Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक » सुंदर मी आहे… सुंदर मी होणार!

सुंदर मी आहे… सुंदर मी होणार!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : १०
MRINAL PERSONALITY ARTICLE10हॅलो मैत्रिणींनो, पाहता पाहता आपल्या गप्पा सुरु होवून दोन महिने होऊन गेले. आशा करते की हे सदर तुम्हाला वाचायला आवडतेय. आपण मनमोकळ बोलतो आणि एकमेकींचे प्रॉब्लेम्स शेअर करतो… मलातरी खूप आवडतं आहे तुमच्याशी गप्पा मारायला. आज मी असाच एक छोटासा किस्सा आणि एक छोटासा प्रॉब्लेम शेअर करणार आहे, ज्याला आपण अवास्तव महत्व देतो.
“ताई, काय हो आजकालच्या मुली, किती कटकट करतात… हे पाहिजे ते पाहिजे… आज हे क्रीम, उद्या ते. मला ना कंटाळा आलाय!” माझ्या कामवाल्या मावशी केर काढता काढता बोलत होत्या. मी म्हटलं, “अहो, काय झालं, किती वैतागला आहात आणि कोणावर?” त्या म्हणाल्या, “अहो, माझी लेक, पार हैराण करून सोडल आहे तिने. चेहेऱ्यावर दोन फुटकुळ्या काय आल्या, कॉलेजला जायच नाही म्हणते!! घराबाहेर पण पडायला मागत नाही.” म्हटलं, “प्रश्न गंभीर आहे हं, मी बोलेन तिच्याशी.” मला माझे शाळा-कॉलेजचे दिवस आठवले. मी सुद्धा गेलेच होते की यातून! आपण सगळ्याचजणी जातो किम्बहुना. वयात येताना जवळ-जवळ सगळ्याच मुलींना तारुण्यपीटीका येतात. आपल्या शरीरात होणाऱ्या अनेक बदलांपैकी हा एक बदल… किंवा त्या बदलांची नांदी म्हणून या पुटकुळ्या, मुरुमे, पिम्पल्स, येतात. त्या वयामध्ये, आपण कसे दिसतो!, या बद्दल आपण नकळतच जास्त जागरूक होत असतो आणि त्यामुळे मग या पिंपल्सचा जास्त त्रास वाटू लागतो. सतत आरशासमोर उभ राहून, आपल्या चेहेऱ्याचे निरीक्षण हा एक छंदच होवून बसतो, आपण स्वतःची नकळत इतरांबरोबर तुलना करू लागतो आणि जर या तुलनेमध्ये आपण थोडे कमी आहोत असे वाटले की, आत्मविश्वास कमी होतो आणि मग कोणाशी जास्त बोलावे, सगळ्यांमध्ये मिसळावे हे नकोसे वाटू लागते. काहीजणी तर घराबाहेर पडणंसुद्धा टाळतात यामुळे. वयात येताना आपण असतोच मुळी जरा कॉन्शस सगळ्याबद्दल, दिसण्याबद्दल, कोण आपल्याकडे पहातय याबद्दल. अगदी नैसर्गिक आहे हे. यात चूक ते काहीच नाही. पण हे सगळ रुटीन आहे… होणारच आहे… आणि लवकरच संपणार आहे, हे माहीत असून पण त्या दोन-तीन वर्षात आपण मुली पिंपल्स या गोष्टीचा मनस्ताप करून घेतो. आता मला हसू येत, माझे ते दिवस आठवले तरी. पण या त्रासातून आता ज्या मैत्रिणी जात आहेत, त्यांच्याशी मात्र म्हणूनच हे बोलावसं वाटत.
मी कशी दिसते… मी काळी का गोरी… माझी स्कीन किती खराब दिसते… मला सगळ्या मित्र-मैत्रिणी हसतात. या सगळ्या विचारांमध्ये टीव्हीवरील आताच्या जाहिराती अजून भर घालतात. मग वेगवेगळे फेस वॉश, क्रीम्स, स्पेशल साबण यांचा भडीमार सुरु होतो. मी हे सारे चूक आहे, असं मुळीच म्हणत नाही. काही अंशी या स्पेशल गोष्टींचा वापर उपयुक्त पण ठरतो. पण, या सगळ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की या वयामध्ये आपण स्वतःबद्दल काय विचार करायला शिकतो!! मी सुंदर दिसत नाही, कारण, आई तू सुंदर नाहीस! इथपर्यंत काही मुली बोलून जातात आणि आईला दुखावून मोकळ्या होतात. मला माझ्या छोट्या मैत्रिणींना हे सांगायचं आहे की, नका जास्त विचार करू या गोष्टीचा!. आपण मोठे होताना आपल्या शरीरात जे अनेक बदल होतात, यापैकीच ही एक गोष्ट आहे. आपण स्वतः बद्दल जागरूक होण्याचे हे दिवस आहेत. त्यावेळी, फक्त मी कशी दिसते? याचा विचार न करता, मी कशी आहे, कशी होणार! याचा पण विचार करा. मी आज जशी आहे, त्यापेक्षा उद्या कशी मनाने, विचाराने, वागणुकीने जास्त छान असेन व होईन, याचा विचार करा. संतुलित योग्य जेवण, मैदानी खेळ, चांगल्या पुस्तकांचे वाचन, स्वतःला व्यक्त करण्यासाठी मनमोकळ्या गप्पा आणि मुख्य म्हणजे मनमोकळ हसणं!! हे सारं केलंत, की पिंपल्स ही किती छोटी गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल. जे नैसर्गिक आहे, थोडेसे अटळही आहे, त्यामुळे स्वतःला कमी समजू नका, स्वतःला मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळल्यामुळे जो आनंद मिळतो, त्यापासून दूर ठेवू नका. आपण जसे आहोत, तसे छानच आहोत, रूप आपल्या हातात नाही, पण नीट-नेटके राहणे आपल्या हातात आहे, ते करा आणि मस्त आनंदी राहा. आपल्या सवयी, उठणे, बसणे, बोलणे, अभ्यास, तब्येत या गोष्टींना जास्त महत्व द्या. या गोष्टींमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी येते आणि तीच माझ्या मते जास्त महत्वाची आहे. फक्त वयात येतानाच नाही तर कोणत्याही वयात!!

ई-मेल – mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22213

Posted by on Apr 21 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (77 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• अशा विद्वानांना खरे तर जनरल सिंह यांनी योग्य नामाभिधान दिले आहे. हे देशाला लागलेले जळू आहेत. ...

×