचारी!, असे उगीच जाणवून देणं योग्य नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि तो आजवर सफल झाला आहे.
⦁ स्वतःला काही बनण्याची, काही शिकण्याची इच्छा असेल तर आपोआप त्यासाठी प्रयत्न करण्याची उर्मी निर्माण होईल. आणि ही उर्मीच आपल्याला पुढे येण्याची, आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवण्याची ताकद देते.
⦁ समजा, आपले घरचे वातावरण जास्त सुधारलेले नसेल, घरामध्ये जास्त कोणी शिकलेले नसेल, परिस्थिती अनुकूल नसेल, तर या गोष्टींचा ताण येऊ देऊ नका. तुम्हाला मिळालेल्या संधीसाठी देवाचे आभार माना आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. एक लक्षात घ्या, की आपल्या मागे राहण्यामुळे नुकसान हे आपलेच होते!
मी अशा अनेक विद्यार्थिनी पाहिल्या आहेत, ज्या अगदी लहान गावातून येऊनसुद्धा नेहेमी सर्व गोष्टीत पुढे असतात, आणि काही अतिशय सुधारक / पुढारलेल्या कुटुंबातून आलेल्या असून देखील कोणत्या कार्यक्रमात भाग घ्यायला अनुत्सुक असतात. त्यामुळे केवळ खेड्यातून असल्यामुळे किंवा जास्त पुढारलेल्या वातावरणातून नसल्यामुळे असं होतं असं म्हणू शकत नाही. तर यामध्ये स्वतःला स्वतःमध्ये किती सुधारणा घडवून आणायची आहे, या गोष्टीवर सारे अवलंबून आहे, असे मला वाटते.

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22360

Posted by on Apr 28 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (75 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• राज्यपातळीवरील छोट्‌या पक्षांमुळे १९८९ पासून राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठे गतिरोध निर्माण झाले आणि ही एक मोठी ...

×